विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
By विजय दर्डा | Updated: November 17, 2025 06:57 IST2025-11-17T06:55:02+5:302025-11-17T06:57:16+5:30
भय हरण्याचेच नव्हे, तर जिंकण्याचेही असते. घाबरण्याची सुरुवात घरापासूनच होते. भय प्रत्येकाच्या मनात असते; पण निर्भयपणापेक्षा मोठे हत्यार नाही, हेही खरे!

विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
डॉ. विजय दर्डा
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड,
लोकमत समूह
आज माझ्या स्तंभाचा विषय दार्शनिक विचारांचा परिणाम आहे. मी दर्शनशास्त्राचा अभ्यास करत आलो आणि आतून थोडाफार दार्शनिकसुद्धा आहे. त्यामुळे आज वाटते आहे, की प्रत्येकाच्या जगण्याचा भाग असलेल्या एका विषयावर आज लिहावे... भय, भीती...! आपल्यात भय कुठून येते? बिहारमधील निवडणुका झाल्या आहेत आणि महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. प्रत्येक राजकीय पक्षामध्ये पराभवाचे भय उत्पन्न झाले आहे.
भीतीचे प्रकार अनेक. कोणाला शाळेमध्ये इंग्रजी येत नसल्याची भीती वाटते, तर कुणाला गणिताची. कुणाला जखमी होण्याची भीती वाटते, तर कुणाला भविष्याची. कोणाला कमावण्याची भीती, तर कुणाला मिळविलेले गमावण्याची.
खरे पाहता, भीतीचा पहिला धडा आपण आपल्या घरातच शिकत असतो. पाण्याजवळ जाऊ नकोस, आगीपासून लांब राहा, झाडावर चढू नकोस, कुस्ती खेळू नकोस, हातपाय मोडून घेशील, क्रिकेट जपून खेळ, कुठे चेंडू लागायला नको, तू हे करू नको, ते करू नको... आईबाबा इतके सल्ले देत असतात, की मुलाच्या मनात एक अज्ञात असे भय गुपचूप साठत जाते. ही भीतीची सुरुवात. आपल्या सामाजिक जीवनात भीतीची सावली कायम असते. केवळ हरण्याची भीती असते असे नाही, जिंकण्याचीही भीती वाटते. जे मिळविले ते गमावण्याची वेळ येईल याची भीती. प्रत्येकजण एक-दुसऱ्याला घाबरवत असतो. अगदी पती-पत्नीसुद्धा एकमेकांना घाबरवल्यावाचून राहत नाहीत.
मी परदेशात पाहतो; दोन वर्षाच्या मुलाला पोहणे शिकण्यासाठी आई-बाप जलतरण तलावात निर्भयपणे फेकून देतात. आपल्या इथे असे दिसत नाही. कारण, आपण स्वतःच घाबरलेले असतो. परदेशात मुले लहानपणीच निर्भयतेचे धडे शिकण्यासाठी जंगल आणि पहाडांमध्ये एकट्याने भटकतात. साहसी होतात. माऊंट एव्हरेस्ट जिंकण्याची जिद्द असो किंवा समुद्र पोहून जाण्याची; लहानपणी निर्भयतेचा धडा शिकणारी मुले कायमच पुढे राहतात. आपल्याकडेही ऋषीमुनी आणि साधू-संतही निबिड अरण्ये आणि पहाडातील गुहांमध्ये जाऊन साधना करीत. कारण, ते निर्भय होते. आज हाच निर्भयपणा दुर्मीळ होत चालला आहे. जर आपल्याला देश मजबूत करायचा असेल तर निर्भय आणि शिस्तबद्ध व्हावे लागेल.
मला माझे बालपण आठवते. १९६०-६२ चे दृश्य. यवतमाळमध्ये ठाणेदार जंग बहादूरसिंह अर्धी चड्डी, तिरकी टोपी आणि हातात काठी, अशा पेहरावात बाहेर पडत. त्यासरशी सगळीकडे शांतता पसरत असे, जणू काही जंगलात वाघच बाहेर पडला आहे. अशी शिस्त आज कुठे दिसते? आजही मला नावानिशी ते आठवतात, म्हणजे पाहा. हल्ली तर लोकांना त्यांच्या आताच्या पोलिस अधीक्षकांचे नावही लक्षात राहत नाही. प्रशासकीय धमकसुद्धा भय नसेल तरच दिसू शकते. पूर्वी शिक्षक वर्गात यायचे तेव्हा त्यांची भीती वाटायची. त्या भीतीत श्रद्धेचाही अंश होता. त्यावेळी शिक्षक सर्वच मुलांना आपली मुले मानत असत.
एखादा मुलगा एखाद्या विषयामध्ये कच्चा असेल तर गुरुजी त्याला घरी बोलावून शिकवत. शिकवणी वर्ग नावाची गोष्ट नव्हती. शिक्षकांच्या आचरणात पावित्र्य होते. आता तर शिक्षकांच्या समोर मुले सिगारेटही पितात. जुन्या काळी डॉक्टर उपचाराच्या बहाण्याने आपली लूट करतील अशी भीती वाटत नसे. ते जे औषध देतील, ते अंतिम असे. डॉक्टर कुटुंबाचा एक भाग होते. पूर्वी कुणी असा विचारही करीत नसे, की बाळा तू चर्चमध्ये जाऊ नकोस, गेलास तर ख्रिश्चन होशील. तू मशिदीत जाऊ नकोस, गेलास तर मुसलमान होशील. मंदिरात जाऊ नकोस, गेलास तर हिंदू होशील... दुर्दैवाने अशा प्रकारची भीती आज उत्पन्न केली जात आहे. अशा भीतीपोटीच घृणा जन्म घेत असते. सध्या तर धर्माला भीतीशी जोडले जाते आहे.
ध्यानचंद यांच्याकडे बूट नव्हते. पी. टी. उषाजवळ साधने नव्हती. तरीही त्यांनी कमाल केली; कारण साधनांच्या कमतरतेचे भय त्यांनी निर्भयपणे बाजूला केले. त्यावर विजय मिळविला. उंचीने कमी असलेल्या सचिन तेंडुलकरला उंच गोलंदाजांनी घाबरवण्याचा प्रयत्न केला. परंतु सचिनने त्यांनाच षटकार ठोकले. आपले सैनिक देशासाठी प्राणार्पण करतात, कारण त्यांना भीती वाटत नसते. सैन्यातील प्रशिक्षण त्यांना निर्भय करते. निर्भयतेचे पहिले प्रशिक्षण घरातच मिळाले पाहिजे. सायना नेहवालची आई उषा राणी यांची जिद्द मला प्रेरणादायी वाटते. कारण, त्यांनी सायनामध्ये निर्भयपणा निर्माण केला. आणि जरा गांधीजींच्या अहिंसक निर्भयतेचाही विचार करा. ज्याच्यावरून सूर्य मावळत नसे, अशा इंग्रजी साम्राज्याला त्यांनी घाबरवून टाकले.
म्हणून मी प्रत्येक आई-वडिलांना असा सल्ला देऊ इच्छितो, की लहान मुलांमध्ये भीतीचे बी पेरू नका. त्यांना निर्भय बनवा. उद्दिष्ट गाठायचे असेल तर आपल्या आतील भय काढून टाका, असे मी नेहमी म्हणतो आणि या सूत्राचे पालनही करतो. भीतीवर विजय मिळवा; सगळ्यावर विजय मिळविण्याचा तोच एक मार्ग आहे.