पंकजाताई को गुस्सा क्यूं आता है?

By यदू जोशी | Published: July 16, 2021 08:34 AM2021-07-16T08:34:48+5:302021-07-16T08:35:47+5:30

Pankaja munde : पंकजा कपटी नाहीत, भडाभडा बोलून मोकळ्या होतात, त्याचा त्यांना फटका बसतो. लोक म्हणतात, त्या शिवसेनेत जातील. पण, ते अवघडच दिसते!

special editorial on bjp leader pankaja munde why she gets angry | पंकजाताई को गुस्सा क्यूं आता है?

पंकजाताई को गुस्सा क्यूं आता है?

Next

यदु जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत

परळी अन् वरळी या दोन शब्दांचं पंकजा मुंडे यांच्या जीवनात फार महत्त्व आहे. परवा त्यांनी वरळीत जमलेल्या उत्साही समर्थकांच्या समोर  जे  भाषण दिलं ते धडाकेबाज होतं. “मी कोणाला घाबरत नाही,” असं त्या केवळ म्हणाल्याच नाहीत तर त्यांच्या प्रत्येक शब्दात तो निर्धार जाणवत होता. गेल्या काही वर्षांत ऐकलेल्या उत्तम राजकीय भाषणांपैकी ते एक. आपल्या समर्थकांसमोर आपली बाजू  जोरकसपणे कशी मांडायची आणि आपल्या भूमिकेसोबत त्यांना कसं घेऊन जायचं याचा ते भाषण म्हणजे उत्तम नमुना होतं. या भाषणाचे त्यांच्या राजकीय भवितव्यावर काय परिणाम होतील?

कणा ताठ असल्याचं पंकजांनी दाखवून दिलं हे नक्की. अशा भाषणाचे काही फायदे असतात आणि काही तोटेही. दोन्हीही नजीकच्या भविष्यात दिसतील. मोदी-शहांचं राजकारण बघता तोट्याचीच शक्यता अधिक.  विनोद तावडेंचं बघा, अन्याय झाला, पण ते बोलले नाहीत. आज ते भाजपचे राष्ट्रीय सचिव आहेत, एखाद दिवशी अचानक ते राष्ट्रीय सरचिटणीस वा आणखी कोणत्यातरी पदावर गेल्याची बातमी येईल.  पूनम महाजन या प्रमोदजींच्या वारस. पंकजा यांच्या त्या मामेबहीण. त्याही दुसऱ्यांदा खासदार आहेत; पण मंत्री केलं नाही म्हणून रुसल्याचं त्यांनी कधी दाखवलं नाही. तावडे, पूनम हे दोघे  संयमाची गोळी खातात. पंकजा ती खाऊ शकत नाहीत, तो त्यांचा स्वभाव नाही. भाजप सध्या द्विचालकानुवर्ती आहे... त्यात पंकजांसारखी प्रतिक्रिया न देणेच अधिक इष्ट.

राज्यातील चार जणांना मंत्रिपदाची जी संधी मिळाली त्यात देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची होती. चौघेही त्यांच्या निकटचे. मोदी-शहांनी फडणवीसांची राज्यातील ताकद वाढवली; पण त्याचवेळी पंकजा यांना मुंबईत येऊन फडणवीसांवर आडून टीका करण्याची मुभा तर नाही दिली? काही जाणकारांच्या मते काँग्रेसच्या चष्म्यातून राजकारणाकडे पाहणाऱ्यांचा हा तर्क आहे. भाजपमध्ये तसं होत नाही. राज्यातील नेत्यांना एकमेकांच्या अंगावर सोडून द्यायचं, कधी याला तर कधी त्याला बळ देत गंमत पाहायची हा काँग्रेसी फॉर्म्युुला आहे. मोदी-शहांबाबत तसा अनुभव अद्याप आलेला नाही. दोघांचे कॅमेरे बरोबर लागलेले असतात. लोकसभेत कोण भाषण देत होतं आणि मागे बसून कोण चेष्टेनं हसत होतं हेही त्या कॅमेऱ्यातून सुटलेलं नाही म्हणतात. 

डॉ. भारती पवार की डॉ. हीना गावित असा टाय झाला, तेव्हा पवार यांच्या नावाला का पसंती दिली गेली? धुळे-नंदुरबारमधील भाजप व संघाच्या कर्त्या लोकांनी, ‘विजयकुमार गावित हे स्वत:चा पक्ष चालवतात, ते  भाजप आणि संघाला घेऊन चालत नाहीत,’ असा फीडबॅक दिला होता. त्याचाच फटका हीना यांना बसला म्हणतात.

देवेंद्र-पंकजा यांचे नाते
पंकजा असे म्हणाल्या की, “मोदी-शहा-नड्डा  माझे नेते आहेत.” फडणवीस माझे नेते आहेत, असे त्या नाही म्हणाल्या. “मी आता राष्ट्रीय सचिव आहे, त्यामुळे राज्यातील नेत्यांचं नाव घेतलं नाही,” असं त्या नंतर पत्रकारांशी बोलल्या. पंकजा-देवेंद्र यांच्यात दुरावा का आला असावा? गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा-देवेंद्र ही बहीणभावाची जोडी अधिक घट्ट होईल असं वाटलं होतं. पण, घडलं उलटंच.  आज दोघांचे संबंध चांगले नाहीत. महाजन-मुंडेंनंतर गडकरी-फडणवीस हे महाराष्ट्रातील भाजपचे सर्वेसर्वा होते. आता तर फडणवीस त्याबाबत गडकरींच्याही पुढे दिसतात. मुंडे-गडकरी यांच्यातील संबंध त्या वेळी ताणलेले होते. मुंडेंच्या जाण्यानंतर पंकजा या गडकरींच्या सावलीखाली जाण्याचा प्रश्नच नव्हता. फडणवीस हे मुंडेभक्त. त्यामुळे साहजिकच पंकजा यांचा ओढा फडणवीसांकडे होता.

श्रेष्ठींकडे हट्ट धरून फडणवीसांनी पंकजा यांना तीन महत्त्वाची खाती दिली होती; पण, आज गैरसमजांच्या पक्क्या सिमेंटची भिंत दोघांमध्ये उभी झाली. काही चाटुकारांनी कान भरले म्हणतात. धनंजय यांना फडणवीसांकडून ताकद दिली जात असल्याचंही म्हटलं गेलं; पण, पंकजा यांच्यावर वाट्टेल ते आरोप झाले तेव्हा बचावासाठी फडणवीसच धावले ही दुसरी बाजूदेखील होतीच. मुंडेसाहेबांच्या चितेच्या ज्वाळा निघाल्या तेव्हा पंकजा हात जोडून, डोळे मिटून उभ्या होत्या, बाजूला फडणवीस होते. बाबांच्या जागी पुढे देवेनभाऊ असतील असं त्यांना वाटून गेलं असावं. मात्र, दोघांच्या नात्याला गैरसमजांची दृष्ट लागली. 

धूर्त लोक एखाद्या नेत्याची जाहीररीत्या प्रशंसा करतात अन् खासगीत त्याच्याविरुद्ध षडयंत्र रचतात. पंकजा यांचं उलटं आहे. त्या कपटी नाहीत, भडाभडा बोलून मोकळ्या होतात; पण त्याचा त्यांना  फटका बसतो. असं बोलण्यानं टाळ्या मिळतील, तुमच्यावर कॅमेरे फिरतील; पण, राजकीदृष्ट्या काय साध्य होईल याचं गणित महत्त्वाचं असतं. नेतृत्वाची एक उतरंड असते आणि त्यात आपण कुठे आहोत याचं भान ठेवून वागायचं, बोलायचं असतं. अडचण अशी आहे की फडणवीसांशी असलेल्या नात्यात  अंतर पडलं आहे. सख्खा चुलतभाऊ सर्वांत कट्टर राजकीय विरोधक आहे.

मतदारसंघात पराभूत झाल्या.  पूर्वपुण्याई अन् कर्तृत्वाचा मेळ स्थानिक पातळीवर बिघडला. असे आधार तुटले  तेव्हा दिल्लीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पंकजा शेवटचा आधार शोधत आहेत. तेही “छत पडलं, अन् इथे राम नाही असं वाटलं तर पाहू” असं त्या आज म्हणताहेत. - लोक म्हणतात की, आज ना उद्या त्या शिवसेनेत जातील. पंकजा यांचा ब्लड ग्रुप भाजप आहे. त्या भाजप सोडतील असं वाटत नाही; पण, आत्मसन्मानासाठी नक्कीच लढत राहतील. राखीला नाहीतर दिवाळीला देवेनभाऊ नक्की येईल अन् प्रेमाची ओवाळणी देईल याची त्यांना आशा असेल. तो दिवस दोघांसाठीही आनंदाचा असेल.

Web Title: special editorial on bjp leader pankaja munde why she gets angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.