विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
By अतुल कुलकर्णी | Updated: April 5, 2026 08:15 IST2026-04-05T08:15:02+5:302026-04-05T08:15:49+5:30
पक्षाचे दोन ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल आणि खा. सुनील तटकरे यांच्यावरच अविश्वास दाखवल्याची चर्चा सुरू झाली आहे.

विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई
श्री. भुजबळजी नमस्कार.
आत्ताच्या राष्ट्रवादी पक्षात आपण वयाने ज्येष्ठ आहात. पक्षाच्या स्थापनेपासून आपण असल्यामुळे तिथेही आपण श्रेष्ठ आहात. म्हणून आपल्याला हे पत्र. आपल्या पक्षात नेमके काय चालू आहे? सुभेदारांचा पक्ष अशी आपल्या पक्षाची खरी ओळख. अनेक मातब्बर नेत्यांनी आपापले मतदारसंघ बांधून ठेवले आहेत. त्यातून ते निवडून येतात. अशा नेत्यांना एक पक्ष हवा असतो. तो आपला ‘राष्ट्रवादी पक्ष’ असे बाहेर बोलले जाते. हे सोपे गणित लक्षात ठेवले तर पुढची अनेक मोठी गणितं सुटू शकतात. पण हे लक्षात कसे घेतले जात नाही. अजितदादा यांच्या निधनानंतर पक्षात कोणीच कोणाचे ऐकत नाही असे चित्र का निर्माण झाले आहे? कोणी कोणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन राष्ट्रवादींचे पॅचअप होईल. दोघे एकत्र येतील हा विषय फार पुढचा आहे. मुळात आपल्या आहे त्या राष्ट्रवादीतच एकमेकांचे इतके बिनसले आहे, की एकमेकांना समजून घेणारे कोणी दूर दूरवर दिसत नाही. अशा स्थितीत मतदारसंघाचे प्रश्न, विषय सांगायचे कोणाला? स्थानिक राजकारणात काय डावपेच आखायचे? भाजप आणि शिंदेसेना यांच्याशी कसे डील करायचे? या गोष्टींची अजितदादा असताना चर्चा व्हायची. आता तशी चर्चा पक्षात करायची तरी कोणासोबत..? चर्चा केलीच तर त्यावर उपाय कोणी सांगायचा?
पक्षाचे दोन ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल आणि खा. सुनील तटकरे यांच्यावरच अविश्वास दाखवल्याची चर्चा सुरू झाली. निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या पत्रावरून त्या चर्चांना आणखी बळच मिळाले. पार्थ पवार यांनी दिल्लीतल्या पत्रकारांना, ‘आपण ते पत्र वापस घेत आहोत’, असे सांगितले. तर मुंबईतल्या पत्रकारांना ‘आपण असे कुठलेही पत्र वापस घेणार नाही’, असे सांगितल्याच्या उलटसुलट बातम्याही चर्चेत आहेत. आपण पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात. आपली नेमकी काय माहिती आहे..? या घटनेमुळे प्रमुख दोन नेत्यांबद्दलच अविश्वासाचे वातावरण तयार झाले, तर या नेत्यांचे ऐकणार कोण? कार्यकर्ते, खासदार, आमदार बोलणार कोणाशी? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत गेल्या, तेव्हा पत्रकारांनी प्रफुल्ल पटेल कुठे आहेत? असे त्यांना विचारले. तेव्हा ते तुम्हालाच माहिती असेल, असे त्यांनी उत्तर दिले. मात्र संध्याकाळी त्यांच्याच घरी त्या भोजनासाठी गेल्या. हा नेमका काय प्रकार होता..? तटकरे - पटेल यांच्या गोटातून वेगळीच माहिती समोर येत आहे. सुनेत्रा पवार येणार आहेत असे कळाल्यानंतर, आम्ही त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले असते तर आमची आणि पदाची प्रतिष्ठा राहिली असती का.. असे प्रश्नही विचारले जात आहेत.
बड्या नेत्यांमध्येच वाद सुरू असतील तर स्थानिक नेत्यांनी करायचे काय? त्यांचे प्रश्न घेऊन कोणाकडे जायचे? तीन वर्ष कुठल्याही निवडणुका नाहीत. पक्षाला चालू ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांना ‘कार्यक्रम’ द्यावा लागतो. कार्यक्रमासाठी रसद पुरवावी लागते. त्याच्या व्यवस्थेसाठी छोटी-मोठी कामे द्यावी लागतात. त्यांच्या ‘दळणवळणाचा’ प्रश्न मिटला की मतदारसंघातील अनेक प्रश्न आपोआप मार्गी लागतात. ही व्यवस्था आता कोण राबवेल..? राज्यभर पक्षासाठी कोण फिरणार आहे? पटेल - तटकरे यांच्यावरच संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा स्थितीत ते दोघे राज्यभर फिरले तर त्यांचे कोण ऐकेल..? त्यांनी एखादे आश्वासन दिले, एखाद्या कार्यकर्त्याला एखादे पद दिले तर ते कायम राहील की ते दुसरे कोणीतरी बदलून टाकेल..? पक्षात कोणतेही पद घ्यायचे असेल तर कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षांना भेटायचे की अन्य कोणाला भेटायचे..? प्रश्न अनेक आहेत. उत्तरं मात्र कोणाकडूनच मिळत नाहीत.
जाहीर सभेत तटकरे यांनी अजितदादांच्या उजव्या बाजूला बसायचे, की डाव्या बाजूला हे सांगणारे, दादांच्या निधनानंतर सुनेत्राताई मुंबईला निघाल्या आहेत अशी माहिती माध्यमांना देणारे, आता कुठे आहेत..? जगजीत सिंह राणा पाटील आपल्याला भेटले का? आपले त्यांच्याशी काही बोलणे झाले का? हल्ली ते बरेच ॲक्टिव्ह आहेत अशी माहिती आहे. ५२ पत्त्यांचा डाव विखुरलेला आहे. एकही सिक्वेन्स नीट लागत नाही. एखादा जोकर मध्ये टाकून रमी करण्याची जबाबदारी तुम्हीच घ्यावी अशी चर्चा आहे... म्हणून हा पत्र प्रपंच. तब्येत कशी आहे..?
तुमचाच, बाबूराव