विशेष लेख: दादा, शिंदे, फडणवीसांचे 'कम्युनिकेशन' अन् एका विधानामुळे पडलेले असंख्य प्रश्न

By अतुल कुलकर्णी | Updated: June 1, 2025 09:54 IST2025-06-01T09:53:25+5:302025-06-01T09:54:34+5:30

कोणी काही बोलले की त्यातून किती व कसे प्रश्न निर्माण होऊ शकतात? हे शोधण्याचा आमचा छंद आहे.

Special Article Communication between Ajit Pawar, Eknath Shinde and Devendra Fadnavis and the questions raised by one statement | विशेष लेख: दादा, शिंदे, फडणवीसांचे 'कम्युनिकेशन' अन् एका विधानामुळे पडलेले असंख्य प्रश्न

विशेष लेख: दादा, शिंदे, फडणवीसांचे 'कम्युनिकेशन' अन् एका विधानामुळे पडलेले असंख्य प्रश्न

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई

प्रिय देवेंद्रजी, नमस्कार.

अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे आपले दोन सहकारी. दोघेही उपमुख्यमंत्री. मात्र, हे दोघे संवादात चांगले नाहीत... म्हणजे कम्युनिकेट करण्यात ते चांगले नाहीत... असे आपण सांगितले, पण त्यामुळे आमच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. एक तर आम्हाला फारसे काम नसते. त्यात पुन्हा असे कोणी काही बोलले की त्यातून किती व कसे प्रश्न निर्माण होऊ शकतात? हे शोधण्याचा आमचा छंद आहे. त्यामुळे इथे उपस्थित केलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलीच पाहिजेत असे नाही. कदाचित हे प्रश्न वाचून समस्त मराठीजनाला आणखी प्रश्न पडू शकतील. एका विधानातून किती प्रश्न निर्माण होऊ शकतात, अशी स्पर्धा या निमित्ताने घेता येईल. जो जास्तीत जास्त प्रश्न उपस्थित करेल त्याला बक्षीस देता येईल. पारितोषिक वितरणाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना प्रॉपरली कम्युनिकेट करून बोलवा. नाहीतर ते म्हणायचे तुम्हीच आम्हाला कम्युनिकेट केले नाही.

स्पर्धेसाठी आम्ही आमच्या मनात आलेले प्रश्न असे - एकनाथ शिंदे आणि अजित दादा, हे दोघे एकमेकांशी कम्युनिकेट करण्यात कमी पडतात का? की दोघे मिळून आपल्याशी कम्युनिकेट करताना कमी पडतात..? ते दोघे त्यांच्या पक्षात नीट कम्युनिकेट करत नाहीत, असे आपल्याला म्हणायचे आहे का..? की ते दोघे आम्ही सांगतो तेच कम्युनिकेट झाले पाहिजे, असे म्हणणारे आहेत...? आप कहना क्या चाहते हो..? ते दोघे कम्युनिकेट करण्यात चांगले नाहीत असे सांगताना, ते दोघे आपल्याला माफ करतील, असेही आपण म्हणालात. त्यांनी तसे माफ केल्याचे आपल्याला कम्युनिकेट केले का? दादांनी ज्यावेळी आपल्यासोबत पहाटे शपथविधी घेतला त्यावेळी त्यांचे, त्यांच्या पक्षात कम्युनिकेशन चांगले नव्हते का? त्यांना त्यांच्या पक्षात जे कम्युनिकेट करायचे होते ते त्यांनी नीट केले नव्हते का? म्हणून पहाटेचा शपथविधी फसला का..? एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात कम्युनिकेट करण्याचे काम कोण करत होते? मिलिंद नार्वेकर की आणखी कोणी..? त्यांच्यातल्या कम्युनिकेशन गॅपचा फायदा आपल्याला झाला का? हल्ली  नार्वेकर आपल्याशी जास्त कम्युनिकेट करताना दिसत आहेत. ते नेमके काय कम्युनिकेट करण्यासाठी येतात? हल्ली उदय सामंतही आपल्याशी चांगले कम्युनिकेट करतात, अशी चर्चा आहे. याचा अर्थ शिंदे त्यांच्याशी कम्युनिकेट करत नाहीत असा होतो का..? ज्या दीपक केसरकर यांनी शिंदे यांच्यासाठी मीडियाला चांगले कम्युनिकेट केले त्यांच्याशी हल्ली कोण कम्युनिकेट करते..? मध्यंतरीच्या काळात छगन भुजबळ जेव्हा नाराज होते, तेव्हा ते आपल्याशी जास्त कम्युनिकेट करत होते की अजितदादांशी..? मी दादांच्या पक्षातून मंत्री झालो आहे असे सांगताना आपल्याशी त्यांचे चांगले कम्युनिकेशन होते, असे ते म्हणाले. याचा नेमका अर्थ काय? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या पक्षातून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी कोण कम्युनिकेट करत आहे? त्यांच्याशी कम्युनिकेशन चांगले नाही हे आपल्यासाठी बरेच म्हणायचे का..? 

बघता बघता आम्हाला किती प्रश्न पडले बघा... आम्ही ते आपल्याशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याशी आम्ही पटकन कम्युनिकेट होतो. त्या दोघांशी आम्हालाही कम्युनिकेट करता येत नाही. आपल्या भेटीसाठी कोणालाही कम्युनिकेट केले की, आपल्यापर्यंत निरोप बरोबर जातो. त्या दोघांकडे कोणाला निरोप द्यावा म्हणजे कम्युनिकेट होऊ शकेल हे काही कळत नाही. जी आपली खंत तीच आमची... आमची खंत काही राष्ट्रीय प्रश्न नाही... पण आपल्या एका विधानावरून किती प्रश्न निर्माण होतात? या स्पर्धेसाठी आम्हाला जेवढे प्रश्न पडले तेवढे आपल्याशी कम्युनिकेट केले आहेत. आमच्या पत्राचा स्पर्धेसाठी विचार व्हावा... कुणाशी काही वेगळे कम्युनिकेट करायचे असेल तर तसेही कळवावे...

- आपलाच बाबूराव

Web Title: Special Article Communication between Ajit Pawar, Eknath Shinde and Devendra Fadnavis and the questions raised by one statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.