विशेष लेख: कविता आजच्या काळाचं भेदक सत्य सांगते आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 08:56 IST2026-01-22T08:56:38+5:302026-01-22T08:56:58+5:30

सत्य ‘दुर्मीळ’ होत असताना आजच्या काळाची कविता आपल्याला केवळ अस्वस्थ करत नाही, नागरिकाला ती जाग आणते. मनात आशा जागवते.

Special Article: Poetry tells the penetrating truth of today's times! | विशेष लेख: कविता आजच्या काळाचं भेदक सत्य सांगते आहे!

विशेष लेख: कविता आजच्या काळाचं भेदक सत्य सांगते आहे!

योगेंद्र यादव, राष्ट्रीय संयोजक, भारत जोड़ो अभियान, सदस्य, स्वराज इंडिया

मी कुणी कवी नाही. श्रोता म्हणूनही कधी  कविसंमेलनाला जात नाही. काव्यसमीक्षेशी तर  माझा  दुरान्वयानेही संबंध आलेला नाही. केवळ  वाचक आहे मी कवितेचा. तोही नियमित नव्हे. खरं सांगायचं तर कवी मंडळींपासून मी जरा अंतर राखूनच असतो. कविता आणि राजकारण यांच्यातील नातं जाणत असलो तरी घोषणाबाज, दे दणादण  कवितांपासून चार हात लांबच राहतो. राजकारण समजून घेण्यासाठी मी कवितेच्या नव्हे तर समाजशास्त्रीय किंवा वैचारिक भाषेची मदत घेतो.

परंतु  सद्यकालीन वास्तव समजून घेण्यासाठी कविता हे आवश्यक माध्यम असल्याची जाणीव   गेल्या काही वर्षांपासून मला होऊ लागलीय. टीव्ही हास्यास्पद बनलाय आणि वृत्तपत्रे मूक झालीत. सत्य समाजमाध्यमांतून कधीकधी डोकावत राहतं,  पण लक्ष वेधून घेण्यासाठी त्यालाही आक्रस्ताळं व्हावं लागत आहे. अत्यंत सहजपणाने समग्र सत्य सांगणं  हे समाजमाध्यमांच्या आवाक्यातलं काम नाही. समाजशास्त्रीय भाषाही आता जुनी झालीय. जग झपाट्याने बदलत आहे. ट्रम्पने साऱ्या जगाबाबत आज जे चालवलंय त्याला फक्त अरेरावी, गुंडगिरी किंवा नवसाम्राज्यवाद म्हणणे अपुरे ठरेल.

गाझामध्ये जे  झालं त्याला केवळ नरसंहार म्हणणे पर्याप्त नाही. आपल्या देशात जे घडत आहे त्याला लोकशाहीची अवनती किंवा राज्यघटनेची गळचेपी म्हणणे पुरेसे नाही. हे वास्तव नेमकेपणाने व्यक्त करणारे नवे शब्द घडवायला शास्त्रांना बराच काळ लागेल. परंतु, कवितेला शास्त्रीय शिस्तीचं बंधन नसतं. कालप्रवाहाबरोबर ती सहज वाहू शकते. 

म्हणूनच परवा जागतिक पुस्तक प्रदर्शनात फिरत असताना   माझी नजर पुनः पुन्हा  कवितांचे संग्रह न्याहाळत  राहिली.  जुन्या कवींच्या कालातीत कविता आजही ताज्या वाटतात. स्वातंत्र्योत्तर हिंदी कवितेने राजकारण टाळलेलं नाही. अपूर्वानंद यांचा ‘कविता में जनतंत्र’ हा लेखसंग्रह कविता आणि लोकशाही यांच्यातील अतुट नात्याची आपल्याला आठवण करून देतो. हा संग्रह  गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी लिहिलेल्या एका  लेखमालेवर  आधारित आहे. यात रघुवीर सहाय, विजयदेव नारायण साही, कुंवर नारायण, श्रीकांत वर्मा, मुक्तिबोध, धुमिल, नागार्जुन, केदारनाथ सिंह, समशेर बहादूर सिंह, ओमप्रकाश वाल्मिकी, अशोक वाजपेयी, अनामिका यांच्यासह  हिंदी कवितेतील बहुतेक सगळ्या दिग्गज कवींचा अंतर्भाव आहे. समीक्षेची क्लिष्ट भाषा टाळून अपूर्वानंद प्रत्येक कवितेच्या निमित्ताने इतिहासाची काही पाने आपल्याला उलगडून दाखवतात.  अदनान कफिल दरवेश, जेसिंता केरकट्टा आणि अनुज लुगुन यांसारख्या तरुण कवींचा समावेश असल्याने या लेखसंग्रहात वर्तमानाचा आवाजही नोंदला गेला आहे. समकालीन वास्तव समग्र स्वरूपात व्यक्त करणारे अनेक दुर्मीळ स्वर या प्रदर्शनात माझ्या कानी पडले. आपण  इतिहासाच्या एका नव्या पर्वात प्रवेश करत आहोत या वस्तुस्थितीचे  पक्के  भान त्यांच्या कवितेला आहे. 

कवितेने काय केले पाहिजे, याची जबाबदारी कवी आपल्या परीने स्वीकारतात. अदनान कफिल दरवेश हे तसे अत्यंत तरुण कवी. पण ‘लानत का प्याला’ या  त्यांच्या तिसऱ्या कवितासंग्रहाद्वारे ते  आपल्या या काळाचा प्रमुख स्वर ठरले आहेत. ‘अच्छी कविता अच्छे दिनों में नहीं लिखी जाएगी.. वो आयेगी/ एक चमकिले फूल की तरह, स्वप्न में उगती हुई/ यथार्थ का जूता डाले/ किसी और समय में/ चुपके से दाखिल हो जाएगी..’ या संग्रहातील त्यांची ‘मुसलमान’ ही कविता म्हणजे इतिहासाच्या या काळाचा एक अस्सल दस्तावेज आहे. ‘ये कैसी इबादत है मुसलमानों की, जो कभी ख़त्म ही नहीं होती!/ हमलावर बाजू, पैर, गोलियाँ, फब्तियाँ, गालियाँ बरसते रहे/ और मुसलमान सिजदे में ही रहे.. वो धोखे से नहीं भरोसे में मारे जाने वाले लोग थे.. वे इतने कम्बख़्त थे कि उम्मीद न छोड़ने पर बाज़िद थे’। (इबादत: पूजा , सिजदा : दंडवत, फब्तियाँ: उपहास, टोमणे. बाज़िद : ठाम) ‘सब याद रखा जायेगा’ या अमीर अजीजच्या कवितेप्रमाणेच हीसुद्धा कविता ज्याबाबत आज बहुतेकांच्या  तोंडाला कुलूप  दिसते तेच वास्तव अत्यंत सच्चेपणाने आपल्यासमोर ठेवते. ‘सलिब पर नागरिकता’ या संग्रहात जावेद आलम खान हेच वास्तव ठणकावून सांगण्याचा धोका पत्करतात. ‘मेरा देश किताबों में क़ैद कोई देवता नहीं है.. देश तब हारता है जब उसे झंडे में छिपाया जाता है/ जब अपहृत रंग मज़हबी पहचान में बदल जाते हैं/ जब अपने ही नागरिक जबरदस्ती शत्रू खेमे में खड़े किए जाते हैं/ देश रोता है जनता के भीड़ में बदल जाने पर/ आदमी को कपड़ों से पहचाने जाने पर।

राजेंद्र राजन यांनी न्यायव्यवस्थेवर  लिहिलेल्या ओळी पुरेशा बोलक्या आहेत: ‘भेड़िये की शिकायत पर/ मेमने के ख़िलाफ़/ दर्ज कर ली गई एफ़आईआर.. फ़ैसला आना बाक़ी है/ मेमने काँप रहा है/ भेड़िया मुस्कुरा रहा है।’  (भेड़िया= लांडगा,  मेमना= कोकरू)

आजच्या काळाची ही कविता आम्हाला केवळ अस्वस्थ आणि निराश करून सोडत नाही, नागरिकाला ती जाग आणते. आपल्या मनात आशा जागवते. म्हणूनच तर आता मीही कविता वाचू लागलोय..

yyopinion@gmail.com

Web Title : कविता आज के समय का भेदन करने वाला सत्य बताती है!

Web Summary : कविता वर्तमान वास्तविकता को समझने के लिए आवश्यक है, टीवी और समाचार पत्रों से बेहतर। समकालीन कविताएँ निडरता से सामाजिक सत्य को दर्शाती हैं, पारंपरिक मीडिया और शैक्षणिक प्रवचन द्वारा छोड़े गए शून्य को भरती हैं, नागरिकों को जगाती हैं और निराशा के बीच आशा जगाती हैं।

Web Title : Poetry reveals the piercing truth of today's times!

Web Summary : Poetry is essential for understanding current reality, surpassing TV and newspapers. Contemporary poems fearlessly reflect societal truths, filling the void left by conventional media and academic discourse, awakening citizens and instilling hope amidst despair.