The team hit a century .. but, Sanjaybhau's wicket fell! | टीमनं सेन्चुरी मारली.. पण, संजयभाऊंची विकेट पडली!

टीमनं सेन्चुरी मारली.. पण, संजयभाऊंची विकेट पडली!

सचिन जवळकोटे, निवासी संपादक, लोकमत, सोलापूर
इंद्र दरबारात अप्सरांच्या नृत्याविष्काराचा दिलखेचक नजराणा सादर केला जात होता. एवढ्यात बाहेरचा कलकलाट कानी पडू लागला. दरबार डिस्टर्ब झाला. इंद्र महाराजांनी नारदांना विचारलं, तेव्हा मुनी म्हणाले, ‘भूतलावर अधिवेशन सुरू झालंय. महाराज, त्याचाच हा गोंधळ आहे.. गेल्या दीड-दोन वर्षांपासून खदखदणाऱ्या द्वेष, मत्सर, असूया, कपट अन् सुडाग्नीचा उद्रेक झालाय आता.


 ‘कॉमन पब्लिक अगोदरच लॉकडाऊन अन‌् महागाईनं होरपळतंय. अशावेळी एकत्र येऊन जनतेला धीर देण्याऐवजी कसल्या घाणेरड्या राजकारणात गुंतलेत हे सारे नेते?’ - इंद्राचा संताप पाहून मुनींनी तत्काळ भूतलाकडे प्रस्थान केलं.
सर्व नेत्यांमध्ये खेळकर वातावरण निर्माण व्हावं म्हणून मुनींनी लगोलग क्रिकेट मॅचचं आयोजन केलं. नाव ठेवलं एमपीएल. अर्थात ‘महाराष्ट्र पॉलिटिकल लीग’. पंच म्हणून वडीलधारे थोरले काका बारामतीकर यांच्याकडे जबाबदारी सोपविली. पहिली मॅच ‘मुंबईकर’ विरुद्ध ‘नागपूरकर’ यांच्यात ठरली.
देवेंद्र पंतांनी टॉस जिंकला, मात्र उद्धो म्हणाले, ‘अगोदर आमची बॅटिंग.’ 
हे ऐकून चंदूदादा कोथरूडकर चरफडले, ‘हे तर शुद्ध चिटिंग.’ बॅट आपटत उद्धो पीचकडं निघाले. तेव्हा आदित्य हळूच पुटपुटले, ‘ज्याची बॅट, त्याचीच बॅटिंग. लहानपणी आम्ही दादरमध्ये असंच खेळायचो.’ ..विशेष म्हणजे थोरल्या काकांनीही बॅटिंगला मूकपणे सपोर्ट केला. पंतांची टीम हतबल झाली. मात्र, काकांसमोर आदळआपट करण्याची हिंमत नव्हती. कारण, काका भरपावसातही तुफान बॅटिंग करण्यात माहीर! 


मॅच सुरू झाली. उद्धो अन् अजित दादा ओपनिंगला गेले. रनर म्हणून न बोलविताही संजयराव तयार होतेच. ‘मुंबई बँके’च्या लॉकरमध्ये जपून ठेवलेला बॉल फिरवत दरेकर बॉलिंग करू लागले. मात्र, गठ्ठ्यांचा ओलावा लागल्यानं बॉल भलतीकडेच वळत होता. उद्धो टुकूटुकू खेळण्यावर अधिक भर देत होते. धावा काढण्यापेक्षा पीचवर शेवटपर्यंत टिकून राहणं, त्यांच्यासाठी म्हणे महत्त्वाचं होतं. तेव्हा अस्वस्थ झालेल्या दादांनी संधी मिळेल तसे चौकार-षटकार लगावले. हे पाहून उद्धोना वाटू लागलं की बहुतेक दादाच मॅच मारून जाणार.
दोघांनी धावसंख्या चांगली केली. दादा सेन्चुरी करणार, एवढ्यात थोरल्या काकांनी हळूच जयंतराव-छगनराव यांना खुणावलं. सेकंड फळी मैदानावर बोलावली. आतल्या आत धुमसत दादा परतले. ‘सीएम’ खुर्चीच्या वेळीही म्हणे असंच घडलेलं. 


 तिकडं बॉलिंग करून ‘मुनगंटीवार-सोमय्या’ जोडीही थकली होती. नारायण कोकणकर फिरकी चांगली टाकायचे; मात्र नेहमीप्रमाणे सिंधुदुर्गातून विमान न उडाल्यानं ते कणकवलीतच अडकून पडले होते. अखेर देवेंद्र पंतांनी बॉल स्वतःकडे घेतला. धनुभाऊ परळीकर अन‌् संजयभाऊ यवतमाळकर बॅटिंगला होते. दोघेही धडाडीचे फलंदाज, मात्र दोघांचेही वीकपॉइंट समोरच्या टीमनं अचूक ओळखलेले. एका चेंडूवर धनुभाऊंनी बॅट फिरविताच चंदूदादांनी जमिनीवर झेपावत कॅच घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काकांनी नॉट-आउट दिलं
 आता बॅटिंग संजयभाऊंकडे येताच त्यांनीही चेंडू जोरात खेचून रन काढण्यासाठी धाव घेतली. मात्र, काकांनी खुणावल्यामुळे धनुभाऊ जागचे हललेच नाहीत. संजयभाऊ मध्यापर्यंत येऊन परत फिरले. मात्र, पंतांनी त्यांना अलगद रन आउट केलं. तिकडं स्टेडियममध्ये बसलेल्या पंकजाताई मनातल्या मनात हळहळल्या. धनुभाऊ आउट झाले असते तर बरं झालं असतं, असं त्यांना वाटून गेलं. 
संजयभाऊंची विकेट गेल्यानंतर पंतांची टीम मैदानात आनंदानं नाचू लागली. थोरले काका मात्र गालातल्या गालात मिस्कील हसले. कारण, संजयभाऊंना आउट करण्याच्या नादात साऱ्यांचंच धनुभाऊंकडे दुर्लक्ष झालेलं ना!... नारायणऽऽ नारायणऽऽ        

                                     
sachin.javalkote@lokmat.com

Web Title: The team hit a century .. but, Sanjaybhau's wicket fell!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.