अटलजी, हा देश तुमच्याप्रति सदैव कृतज्ञ राहील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 07:21 IST2024-12-25T07:20:13+5:302024-12-25T07:21:14+5:30

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज शंभरावी जयंती. त्यानिमित्त, देशाला मजबूत स्थैर्य देणाऱ्या कविमनाच्या अटलजींची विनम्र आठवण!

Special article on 100th birth anniversary of former Prime Minister Late Atal Bihari Vajpayee | अटलजी, हा देश तुमच्याप्रति सदैव कृतज्ञ राहील!

अटलजी, हा देश तुमच्याप्रति सदैव कृतज्ञ राहील!

नरेंद्र मोदी
पंतप्रधान

आज २५ डिसेंबर २०२४. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयीजी यांची आज शंभरावी जयंती. एकविसाव्या शतकात प्रवेश करताना भारताचे स्थित्यंतर घडवून आणणारे शिल्पकार म्हणून आपला देश अटलजींप्रति सदैव कृतज्ञ राहील. पंतप्रधान म्हणून त्यांनी १९९८ मध्ये शपथ घेतली तेव्हा आपला देश राजकीय अस्थिरतेच्या गर्तेतून बाहेर पडत होता. नऊ वर्षात लोकसभेच्या चार निवडणुका झाल्या होत्या. जनतेचा संयम सुटत चालला होता. अटलजींनी स्थिर आणि प्रभावी सरकार देऊन हा प्रवाह उलट दिशेने वळवत परिस्थिती पालटवली. अटलजी स्वतः सामान्य पण सत्शील कुटुंबातून आले असल्यामुळे, सामान्य नागरिकांना करावा लागणारा संघर्ष आणि परिणामकारक राज्यकारभारातून घडवून आणता येऊ शकणाऱ्या परिवर्तनाची ताकद, ते जाणून होते. 

अनेक क्षेत्रांमध्ये अटलजींच्या नेतृत्वाचा दीर्घकालीन प्रभाव दिसून येतो. त्यांच्या कारकिर्दीत भारताने माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार आणि संपर्क व्यवस्थेच्या जगात मोठी ड्रोप घेतली. भारतातील मुख्य ठिकाणे चहू दिशांनी जोडणान्या सुवर्ण चतुष्कोन या महामार्ग प्रकल्पाची आठवण आजही महत्त्वाची आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेसारख्या उपक्रमांद्वारे स्थानिक दळणवळण वाढवण्याचे वाजपेयी सरकारचे प्रयत्नही तितकेच उल्लेखनीय होते. देशातील सर्वांना विशेषतः गरीब आणि वंचित घटकांना आधुनिक शिक्षण उपलब्ध असेल, अशा आधुनिक भारताची उभारणी करण्याचे स्वप्न अटलजींनी पाहिले होते. त्यांच्या सरकारने अनेक आर्थिक सुधारणा करून भारताच्या आर्थिक उत्थानाचाही पाया रचला.

१९९८च्या उन्हाळ्यातली घटना, अटलजींचे सरकार नुकतेच सत्तेवर आले होते आणि ११ मे रोजी भारताने ऑपरेशन शक्ती या नावाने ओळखली जाणारी पोखरण अणुचाचणी केली. या अणुचाचणीने भारताच्या वैज्ञानिक समुदायाच्या सामर्थ्याची वेगळी ओळख जगासमोर आणली. भारताने अणुचाचणी केल्याने संपूर्ण जग थक्क झाले. काही देशांनी याबद्दल विनाकारण संतापाचेदेखील प्रदर्शन केले. यावेळी एखाद्या सामान्य नेत्याने कच खाल्ली असती, पण अटलजींनी मागे पाहिले नाही. भारत खंबीर राहिला आणि दोन दिवसांनी १३ मे रोजी आणखी चाचण्या करत सरकारने आपला निर्धार दाखवून दिला.

भारतीय राजकारणातील आघाड्यांची व्याख्या बदलणाऱ्या रालोआचे अध्यक्षपद अटलजींनी भूषवले. विरोधकांच्या टीकेला आपल्या स्वतःच्या शैलीने आणि विद्वत्तापूर्ण संवादांनी बोथट करण्यात अटलजी माहीर होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा बराच काळ त्यांनी विरोधी बाकांवर व्यतीत केला होता, पण त्यांनी कधीही कोणाविरोधात मनात कडवटपणा ठेवला नाही.

संधिसाधू डावपेचांचा वापर करून सत्ता मिळवण्याची हाव अटलजींना कधीही नव्हती. १९९६ मध्ये घोडेबाजार आणि घाणेरड्या राजकारणाच्या मार्गावर चालण्यापेक्षा त्यांनी राजीनामा देणे योग्य मानले. १९९९ मध्ये केवळ एका मताने त्यांच्या सरकारचा पराभव झाला. अशा प्रकारच्या अनैतिक राजकारणाला आव्हान देण्याचा सल्ला त्यांना अनेकांनी दिला, मात्र त्यांनी नियमांना अनुसरून वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. शेवटी जनतेनेच त्यांना भव्य बहुमताने पुन्हा एकदा सत्तेवर आणले.

भारताचे परराष्ट्रमंत्री म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभांमध्ये हिंदी भाषेत भाषण करणारे ते पहिले भारतीय नेते ठरले. त्यांच्या या कृतीतून भारताचा वारसा आणि अस्मितेबद्दलचा त्यांचा अपार अभिमान दिसून येतो.

भाजपच्या माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे तर हे भाग्यच, की आम्हाला अटलजींसारख्या व्यक्तिमत्त्वाकडून शिकता आले, त्यांना जाणून घेता आले, त्यांच्याशी संवाद साधता आला. लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या दिग्गज सहकाऱ्यांच्या सोबतीने त्यांनी पक्षाला त्याच्या स्थापनेपासूनच आकार दिला, खडतर आव्हाने, अपयश आणि विजयाच्या काळात दिशा दाखवली. जेव्हा जेव्हा विचारधारा आणि सत्ता यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आली, त्या त्या वेळी त्यांनी कायमच विचारधारेचीच निवड केली.
 

Web Title: Special article on 100th birth anniversary of former Prime Minister Late Atal Bihari Vajpayee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.