विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?

By यदू जोशी | Updated: April 10, 2026 08:48 IST2026-04-10T08:47:40+5:302026-04-10T08:48:38+5:30

‘सभ्यता अन् संस्कृती म्हणून माघार घेतली’, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणतात; पण मग उमेदवार देतानाच या सभ्यतेचा विचार केला नव्हता का?

Special Article If Congress withdrew from the Baramati by-election, why did it make a fuss first? | विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?

विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?

यदु जोशी, राजकीय संपादक, लोकमत

मुंबईच्या लोकलमध्ये तुम्ही तुमचे नाक पुसण्यासाठी खिशातून रुमाल काढायला जाता तर बाजूच्याच्या खिशात हात जातो आणि त्या रुमालाने तुम्ही तुमचे नाक पुसायला गेलात तर रेटारेटीत तुम्ही बाजूच्याचे नाक पुसता. हा विनोद आठवला तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी काँग्रेसने माघार घ्यावी म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांना भेटले तेव्हा. असो! - काँग्रेसने अखेर बारामतीतून माघारीचा निर्णय घेतला; पण, यानिमित्ताने जे काही घडले त्याची चिकित्सा होणे आवश्यक आहे. 

नेत्यांच्या भूमिकांमधील बदल यानिमित्ताने बघायला मिळाला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुनेत्रा यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिल्याचे जाहीर समर्थन तीन दिवसांपूर्वी केले होते. ‘स्थानिक राजकीय परिस्थितीच्या आधारे लढण्याचे स्वातंत्र्य लोकशाहीत प्रत्येक पक्षाला आहे आणि निवडणूक बिनविरोध होण्याची काही गरज नाही,’ असे ते म्हणाले होते. मात्र, त्याच पवारांनी काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी मल्लिकार्जुन खरगे यांना गुरुवारी फोन केला आणि खरगे यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही वृत्त आले. काँग्रेसच्या उमेदवारीचे आधी समर्थन करणे आणि नंतर त्याच काँग्रेसला माघारीसाठी गळ घालणे हा विरोधाभास ठळकपणे जाणवला.

भूमिकेवर यूटर्न का?

बारामतीची जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाकडे आहे, तेव्हा ती त्यांनी लढवावी आणि ते तसे करणार नसतील तर आम्ही नक्कीच निवडणूक लढवू,’ असे सपकाळ यांनी जाहीर केले होते. शरद पवारांचा पक्ष लढला तर नाहीच; शिवाय त्यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला. काँग्रेसने उमेदवार दिला; पण, माघार घेत यूटर्न घेतला. हरो वा जिंको, पंजा सगळीकडे पोहोचला पाहिजे म्हणून सपकाळ स्वबळाचा नारा देत असतात, बारामतीतही त्यांनी तेच केले; पण, त्यांना माघार घ्यावी लागली. सपकाळ यांना निर्णयस्वातंत्र्य नाही, हे तर स्पष्ट झालेच; शिवाय त्यांच्या नेतृत्वाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. अजित पवार यांच्या अपघाती निधनात एफआयआर महाराष्ट्र पोलिसांनी नोंदविला तर काँग्रेस माघार घेईल, असे हर्षवर्धन सपकाळ आणि बारामतीतील काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी म्हटले होते. तसे काहीही झाले नाही, तरीही काँग्रेसने माघार घेतली. या माघारीद्वारे काँग्रेसने एकप्रकारे भाजपच्या मित्रपक्षाला मदतच केली.

विधान पार्थचे, माफी रोहितची

‘काँग्रेसचा डाउनफॉल सुरू झाला आहे,’ असे विधान पार्थ पवार यांनी केले. त्यामुळे काँग्रेस  दुखावणे साहजिक होते. ‘महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलेच बरे,’ अशी प्रतिक्रिया देत काँग्रेसने सात्त्विक संताप व्यक्त केला. खरेतर, पार्थ पवार माफी मागत नाहीत तोवर आम्ही बारामतीत माघार घेणार नाही, असे सपकाळ यांनी ठणकवायला हवे होते; पण, तसे काही झाले नाही. पार्थ पवार यांच्या वतीने रोहित पवार यांनी माफी मागितली म्हणतात, तेही ऐकले कोणी? पण, तशी बातमी मात्र सोडण्यात आली. 
डाउनफॉल सुरू झाला आहे, असे विधान करणाऱ्या पार्थ यांच्या आईसाठी काँग्रेसने माघार घ्यावी हा डाउनफॉल नाही का? बारामतीत माघारच घ्यायची होती तर मग उमेदवार देण्याचा फार्स का करण्यात आला? काँग्रेसने स्वबळावर लढावे ही भूमिका असू शकते; पण, स्वनिर्णयानेच सगळे ठरेल, हे कितपत योग्य आहे, अशी चर्चा आता पक्षात होत आहे. ‘सभ्यता अन् संस्कृती म्हणून माघार घेतली,’ असे सपकाळ म्हणतात. मग उमेदवार देताना सभ्यता अन् संस्कृतीचा विचार केला नव्हता का?- हा प्रश्न आहेच.

सपकाळ यांना काय मिळाले?

बारामतीतील उमेदवारीचा घोळ घालून सपकाळ यांना काहीच मिळाले नाही असे नाही. त्यांना वेड्यात काढणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फोन केला. शरद पवार, सुनेत्रा पवारांपासून अनेकांचे विनंती करणारे फोन मल्लिकार्जुन खरगे, सपकाळ यांना गेले. आधी रोहित पवार मग अजित पवार गटाचे शिष्टमंडळ सपकाळांना भेटायला गेले, विनवणी केली आणि त्यानिमित्ताने गुरुवारच्या राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी ते राहिले, एवढेच त्यांना मिळाले. आकाश मोरे हे निवडणूक लढून फेमस झाले नसते त्यापेक्षा न लढून जास्त फेमस झाले.

एवढे तरी केले का?

राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळू शकली नाही; कारण, शरद पवार त्या जागेवर निवडून गेले. आता विधान परिषदेची एक जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे, ती उद्धवसेनेला मिळेल आणि पवार यांनीही उद्धव ठाकरे देतील तो उमेदवार मान्य असेल, असे म्हटले असल्याचे वृत्त चार दिवसांपूर्वी आले होते. आता बारामतीतून माघार घेण्याच्या मोबदल्यात काँग्रेसने निदान विधान परिषदेची जागा (बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यासाठी) तरी आपल्या पदरात पाडून घ्यायला हवी होती. ‘आम्ही सुनेत्रा पवारांसाठी माघार घेतो; पण, शरद पवार गटाने विधान परिषदेसाठी आम्हाला पाठिंबा द्यावा आणि वेळ आली तर अजित पवार गटाने त्यांची शिल्लकची मते काँग्रेसला देऊ असे मान्य करावे,’ एवढी अट तरी काँग्रेसने घातली की नाही?- ते प्रत्यक्ष निवडणूक होईल तेव्हाच समजेल.

yadu.joshi@lokmat.com

Web Title : बारामती उपचुनाव: कांग्रेस ने शुरुआती उत्साह के बाद क्यों पीछे हटी?

Web Summary : बारामती से कांग्रेस के पीछे हटने से सवाल उठते हैं। पवार का बदलता रुख, सपकाल की बेबसी और पार्टी की विधान परिषद सीट के लिए स्थिति का लाभ उठाने में विफलता पर प्रकाश डाला गया। क्या शुरुआती उम्मीदवारी सिर्फ एक दिखावा थी?

Web Title : Baramati Bypoll: Why Did Congress Back Down After Initial Enthusiasm?

Web Summary : Congress's Baramati retreat raises questions. Pawar's shifting stance, Sapkal's helplessness, and the party's failure to leverage the situation for a legislative council seat are highlighted. Was the initial candidacy a mere facade?