विशेष: एक पुस्तक, दोन आवृत्त्या...भिन्न पृष्ठसंख्या! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 10:30 IST2025-08-31T10:27:49+5:302025-08-31T10:30:20+5:30

भारतीय भाषांतून मराठीत पुस्तके अनुवादित करणे त्या मानाने सोपे, तरीही काही-काही तेच शब्द यांचा इतर भाषांत आणि मराठीत अर्थ वेगळा होतो...

Special article: One book, two editions...different page numbers | विशेष: एक पुस्तक, दोन आवृत्त्या...भिन्न पृष्ठसंख्या! 

विशेष: एक पुस्तक, दोन आवृत्त्या...भिन्न पृष्ठसंख्या! 

रामदास भटकळ
निरनिराळ्या भाषांतून मराठीत पुस्तके अनुवादाच्या रूपाने यावीत, असा माझा प्रयत्न सुरुवातीपासून राहिला आहे. विशेषत: भारतीय भाषांतून मराठीत पुस्तके अनुवादित करणे त्या मानाने सोपे, तरीही काही-काही तेच शब्द यांचा इतर भाषांत आणि मराठीत अर्थ वेगळा होतो. उदाहरणार्थ हिंदीत संशोधन; शिक्षा यांचा मराठीहून वेगळा अर्थ आहे. सिव्हिलायझेशन या इंग्रजी शब्दाचे मराठी संदर्भ वेगळे असतात. जर भारताने स्वातंत्र्य मिळताक्षणीच आपल्या वीस-पंचवीस भाषांतील श्रेष्ठ दर्जाचे ललित आणि वैचारिक साहित्य इतर भाषांत आणायला अग्रक्रम दिला असता, तर आज देशाचे स्वरूप बदलले असते. आज आसामी किंवा मल्याळी माणूस आणि त्यांची संस्कृती आपल्याला परकीय वाटते, तसे झाले नसते.

साहित्य अकादमी आणि नॅशनल बुक ट्रस्ट या अखिल भारतीय पातळीवरील संस्था आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळासारखी राज्यपातळीवरील संस्था यांनी काही प्रमाणात हे काम केले. परंतु, अनेकदा हे अनुवाद थेट एका भाषेतून दुसऱ्या भाषेत न होता इंग्रजी किंवा हिन्दी माध्यमातून केलेले आसायचे. शिवाय अनुवाद तपासणे (स्क्रुटिनी) या प्रक्रियेला आपण फारसे महत्त्व दिले नाही. भाषांतर तपासणे हे एक शास्त्र आहे आणि भाषांतर करण्यापेक्षाही ते अधिक महत्त्वाचे आणि कठीण आहे.
दोन उदाहरणे सांगण्याचा मोह होतो. एका हिन्दी पुस्तकाचा अनुवाद एका थोर कवीने मराठीत केला. दोन्ही भाषा आम्हाला येत असल्याने मी आणि माझा सहकारी कृष्णा करवार तपशिलात तपासून पाहत होतो. मधूनच एक संपूर्ण परिच्छेद निसटला होता हे लक्षात आले; तेव्हापासून आम्ही छापण्यापूर्वी शक्यतो कसोशीने अनुवाद तपासू लागलो.

दुसरा अनुभव माझ्या निवृत्तीनंतरचा. गिरीश कार्नाड यांच्या कानडी नाटकांचे मराठी अनुवाद आम्ही प्रसिद्ध करत असू. मला नाटकात रस असल्याने पुस्तक छापून झाल्यावर वाचण्याऐवजी मी प्रुफ वाचायची ठरवले. वाचता-वाचता एका शब्दावर अडखळलो. तो शब्द होता ‘मोतिबिंदू’. या शब्दाचा तिथे संदर्भ लागेना. कानडी मला येत नाही आणि नात्यातल्या कानडी येणाऱ्या कोणाला दाखवायला मूळ कानडी प्रकाशन धारवाडहून मिळवण्यापासून सोपस्कार करावे लागले असते. कार्नाड स्वतः काही नाटकांचे इंग्रजी अनुवाद करून ते प्रकाशित करून घेत. त्या इंग्रजी अनुवादात पाहतो तो मूळ शब्द ‘कॅटरॅक्ट’ असा होता आणि या इंग्रजी शब्दाचा एक अर्थ मोतिबिंदू असला तरी दुसरा अर्थ धबधबा हा तिथे चपखल बसत होता. नाटककाराला बेंगळुरूला फोन करून खातरजमा करून घेतली, परंतु अनुवाद न समजणाऱ्या परकीय भाषांतून असले, तर अशा वेळी अनुवादकावर विसंबून राहण्याखेरीज दुसरा उपाय नव्हता. या सवयीमुळे एकदा फजिती झाली. कुमारांसाठी लिहिलेल्या एका कथेचा जर्मन भाषेचा अभ्यास करणाऱ्या आमच्या लेखिका प्रा. ललित वालावलकर यांच्या मुलीने त्याचा अनुवाद केला होता. त्यांना आवडलेल्या धड्याचा मराठी अनुवाद त्यांनी इमानेइतबारे आम्हाला करून दिला. पुस्तक छोटेखानी होते, परंतु वाचल्यानंतर परिपूर्ण भासत होते, ते छापून घेतले.

त्यानंतर काही दिवसांनीच मी फ्रँकफुर्टच्या आंतरराष्ट्रीय ग्रंथजत्रेत भाग घेण्यासाठी गेलो. त्या अजस्त्र प्रदर्शनात हिंडताना एका जर्मन प्रकाशकाच्या स्टॉलवर मला मूळ जर्मन पुस्तक दिसले. मी मराठी आवृत्ती घेऊन गेलो होतो, ती मी काहीशा अभिमानाने त्या प्रकाशकाला आमचे छोटेखानी नीटसं पुस्तक दाखवले. ते लगेच म्हणाले, की काहीतरी घोटाळा आहे. मूळ पुस्तक कितीतरी मोठे आहे. तुम्ही ते संक्षिप्त केले आहे का? त्याचे उत्तर मी देऊ शकलो नाही. त्यांनी मला मूळ पुस्तकाची प्रत दिली आणि म्हणाले की तुम्ही आता हे संपूर्ण पुस्तक भाषांतरित करून घ्या. तो खर्च देण्याची आमच्याकडे तरतूद आहे. आम्ही त्याच्या दोन हजार प्रती विकत घेऊ.

परतल्यावर चारुशीला वालावलकर यांनी खुलासा केला की, त्यांच्या जर्मन क्रमिक पुस्तकात ही कथा संक्षिप्त स्वरूपात दिली आहे, याची त्यांना कल्पना नव्हती. त्यांनी नंतर संपूर्ण पुस्तकाचा अनुवाद करून दिला. ताकही फुंकून प्यायचे, या न्यायाने आम्ही तो कोणा जर्मन अध्यापकाकडून तपासून घेतला आणि त्यामुळे एकाच पुस्तकाच्या दोन आवृत्त्या निरनिराळ्या पृष्ठसंख्येच्या आम्ही प्रसिद्ध केल्या.

Web Title: Special article: One book, two editions...different page numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी