शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधार्‍यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
4
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
5
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
6
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
7
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
8
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
9
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
10
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
11
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
12
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
13
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
14
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
15
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
16
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
17
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
18
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
19
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
20
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?

विशेष लेख: डॉ. मनमोहन सिंग, मी आज कबूल करतो, की आज होत असलेला गौरव म्हणजे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 06:41 IST

डॉ. मनमोहन सिंग यांचा आज होत असलेला गौरव म्हणजे त्यांच्या धोरणापायी देश बरबाद होईल ही तत्कालीन भविष्यवाणी खोटी ठरल्याची कबुलीच आहे

योगेंद्र यादव, राष्ट्रीय संयोजक, भारत जोड़ो अभियान सदस्य, स्वराज इंडिया

डॉ. मनमोहन सिंग यांच्या निर्वाणानंतर समाजाच्या सर्वच थरातून त्यांच्याबद्दलचा प्रेमादर उफाळून आलेला  दिसला. एका अर्थाने हे काहीसे आश्चर्याचेच होते. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तित्वात मुळीच करिष्मा नव्हता. त्यांना खास  आपलाच  असा काही व्यापक जनाधारही नव्हता. मोहिनी घालणारे वक्तृत्वसुद्धा त्यांच्यापाशी नव्हते. ज्या सर्वसामान्य लोकांना त्यांच्या विविध धोरणांचा लाभ मिळाला त्यांना तो त्यांच्यामुळे मिळाल्याची जाणीवसुद्धा नसेल. त्याची जाणीवपूर्वक आठवण करून देत राहील असा स्वतःचा राजकीय वारसही त्यांना नाही. पंतप्रधानपद भूषविलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या निधनानंतर रूढ निवेदने, पोकळ स्तुती किंवा ठरावीक भक्तांनी आणि पक्षाने केलेले गुणगान अशा गोष्टी शिरस्त्यानुसार होतच असतात. परंतु  अशी औपचारिक स्तुती कटु वास्तवाच्या ओझ्याखाली लवकरच गुदमरून  जाते.  यावेळी मात्र असे झाले नाही. डॉ. सिंग गेल्यानंतर त्यांच्याबद्दलचे प्रेम आणि आदर चाेहोबाजूंनी  उचंबळून आलेला दिसला. विशिष्ट समुदाय, पक्ष किंवा विचारसरणीपुरता तो मर्यादित नाही. कुणा आयटी सेलची सुनियोजित प्रेरणा ही त्यामागे नाही. उलट समाजमाध्यमात त्यांच्याविरुद्ध दुष्ट प्रचार करण्याचा प्रयत्न झाला तरी तो मुळीच यशस्वी होऊ शकलेला नाही. अखेरीस भाजपच्या जल्पकांनाही हार मानून, मनमोहन सिंग यांच्या प्रशंसेत सामील व्हावे लागले.  डॉ. सिंग यांचे व्यक्तित्व हेच याचे प्रमुख आणि स्वाभाविक कारण होय. छोट्या गावातून ऑक्सफर्ड केंब्रिजपर्यंतचा त्यांचा प्रवास, एका गरीब कुटुंबात जन्म घेऊन सत्तेतील सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचेपर्यंत  त्यांनी केलेला अथक संघर्ष आणि त्यांच्या यशस्वी जीवनप्रवासापेक्षा त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तित्व जास्त महत्त्वाचे ठरते. या व्यक्तित्वामुळेच त्यांचे यश अधिक खुलून दिसत असे. त्यांना प्रत्यक्ष  भेटणाऱ्या लोकांना त्यांच्या  मितभाषी, मृदुभाषी आणि  विनयशील स्वभावाचे लोभस दर्शन  घडत असे. प्रस्तुत लेखकालाही त्यांच्या भेटीचे भाग्य लाभले होते. एवढ्या उच्च सत्तास्थानी असूनही या माणसाकडे नावालासुद्धा  अहंकार नाही ही गोष्ट त्यांना लांबून पाहणाऱ्याच्याही सहज लक्षात येई. अर्थमंत्री असतानाही स्वतःची मारुती ८०० स्वतः चालवणे, आपल्या कुटुंबातील एकाही व्यक्तीला आपल्या सत्तेचा फायदा देणे सोडाच,  तिला सत्तेच्या आसपासही  फिरकू न देणे -  असले किस्से सगळ्यांना मुळीच माहीत नव्हते. तरीही ‘साधा माणूस’ ही त्यांची प्रतिमा सामान्य माणसापर्यंत पोहोचली होती. भारतीय मानस सत्ता स्पर्धेतील खेळाडूंना शंभर खून माफ करते, त्यांच्या लाख दोषांकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करते ही गोष्ट खरी आहे. पण  या साऱ्यापासून अलिप्त असणाऱ्या विरळा व्यक्तीला त्यांच्या हृदयात एक विशेष स्थान असते. लालबहादूर शास्त्री, अब्दुल कलाम अशा व्यक्तींना यापूर्वी असे स्थान लाभले होते. मरणोत्तर का असेना डॉ. सिंग यांना त्यांच्या बरोबरीचे स्थान  प्राप्त झाले आहे.  डॉ. सिंग पंतप्रधानपदी असताना त्यांच्या नेतृत्वावर अनेक आक्षेप घेण्यात आले. त्यांना बदली  नेता, मुखवटा म्हणून हिणवण्यात आले.  आज आपल्याला स्वच्छ दिसते की भले सोनिया गांधी डॉ. सिंग यांना निर्देश देत असोत, त्यांचा लगाम एखाद्या उद्योगपतीच्या हातात मुळीच नव्हता. सोनिया तर त्यावेळच्या अत्यंत लोकप्रिय नेत्या होत्या आणि त्यांनाच निवडणुकीतून   जनादेश  मिळाला होता. डॉ. सिंग यांच्या मंत्रिमंडळावर आरोपांच्या फैरी झडल्या पण खुद्द त्यांच्यावर  एका पैशाच्याही  अफरातफरीचा आरोप कधी  झाला नाही. त्यांच्या दुसऱ्या सरकारच्या अंतिम पर्वात माध्यमांनी त्यांच्यावर खूप आरोप केले, त्यांची टिंगल उडवली. तरीही त्यांनी माध्यमांना सामोरे जाणे थांबवले नाही. विचारलेल्या सर्व बऱ्या वाईट प्रश्नांची शांतपणे उत्तरे दिली. त्यांच्या सरकारविरुद्ध रस्त्यावर आंदोलने झाली. परंतु एकाही  राजकीय विरोधकांवर त्यांनी सूडभावनेने कारवाई केली नाही. कुणाच्याही घरावर इन्कम टॅक्स किंवा इडीची धाड पडली नाही. माझ्यासारख्या विरोधकांना ते सन्मानाची वागणूक देत राहिले. प्रस्तुत लेखक स्वानुभवाने सांगू शकतो की विरोधकांबद्दल त्यांना वाटणारे प्रेम आणि आदर कधी कमी झाला नाही. हा केवळ एक वैयक्तिक गुण नव्हता. लोकशाहीनिष्ठ सभ्यतेची ती प्रस्थापित परंपरा होती.  आज मनमोहन सिंग यांच्याबद्दल सर्वत्र उफाळून आलेला प्रेमादर हा एक प्रकारे गेल्या दहा वर्षात पुरत्या उद्ध्वस्त होत चाललेल्या त्या परंपरांचाच गौरव आहे. डॉ. सिंग यांनी नवे आर्थिक धोरण लागू केले तेव्हा  बहुतेक साऱ्या जन आंदोलनांनी आणि पुरोगामी राजकीय नेत्यांनी त्या धोरणाची ‘जनविरोधी आणि देशविरोधी’ अशी संभावना केली होती. आपली अर्थव्यवस्था त्यामुळे उद्ध्वस्त होईल अशी भीती व्यक्त केली होती. खाजगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरण यांना विरोध हाच आजही पुरोगामी राजनीतीचा प्रमुख घोषा असतो. परंतु डॉ. सिंग यांचा आज होत असलेला गौरव म्हणजे त्यांच्या धोरणापायी देश बरबाद होईल ही  भविष्यवाणी खोटी ठरल्याची कबुलीच आहे. मनमोहन सिंग यांच्या गौरवपूर्ण पुण्यस्मरणातून  आपल्या वैचारिक हट्टाग्रहांची  पुनर्तपासणी करण्याची सुप्त इच्छाच प्रकट होत असते. स्वर्गीय मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करणे  म्हणजे एका  कठीण काळात, वैयक्तिक नैतिकता, लोकशाही परंपरा, आणि प्रामाणिक वैचारिक खंडनमंडन या परंपरागत  भारतीय वारशाचे स्मरण करणे होय.

टॅग्स :Manmohan Singhडॉ. मनमोहन सिंगEconomyअर्थव्यवस्था