विशेष लेख: राहुल गांधी यांचे नेमके काय चुकते आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 11:29 IST2025-11-18T11:27:48+5:302025-11-18T11:29:28+5:30
दमलेले नेते, थकलेला पक्ष अशी सध्या काँग्रेसची स्थिती आहे. त्याची जबाबदारी अर्थातच राहुल गांधी यांच्यावर येते. त्यांचा तात्त्विक संभ्रम अद्याप संपत कसा नाही?

विशेष लेख: राहुल गांधी यांचे नेमके काय चुकते आहे?
प्रभू चावला
ज्येष्ठ पत्रकार
बिहारमध्ये काँग्रेसचे पुरते पानिपत झाले आहे. पक्षाने ६१ जागा लढवल्या आणि मिळाल्या फक्त सहा. हा केवळ पराभव नव्हे; खोल दरीत कोसळणे होय. या पराभवाची जबाबदारी नि:संशय राहुल यांचीच आहे. गेल्या दोन दशकांत राष्ट्रीय राजकारणात शिल्पकार ठरण्याऐवजी राहुल यांचा वावर एखाद्या भुतासारखा राहिला. अकस्मात ते एखादा विषय घेऊन बोलू लागतात आणि नाट्यपूर्ण प्रकटीकरण झाल्यानंतर तितक्याच अचानकपणे गायब होतात. याचे काँग्रेसवर झालेले परिणाम गंभीर स्वरूपाचे आहेत. एक तर पक्षाची लोकांना आकृष्ट करण्याची क्षमता संपली आणि पराभवाच्या अशा चक्रात पक्ष सापडला की, आता त्यातून सुटका करून घेण्याएवढेही बळ त्यात उरले नाही.
राहुल यांचा हा प्रवास भीषण आहे. २००४ साली ते राजकारणात आले. पक्षाच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकायला त्यांनी २००९ साली सुरुवात केली. तेव्हापासून उपलब्ध आकडेवारीनुसार, काँग्रेस पक्ष देशातल्या ८३ पैकी ७१ विधानसभा निवडणुका हरला आहे. ही घसरण नसून पक्षाला अवनत स्थितीत नेऊन टाळे लावण्यासारखे आहे. २०१४ साली काँग्रेस पक्षाला लोकसभेत फक्त ४४ जागा मिळाल्या. इतक्या कमी की, टीकाकारांनाही धक्का बसला. दशकभरानंतर पक्ष कसाबसा ९९ जागांपर्यंत पोहोचला. राज्यांमध्ये झालेले पक्षाचे पतन ही तर अधिक भयावह कहाणी आहे. २०१४ साली ११ राज्यांत काँग्रेसची सरकारे होती. आज केवळ कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या तीन राज्यांत काँग्रेस सत्तास्थानी आहे. देशाच्या राजकीय महासागरात भाजप आणि प्रादेशिक पक्षांचा बोलबाला असताना एखादे छोटे बेट असावे, तसा हा पक्ष उरला आहे.
विधिमंडळांच्या स्तरावरही पक्षाची ताकद अशीच घसरत गेली. गेल्या दशकभरात देशातील काँग्रेस आमदारांची संख्या निम्म्यावर आली. पक्षाने संघटनात्मक चैतन्यच गमावले. दमलेले नेते आणि थकलेला पक्ष अशी सध्या काँग्रेसची स्थिती आहे. नेहरू-गांधी घराण्यांसाठी फार मोठा ऱ्हास आहे. राहुल यांचे आजोबा आधुनिक भारताचे शिल्पकार पं. जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेस पक्षाला लोकसभेत लागोपाठ तीनवेळा विजय मिळवून दिला. नेहरूंच्या काँग्रेसने ३/४ राज्यांमध्ये शासन केले. तरुण प्रजासत्ताकाची वैचारिक आणि प्रशासकीय पायाभरणी त्यांनी केली. त्यानंतर राहुल यांच्या आजी इंदिरा गांधी यांचा उदय झाला. धारदार राजकीय समज असलेल्या इंदिराजींचा निवडणुकीतील प्रभाव अतुलनीय होता. त्यांनीही तीन राष्ट्रीय निवडणुका जिंकल्या. त्यातील दोन दणदणीत बहुमताने. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने एकदा २/३ राज्यांत सत्ता स्थापन केली. राहुल यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांनी तर अशक्य ते शक्य करून दाखवले. आठ वर्ष सत्तेबाहेर राहिल्यानंतर २००४ साली त्यांनी नाट्यपूर्णरित्या काँग्रेसला वैभव प्राप्त करून दिले. ते केवळ ‘घराण्या’चे यश नव्हते; तर दमदार राजकीय धोरणांचे फळ होते. त्यांनी आघाड्या केल्या. परस्परांच्या वैचारिक विरोधात असणाऱ्यांना एकत्र आणले आणि मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशाला स्थिर सरकार दिले. २००९ साली त्यांनी पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. राहुल यांची कामगिरी मात्र क्लेशकारकरित्या निराश करणारी झाली.
यामागची कारणे लपलेली नाहीत. राहुल यांना कोणताही पर्यायी कार्यक्रम देता आलेला नाही. सध्याचे राजकारण धारदार वैचारिक संघर्ष आणि स्पष्ट प्रशासकीय आश्वासने अशा मार्गाने चाललेले असताना राहुल गोंधळलेले दिसतात. अधूनमधून काहीतरी बोलतात आणि तात्विक संभ्रमात अडकतात. त्यांनी आतापर्यंत ठोस असा काही विचार, लक्षात राहील अशी घोषणा, सामाजिक, आर्थिक किंवा संस्थात्मक संदर्भातली काही प्रतीके राहुल यांनी समोर ठेवलेली नाहीत. पक्षाची बांधणी केली नाही. वलयांकित, स्पर्धेत टिकतील असे राज्य पातळीवरचे नेते त्यांना तयार करता आले नाहीत. हे सारे घातक ठरले. राष्ट्रीय पातळीवर आघाड्या तयार करताना राहुल गांधी हे आश्चर्यकारकरीत्या संकोची दिसले. देशातल्या दुसऱ्या मोठ्या राजकीय पक्षाचे नेते म्हणून भाजपविरोधी आघाडीला आकार देण्याकरिता त्यांनी धोरणात्मक सूत्रे हाती घ्यायला हवी होती. प्रत्यक्षात त्यांचा सहभाग हा तुटक आणि केवळ प्रतिक्रियेपुरता राहिला. त्यामुळे इंडिया आघाडी खंडित राहून महत्त्वाच्या क्षणी गळपटली.
राहुल गांधी अपघाताने राजकारणात आले की, त्यांना त्यात रसच नाही? राष्ट्रीय पक्षाचे नेतृत्व करायचे तर रोजच्या रोज त्यात लक्ष घालावे लागते. केवळ अधूनमधून उत्साह दाखवून चालत नाही. क्षीण झालेल्या विरोधी पक्षांवर भारतीय लोकशाही चालणार नाही. व्यावहारिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या ही जबाबदारी काँग्रेसवर येऊन पडते; असे असूनही पक्षाकडे आज स्पष्ट असे राजकीय धोरण नाही. हा पक्ष एका कुटुंबाभोवती फिरतो. एकेकाळी हे कुटुंब जात, धर्म, वर्ग यांच्या पलीकडे जाऊन निष्ठेवर हुकमत गाजवत असे. परंतु, सध्यातरी आपल्याच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यात ते असफल झालेले आहे. ‘गांधी ब्रॅण्ड’ने आपली निवडणुकीतील आकर्षण शक्ती गमावली आहे, असे काँग्रेसमधले अनेकजण दबक्या आवाजात बोलतात. यातून फार तर एकमेकांत धुसफुसणारे गट वेगळे होतील. परंतु, राष्ट्रीय पातळीवर पक्ष म्हणून पुन्हा एकत्रितरीत्या उभे राहू शकणार नाहीत.