विशेष लेख: भारतीय शेअर बाजारात लवकरच नवा ‘बुल रन’... सकारात्मक वाटचाल होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 11:01 IST2025-11-06T11:00:58+5:302025-11-06T11:01:44+5:30
येत्या एक ते तीन वर्षांच्या कालावधीत भारतीय शेअर बाजाराची वाटचाल अत्यंत सकारात्मक दिशेने होईल, असे संकेत आहेत. गुंतवणूकदारांनी तयारीत असावे!

विशेष लेख: भारतीय शेअर बाजारात लवकरच नवा ‘बुल रन’... सकारात्मक वाटचाल होणार!
केतन गोरानिया, वित्तीय सल्लागार
मे २०२४ मध्ये लिहिलेल्या एका लेखात मी गुंतवणूकदारांना नफानिश्चिती करून भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करताना सावध राहण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी भारतीय शेअर बाजाराचे बाजारमूल्य पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स या विक्रमी पातळीवर पोहोचले होते. जवळजवळ १८ महिन्यांनंतर, बाजारात सतत नव्या लिस्टिंग्जची भर पडत असूनही हे मूल्य सध्या सुमारे ४.५ ट्रिलियन डॉलर आहे. म्हणजेच बाजारात ‘हेल्दी करेक्शन’ झाले आहे, असे म्हणता येईल. अनेक स्मॉल आणि मिडकॅप शेअर्स अजूनही त्यांच्या उच्चांकापेक्षा ३० ते ५० टक्के खाली आहेत, पण या एकत्रीकरणाच्या (consolidation) टप्प्याने शेअर बाजाराचा पाया भक्कम केला आहे.
गेल्या वर्षभरात भारताचा ‘लार्ज-कॅप’ निर्देशांक, NIFTY 50, जेमतेम ७ ते ९ टक्के परतावा देऊ शकला आहे. आशियातील इतर शेअर बाजारांनी मात्र या तुलनेत चांगली कामगिरी केलेली दिसते. (MSCI चीन निर्देशांक : अंदाजे ३०-३५ टक्के, MSCI तैवान निर्देशांक : २८-३० टक्के परतावा). आशियातील इतर शेअर बाजारांच्या तुलनेत मिळत असलेल्या या कमी परताव्यामुळे आणि स्थिर कॉर्पोरेट नफ्यामुळे भारतीय शेअर्सचे मूल्यांकन इतर उदयोन्मुख बाजारांच्या तुलनेत अधिक वाजवी झाले आहे.
गेल्या दोन तिमाहींमध्ये, मोठ्या कंपन्यांनी (IT वगळता) सुमारे १०-११ % इतकी करोत्तर नफ्यातील वाढ नोंदवली आहे, तर मिड-कॅप कंपन्यांची (IT वगळता) ही वाढ सुमारे १७ % राहिली आहे. भारतीय शेअर्स अजूनही प्रीमियमवर व्यवहार करत असले तरी तो प्रीमियम देशातील व्यापक आर्थिक स्थैर्य, पारदर्शकता आणि मजबूत कॉर्पोरेट गव्हर्नन्समुळे लौचिकच म्हणावा लागेल. परकीय गुंतवणुकीत गेल्यावर्षी घट झाली होती, पण आता कमाईच्या नव्या शक्यता आणि संतुलित मूल्यांकन यांचा मिलाफ जुळून आल्यामुळे परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारे वातावरण देशात पुन्हा तयार होत आहे. शतकाच्या सुरुवातीला भारताच्या आयटी क्षेत्राने वायटूकेच्या संकटाचे संधीत रूपांतर केले आणि जागतिक तंत्रज्ञानाचे केंद्रस्थान असा लौकिक मिळवला. आज कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) तंत्रज्ञानाचे क्षेत्र धोक्यात येईल, अशी भीती असली तरी त्यात नव्या स्थित्यंतराची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात आहे.
जागतिक स्तरावर एआयसाठीच्या पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक वेगाने वाढत असल्याने कुशल व्यावसायिकांना मोठी मागणी निर्माण झाली आहे. अमेरिकेत आणि युरोपमध्ये ऊर्जा आणि परिसंस्थेच्या मर्यादा असल्याने भारत या संधींचा मोठ्या प्रमाणात लाभ घेऊ शकतो. इंग्रजी बोलणारे कुशल कामगार, तुलनेने कमी खर्च आणि उत्क्रांत झालेली डिजिटल परिसंस्था यामुळे भारत एक महत्त्वाचे ‘एआय केंद्र’ म्हणून उदयाला येऊ शकतो. हे बदलते वातावरण डेटा सेंटर्स आणि संबंधित सेवांमध्ये नव्या गुंतवणुकीला पोषक असल्याने रोजगार निर्मिती होईल, उत्पन्न वाढेल आणि दीर्घकालीन ‘जीडीपी’ वाढीस हातभारही लागेल.
सरकारच्या अलीकडील जीएसटी दर कपातीमुळे घरगुती पातळीवर दरवर्षी सुमारे १.७ लाख कोटी रुपयांची बचत होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे देशांतर्गत उपभोग अधिक बळकट होऊन बाजारपेठेत तेजी राहील. मध्यमवर्गीय ग्राहकांनी ही ‘बचत’ कारणी लावणे सुरू केल्याने वस्तू आणि सेवांची वाढती मागणी कायम राहील. उपभोगातील वाढीमुळे ग्राहक कंपन्यांचा महसूल वाढेल. कॉर्पोरेट कमाईची गती टिकून राहील. पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक आणि वित्तीय शिस्तीच्या पार्श्वभूमीवर हे सारे घटक भारतीय बाजाराच्या वाढीसाठी अनुकूल आहेत.
अमेरिकन फेडरल रिझर्व्हने त्यांच्या आर्थिक धोरणाचे सामान्यीकरण (monetary normalization) सुरू ठेवल्याने अल्पावधीसाठी बाजारात थोडी अस्थिरता राहू शकेल, काही परकीय भांडवल बाहेर जाऊ शकेल; तरीही भारताची व्यापक आर्थिक स्थिती मजबूत आहे. नियंत्रित चलनवाढ, बळकट परकीय चलनसाठा आणि सक्षम बँकिंग प्रणाली हे या आर्थिक मजबुतीचे प्रमुख आधारस्तंभ!
येत्या एक ते तीन वर्षांच्या कालावधीत भारतीय शेअरबाजाराची वाटचाल अत्यंत सकारात्मक दिसते. कमाईतील वसुली, धोरणात्मक सातत्य आणि नव्या परकीय प्रवाहांमुळे पुढील तेजीच्या टप्प्यासाठी पूरक वातावरण तयार होत आहे. गुंतवणूकदारांनी या गोष्टीची अद्याप पुरेशी दखल घेतलेली दिसत नाही.
गुंतवणूकदारांनी चिकित्सकपणे गुंतवणूक करावी आणि ज्या शेअर्समध्ये परकीय संस्थात्मक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आहे, त्या शेअर्सपासून दूर राहावे. अधिक आकर्षक संधी भांडवली-गुंतवणूकप्रधान देशांतर्गत क्षेत्रांमध्येच आहेत. उदा. - कॅपिटल गुड्स आणि अभियांत्रिकी, वीज व वीज उपकरणे, वीज वितरण, रिअल इस्टेट आणि सिमेंट, पायाभूत सुविधा आणि संबंधित उद्योग, सुसंघटित किरकोळ व्यवसाय, बँकिंग-वित्तीय सेवा आणि पर्यटन.
सरकार पडण्याची शक्यता हा एकमेव महत्त्वाचा धोका सोडल्यास या बाजारातील गुंतवणूक सुरक्षित असू शकते. नव्या तेजीचा टप्पा येत्या काही महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे रोख पैसे आहेत अशा गुंतवणूकदारांनी चांगले शेअर्स हळूहळू गोळा करावेत. ज्यांच्या बॅलन्स शीट मजबूत आहेत, त्यांनी संयम आणि शिस्त राखल्यास पुढील तीन वर्षांत भारताच्या वाढत्या आर्थिक यशाचे भागीदार होणाऱ्यांना चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे.