विशेष लेख: इराणच्या आगडोंबाची झळ आपल्याला बसेल? सत्ताधीशांचा अहंकार देशाचे भवितव्य भरकटवतो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 10:25 IST2026-01-20T10:24:43+5:302026-01-20T10:25:17+5:30
इराणमधील संघर्षाचे पर्यवसान तिसऱ्या महायुद्धात होईल का, हा कळीचा प्रश्न आहे. सहमतीने तडजोड हाेणार नसेल तर काय होईल, हे सांगायला नको.

विशेष लेख: इराणच्या आगडोंबाची झळ आपल्याला बसेल? सत्ताधीशांचा अहंकार देशाचे भवितव्य भरकटवतो!
प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार
सत्ताधीशांचा अहंकार देशाचे भवितव्य भरकटवतो, महत्त्वाकांक्षेला महानता मानले जाते आणि अनिर्बंध सत्तेचा पाठलाग सुरू होतो, तेव्हा देश संकटाकडे लोटले जातात. आज पुन्हा एकदा तेच होताना दिसत आहे. यावेळी आगीच्या ज्वाळांमध्ये आहे इराण. देशांतर्गत स्फोटक परिस्थितीमध्ये होरपळणारा इराण आंतरराष्ट्रीय संघर्षाचे केंद्र बनला आहे. याचे पडसाद जगभर उमटू शकतात.
कायदा खुंटीला टांगून दमनशाहीने सत्ता गाजवणाऱ्या खामेनींच्या राजवटीमुळे हे उद्भवले आहे. वैचारिक दुराग्रहापोटी देशांतर्गत अर्थव्यवस्थेचा बळी दिला गेला. त्याचवेळी विदेशी दबाव वाढला. डोनाल्ड ट्रम्प डरकाळ्या फोडत हस्तक्षेप, दंड योजनांच्या धमक्या देऊ लागले. बीजिंग आणि मॉस्को दोघांनाही या परिस्थितीत संधी दिसली. त्यानुसार त्यांनी तेहरानला पाठिंबा देऊ केला. भौगोलिक स्थान, तेलाची गरज आणि प्रादेशिक हितसंबंध यामुळे इराणला वाऱ्यावर सोडणे भारताला शक्य नव्हते. त्याचबरोबर अमेरिकेला उघड विरोध करणेही परवडणारे नव्हते, कारण तो देश आयात शुल्काचा फास आवळत सुटला आहे.
वॉशिंग्टनचा इशारा स्पष्ट होता. इराणशी व्यवहार करणाऱ्या देशांना अतिरिक्त आयात शुल्क आणि दंड योजनांची जबरी किंमत मोजावी लागेल. येणारे वादळ ओळखून भारताने सावध पवित्रा घेतला. भारतीय नागरिकांना इराक सोडायला सांगितले गेले. चाबहार बंदर प्रकल्पाच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्यात येऊ लागली. परिस्थिती चिघळत गेली आणि एक मोठा प्रश्न उभा राहिला: इराणमधील या परिस्थितीतून तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटेल का? आधीच मोडकळीला आलेली जागतिक अर्थव्यवस्था कोलमडून पडेल का? इराणमधील पेचप्रसंग हा केवळ भूराजकीय बुद्धिबळ पटावरचा खेळ नाही. ती मानवी शोकांतिका आहे. या देशातला सध्याचा आगडोंब एका रात्रीतून उसळलेला नाही. हजारो वर्षांचा ऐतिहासिक गोंधळ, राजकीय गद्दारी, सामाजिक तणाव आणि वैचारिक प्रयोग हे सगळे फसत गेल्याने वर्तमान स्थिती उद्भवली. इराण एकेकाळी मानवतेचा सांस्कृतिक मानदंड होता. सायरस द ग्रेट आणि डेरियस यांच्यासारख्या राजवटीत हे पर्शियन साम्राज्य झगमगत होते.
पर्शियन संस्कृतीने मानवतेला काव्य, तत्त्वज्ञान, विज्ञान, तसेच सौंदर्य आणि कला दिल्या. फिरदौसी, रुमी आणि हाफिज यांनी जागतिक विचारांवर प्रभाव टाकला. स्थापत्य, संगीत फुलत गेले आणि ज्ञान त्रिखंडात पोहोचले. विसाव्या शतकात इराण कायापालटाच्या उंबरठ्यावर उभा होता. १९२५ साली रेझा शाह पेहलवी यांनी आधुनिक राष्ट्रवादी इराणचा पाया घातला. पायाभूत सुविधा वाढल्या. रस्ते, रेल्वे, विद्यापीठे उभी राहिली. पश्चिम आशियात कधी कोणी ऐकले नसेल एवढे स्वातंत्र्य स्त्रियांना मिळाले. शिक्षणाचा प्रसार झाला. सामाजिक चलनवलन वाढले आणि इराण जगातील आधुनिकतेशी जोडला गेला. इराणी शहरे बहरली. स्त्रिया शिकल्या. नोकऱ्या करू लागल्या. जगाशी सांस्कृतिक देवघेव सुरू झाली. तेहरान, इस्फहान आणि शिराज ही शहरे प्रगती आणि आकांक्षांची प्रतिके झाली.
असे असले, तरी या पृष्ठस्तरीय प्रगतीच्या खाली काही वेगळे प्रवाह वाहत होते. शहा यांचे गुप्त पोलिस टेहळणी आणि छळाच्या माध्यमातून भय पसरवत होते. उच्च स्तरावरील भ्रष्टाचाराने आर्थिक विषमतेची दरी रुंद केली आणि या सगळ्यातच आयातुल्ला खोमेनी या विजनवासातील धर्मगुरूचा प्रवेश झाला. लोकांच्या मनातील खदखद खोमेनीनी ओळखली. फ्रान्समधून दिलेल्या प्रवचनांमधून त्यांनी आधुनिकतेच्या नावाने होत असलेला नैतिक ऱ्हास, पश्चिमेचा प्रभाव यांविषयी भ्रमित इराणी जनतेचे लक्ष वेधले.
१९७८ च्या उत्तरार्धात इराणमध्ये भडका उडाला. जानेवारी १९७९ मध्ये शाह यांनी पलायन केले. १ फेब्रुवारीला खोमेनी तेहरानमध्ये परत आले, तेव्हाच इस्लामिक प्रजासत्ताक म्हणून नव्या इराणचा जन्म झाला. जवळपास ९ कोटी लोक आर्थिक आणि राजकीय दमन यंत्रणेखाली जगत आहेत. चलनवाढ होतेच आहे. तरुणवर्गात बेकारी वाढत आहे. धार्मिक पोलिसिंग, इंटरनेट बंद करणे, पत्रकार तसेच महिला कार्यकर्त्यांची धरपकड, माध्यमांची मुस्कटदाबी असे सरकारी दमन सुरू झाल्यामुळे असंतोष उफाळला आहे.
जागतिक नेत्यांनी गंमत पाहत न बसता यातून मार्ग काढला पाहिजे. अस्मिता आणि सत्तापिपासू मार्गांनी सारे वाहत गेले, तर जग संकटात लोटले जाईल, मग पुन्हा परतता येणार नाही. त्याऐवजी सहअस्तित्व, समजूतदारपणा, एकमेकांचे ऐकून घेणे महत्त्वाचे आहे. इराणचा आगडोंब त्याच्यापुरता मर्यादित नाही. त्यात जग लपेटले जाऊ शकते. ‘विनाश की सामूहिक शहाणपणा’ हे नेते काय करतात, यावर ठरणार असून धोकादायक वळणावर उभा असलेला भविष्यकाळ सगळे बारकाईने निरखतो आहे.