‘प्रेम’ करण्यासाठी चीनमध्ये विद्यार्थ्यांना स्पेशल सुट्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 04:50 IST2026-03-26T04:50:22+5:302026-03-26T04:50:44+5:30

वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल लागली की चीनमध्ये विद्यार्थ्यांना काही ठराविक काळासाठी सुट्टी दिली जाते.

special holiday for students in China to love | ‘प्रेम’ करण्यासाठी चीनमध्ये विद्यार्थ्यांना स्पेशल सुट्टी!

‘प्रेम’ करण्यासाठी चीनमध्ये विद्यार्थ्यांना स्पेशल सुट्टी!

वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल लागली की चीनमध्ये विद्यार्थ्यांना काही ठराविक काळासाठी सुट्टी दिली जाते. चीन सरकारनं यावेळी दोन आठवड्यांपूर्वीच वसंत ऋतूची सुट्टी जाहीर केली. सरकारच्या या घोषणेनंतर सिचुआन आणि ईस्ट जियांगसू राज्यांसोबतच  सुझोउ आणि नानजिंग शहरांनी लगेचंच त्याचं अनुकरण केलं.

त्यानंतर सिचुआन येथील साउथ वेस्ट व्होकेशनल कॉलेज ऑफ एव्हिएशन विद्यापीठनंही लगोलग विद्यार्थ्यांना सुट्टी देऊ केली, पण त्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना एक अटही घातली. ही जी सुट्टी तुम्हाला दिली आहे, त्याचा विनियोग चांगल्या कामासाठीच करा. इतरवेळी विद्यार्थ्यांना सुट्टीच्या काळात अभ्यासाचा किंवा नवीन काही स्किल्स शिकण्याचा सल्ला दिला जातो, पण या विद्यापीठानं विद्यार्थ्यांना बजावलं, या काळात सर्वंत्र छान फुलं फुललेली  असतात. वातावरण अतिशय सुंदर आणि आल्हाददायक असतं. 

या काळात तुम्ही फुलांचा आस्वाद घ्या, बागांमध्ये हिंडा, पण एकट्यानं नाही, आपल्या जोडीदारासोबत निसर्गाचा हा आनंद घ्या आणि भरपूर रोमान्स करा ! विद्यापीठानं यासाठी थेट नोटीसच काढली आणि त्यात लिहिलं, ‘विद्यार्थ्यांनो, या काळात इतर कोणत्याही ‘फालतू’ गोष्टी करू नका, पुस्तकं, अभ्यास, वाचन.. यांसारख्या गोष्टीत निदान सध्या तरी आपला अमूल्य वेळ घालवू नका, त्याऐवजी आपापाल्या बॉयफ्रेण्ड, गर्लफ्रेण्डसोबत मौजमजा करा!. तुम्हाला कोणी जोडीदार नसेल, तर तातडीनं अशा जोडीदाराचा शोध घ्या आणि एकमेकांच्या सोबतीचा, सहवासाचा आनंद घ्या !’ 
सुटीच्या काळात तरुणांनी प्रेमात पडण्याची, रोमान्स करण्याची आणि अर्थातच मूल जन्माला घालण्याची त्यांनी जणू काही सक्तीच केली आहे. त्यासाठी विद्यापीठानं विद्यार्थ्यांना भरीव प्रोत्साहन दिलं आहे. एवढंच नाही, विद्यापीठाच्या बागा, उद्यानं आणि अगदी एकांतही उपलब्ध करून दिला आहे !

देशाचा जन्मदर वाढावा यासाठीच हे केलं जात आहे. आपली लोकसंख्या वाढावी यासाठी चीन युद्धपातळीवर जे काही प्रयत्न करीत आहे, त्या प्रयत्नांचाच हा आणखी एक अभिनव मार्ग आहे.

रॉयटर्सच्या अहवालानुसार, देशातील जन्मदर वाढविण्यासाठी हे केलं जात आहे. विद्यापीठानं आपल्या अधिकृत वीचॅट अकाउंटवरून या सुट्टीबद्दल माहिती दिली. त्यात ‘विषय’ या कॉलममध्ये ‘विद्यार्थ्यांनी फुलं पाहणं आणि एकमेकांच्या सोबतीनं रोमान्सचा आनंद घेणं’ असं नमूद केलं आहे. विद्यापीठातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या काळात पुस्तकांपासून दूर राहण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

चिनी अधिकाऱ्यांनी सांगितलं, विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना ऑफ-सीझनमध्ये, जेव्हा पर्यटनस्थळांवर गर्दी कमी असते त्यावेळी अशा ठिकाणी फिरण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल. यासाठी त्यांना सशुल्क रजाही दिली जाईल. म्हणजेच या काळात तुम्ही जोडीदारासोबत मनमुक्त फिरा, प्रवास करा, मौज करा, ऑफिसमध्ये येऊन काहीही काम करू नका, सुट्टी घ्या, तरीही तुमचा पगार कापला जाणार नाही !  

ऐश करण्यासाठीच ही सुट्टी त्यांना दिली जाणार आहे. जन्मदर सुधारण्यासाठी चिनी सरकारनं अशा प्रकारे प्रवास आणि मनोरंजनाला प्रोत्साहन देण्याचा नवा फंडा आता अंमलात आणायला सुरुवात केली आहे. चीनच्या या नव्या फंड्याला तरी तरुण बळी पडतात का, हा प्रश्नच आहे!

 

Web Title : चीन में जन्म दर बढ़ाने के लिए कॉलेजों ने दी 'लव लीव'।

Web Summary : चीन में गिरती जन्म दर को बढ़ावा देने के लिए कॉलेजों ने छात्रों को 'लव लीव' दी है। छात्रों को पढ़ाई के बजाय पार्टनर के साथ प्रकृति का आनंद लेने के लिए प्रोत्साहित किया जा रहा है। पर्यटन को बढ़ावा देने के लिए कर्मचारियों को सशुल्क छुट्टी भी दी जा रही है।

Web Title : China's colleges give 'love leave' to boost birth rates.

Web Summary : Chinese colleges are granting students 'love leave' to encourage romance and boost the country's declining birth rate. Students are urged to enjoy nature with partners, prioritizing romance over studies. The initiative includes paid leave for staff to promote tourism and leisure.