शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

अन्वयार्थ: लुसलुशीत पावाच्या पोटातल्या मुंबईत जन्मलेल्या बटाटेवड्याची साठ वर्षांची कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 7:23 AM

दादर रेल्वेस्थानकाबाहेर बटाटेवडे विकणाऱ्या अशोक वैद्यांना तब्बल ६० वर्षांपूर्वी जे स्वादिष्ट प्रकरण सुचले, त्याला आता जागतिक मान्यता मिळाली आहे!

रवींद्र राऊळ, मुक्त पत्रकार

मुंबईत जन्मलेल्या झणझणीत चवीच्या घमघमीत खमंग वडापावने अखिल विश्वातील सँडविचच्या जातकुळातील सर्वोत्तम पदार्थांच्या यादीत स्थान पटकावले, ही बातमी मुंबईकरांना भलतीच सुखावणारी आहे. मुंबईशी नाळ जोडला गेलेला वडापाव  आता या शहराच्या संस्कृतीचाच एक भाग झाला आहे. एखादा खाद्यपदार्थ एका शहराशी कसा एकरूप होतो आणि जगभरात प्रसिद्धी पावतो, याचे हे उदाहरण. टेस्ट ॲटलस या लोकप्रिय फूड ॲण्ड ट्रॅव्हल गाइडने जारी केलेल्या यादीत वडापावने १९ वा क्रमांक पटकावला; यानिमित्ताने मुंबईच्या वडापावने चार-पाच पिढ्यांचे पालनपोषण कसे केले, हे पाहायला हवे.

बटाटावडा हा खास मराठमोळा खाद्यपदार्थ. त्याचा वडापाव करत तो पोटभरीचा खाद्यपदार्थ करण्याची किमया साधली ती अशोक वैद्य यांनी.  दादर रेल्वेस्थानकाबाहेर बटाटेवडे विकणाऱ्या अशोक वैद्य यांनी  स्वादिष्ट बटाटावड्याची मोट इराणी हॉटेलात मिळणाऱ्या लुसलुशीत पावाशी बांधली. पाव सुरीने कापून आतील भागात मिरची आणि कोथिंबिरीची हिरवीगार तसेच लसणाची लालभडक चटणी चोपडून त्यात बटाटेवडा कोंबून विकण्याची आयडिया वैद्यांची! त्याला खवय्यांचा भरघोस प्रतिसाद मिळण्याची कारणे अनेक.   तेव्हा दादरमध्येच राहणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेही या वडापावचे चाहते होते. महापालिका अधिकाऱ्यांकडून वैद्यांच्या स्टॉलला विरोध होत असल्याचे समजताच त्यांनी त्या अधिकाऱ्यांना आपल्या भाषेत समज दिली.  दाक्षिणात्य खाद्यपदार्थांशी स्पर्धा करण्यात मराठी वडापाव विक्रेत्यांना राजकीय पाठबळ दिले ते शिवसेनाप्रमुखांनी. वडापावच्या चवीत अधिकची भर टाकायला त्या वेळची एकूणच मुंबईची सामाजिक स्थितीही कारणीभूत ठरली. सहा दशकांपूर्वीच्या त्या काळात मुंबईत गिरणी उद्योगाचे वर्चस्व होते. वेतन तुटपुंजे असल्याने  गिरणी कामगारांना हा स्वस्त आणि मस्त खाद्यपदार्थ एकदमच भावला. प्रत्येकी दहा पैशांना मिळणारे दोन-चार वडापाव खाऊन एकवेळची भूक आरामात निभावली जाई...

कालांतराने गिरण्यांचा संप झाला तेव्हा  कामगारांच्या पोटाची दोन्ही अर्थाने खळगी भरण्यासाठी वडापावच धावून आला.  नाक्यानाक्यावरच्या वडापावच्या गाड्यांनी बेरोजगार झालेल्या हजारो गिरणी कामगारांना रोजगार मिळवून दिला. काही कामगारांनी गाड्या लावल्या, तर काहींना त्या गाड्यांवर बटाटेवडे तळण्याचे, साफसफाईचे, धंदा सांभाळण्याचे काम मिळाले. मुंबई सोडण्याची वेळ आलेल्या अनेक गिरणी कामगारांनी मुंबईचा निरोप घेताना वडापावही आपल्यासोबत नेला नशीब आजमावण्यासाठी परप्रांतातून मुंबईत येऊन संघर्ष करणाऱ्यांसाठीही वडापाव  तारणहार ठरतो.  वडापाव आता जगभरातील अनेक देशांमध्ये उपलब्ध झाला आहे. रिझवी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी २०१४ मध्ये लंडनमध्ये वडापावचे हॉटेल सुरू केले. आरोग्यतज्ज्ञ डीप फ्राय वडापाव कमी प्रमाणात खाण्याचे कितीही इशारे देत असले तरी दरवर्षी २३ ऑगस्टला जागतिक वडापाव दिन गाजावाजा करत साजरा केला जातो.

उद्योगपती धीरज गुप्ता यांनी वडापावचे भारतीय बर्गरमध्ये रूपांतर करून फूड चेन सुरू केली असली तरी रस्त्यावरील वडापावची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. अमेरिकन फास्ट फूड चेन मॅकडोनल्डने १९९० मध्ये भारतात फास्ट फूड चेन सुरू केली तेव्हा वडापावची लोकप्रियता घटेल अशी अटकळ बांधली जात होती. पण, वडापाववर त्याचा काहीही परिणाम झाला नाही.

टेस्ट ॲटलसच्या यादीत वडापावला मिळालेली जागा म्हणजे कधीकाळी उच्चभ्रूंकडून बॉम्बे बर्गर म्हणून हिणवल्या गेलेल्या वडापाववर उमटलेली वैश्विक मान्यतेची मोहरच होय.

ravirawool@gmail.com

 

टॅग्स :MumbaiमुंबईDadar Stationदादर स्थानक