शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar ‘दादा’ गुलाबी झाले, भगवे व्हायला तयार नाहीत! ते सत्तेसोबत की भाजपासोबत?; पुन्हा रंगली

By यदू जोशी | Updated: September 6, 2024 11:59 IST

अजित पवार ‘रेशीमबागे’त गेले, पण संघस्थानावर झुकले-वाकले नाहीत! ते सत्तेसोबत आहेत; भाजपसोबत नाहीत, अशी चर्चा होते ती काय उगाच?

- यदु जोशी(सहयोगी संपादक, लोकमत)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलिकडे ‘लाडकी बहीण’च्या कार्यक्रमानिमित्त नागपूरला गेले, कार्यक्रम रेशीमबाग मैदानावर होता. उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील हजर होते. आता रेशीमबाग म्हटले की रा. स्व. संघ आलाच. आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गुरुजी गोळवलकर यांचे हे स्मृतिस्थान. शिंदे आणि फडणवीस तेथे नतमस्तक झाले. अजितदादा काही गेले नाहीत, ते का गेले नाहीत म्हणून चर्चाही झाली. संघाचेच एक गीत आहे, ‘एक हे वरदान आई, एक हे वरदान दे, संभ्रमी पार्थास या गीतेपरी तू जाण दे... अजितदादांच्या मुलाचे नाव पार्थ आहे; पण सध्या तरी त्यांचा स्वत:चाच संभ्रमी पार्थ झालेला दिसतो. त्याचवेळी हेही आहे की रेशीमबागेत न जाण्याबद्दल त्यांची काहीएक नक्कीच भूमिका असावी; पण त्यांच्या अशा वागण्याने भाजपच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो.

संघस्थानावर झुकलो; वाकलो तर राष्ट्रवादीचा मतदार, मुस्लीम मतदार आपल्यापासून दूर जाईल, अशी भीती त्यांच्या मनात असावी. त्यामुळेच ते गुलाबी झाले, पण भगवे व्हायला तयार नाहीत. दुसरीकडे त्यांना संघस्थानावर न जाण्यामागचे नुकसानही कळत असावे. नागपूर विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळी शिंदे-भाजपचे आमदार रेशीमबागेत नमनाला गेले होते, पण अजितदादांचे आमदार गेले नव्हते. तेव्हाही हाच दृष्टिकोन असावा. पण तसे करताना त्यांना सोबत घेण्यावरून नाराज असलेल्या भाजपच्या मतदारांचे मन नक्कीच खट‌्टू होत असणार. अजितदादा सत्तेमुळे आपल्यासोबत आहेत, ते भाजपसोबत नाहीत; सत्तेसोबत आहेत. उद्या निकालानंतर काही उलटसुलट घडले तर त्या परिस्थितीत ते आपली साथ सोडू शकतील, असा तर्क भाजपमधील काही नेते पक्षांतर्गत चर्चेत देत असतात. स्मृतिस्थळाला पाठ दाखविण्यामुळे या तर्काला बळ मिळते.

शिंदे-भाजपची मते एकमेकांना ट्रान्सफर होतात; पण भाजप-अजित पवार गट यांच्यात मतांचे आदानप्रदान होत नाही, असा युक्तिवाद भाजपचे अनेक नेते देत असतात, त्यांच्या युक्तिवादालाही अशा पाठ दाखवण्याने ताकद मिळते. पहाटेच्या शपथविधीवेळीही देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार हवेच होते, पुन्हा सोबत आणतानाही हवेच होते पण अजितदादा मध्येच असे वागतात तेव्हा फडणवीस यांचीही पंचाईत होत असणार. हसन मुश्रीफांसाठी फडणवीसांनी समरजित घाडगेंना गमावले, दत्ता भरणेंसाठी आता हर्षवर्धन पाटील यांना गमावण्याची वेळ आली आहे. अजित पवारांमुळे आपली हक्काची माणसे दुरावत आहेत, आणखी काही भाजप नेते दुरावण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत फडणवीस यांना नक्कीच खंत असणार; पण एकदा त्यागाची भूमिका घेतली की, असे सगळे होतच राहते. त्यागामुळे आधी ते आक्रसले, आता भाजप आक्रसत आहे. फडणवीस यांनी वरच्यांच्या आदेशापोटी बरेच काही सहन केले. इतर कोणी सहन का करतील? 

भाजप आणि शिंदेसेनेचे नेते पत्रकारांशी खासगीत बोलताना सांगतात की, महायुतीत अजित पवारांचा पक्ष हा कच्चा दुवा आहे. त्यांना संपवायला शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे तिघेही पुरेपूर प्रयत्न करतील, त्याचा मोठा फटका आम्हाला बसेल. मात्र, त्याचवेळी निवडून येण्याची क्षमता असलेले पाचपंचवीस चेहरे जवळ असणे ही अजित पवारांची ताकद आहे. त्यांच्या जवळच्या अशा पॉवरफुल सरदारांवर शरद पवार यांची म्हणूनच तर नजर आहे. असे दोनचार सरदार सोडून गेले तरी पुतण्याजवळ काकांपेक्षा तगडे चेहरे आहेत. त्यामुळे भाजपमध्ये त्यांना सोबत ठेवण्यावरून कितीही नाराजी असली तरी ती दूर करण्याचे प्रयत्न केले जातील; पण त्यांना दूर केले जाणार नाही. समजा दादांचे ३० आमदार निवडून येणार असतील तर इतर दोन मित्रांना शंभरचीच तजवीज करावी लागेल. १०-१५ अपक्ष तर कधीही तयारच असतात.

आघाडीत ठाकरे एकाकीमहाविकास आघाडीने आधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवावा, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी या ना त्या प्रकारे मांडून पाहिली; पण चाणाक्ष काँग्रेस आणि अतिचाणाक्ष शरद पवार यांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. ‘ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री’ हे सूत्र ठाकरे यांनी अमान्य केले. हे सूत्र स्वीकारले तर पाडापाडीचे राजकारण मविआतच होईल, असेही त्यांनी सांगून पाहिले; पण काँग्रेस, पवार हे तेल लावलेले जुने पैलवान आहेत. महायुतीचे सरकार घालवणे हाच आमचा अजेंडा आहे असे सांगत त्यांनी ठाकरेंच्या इच्छेला खो दिला. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून ठाकरेंना एकटे पाडले गेले. काँग्रेस पूर्णपणे सत्तेच्या मोडमध्ये गेली आहे, आता सत्ता आपलीच असे ते समजून चालत आहेत. आत्मविश्वास वाढविण्यासाठी अशा मोडमध्ये जाणे आवश्यकही असते; पण त्यालाच जोडून मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसमध्ये फिल्डिंग लावणे सुरू झाले आहे. बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील स्पर्धेत आहेत. लोकसभेला सगळे साथ-साथ होते, विधानसभेला मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा आड येऊ नये, अशी काँग्रेसजनांची भावना आहे. महाविकास आघाडीचा तिढा लोकसभेत लवकर सुटला होता, यावेळी तो इतका लवकर सुटणार नाही. २७ विधानसभा मतदारसंघ असे आहेत की, जिथे आघाडीतील तिन्ही किंवा दोन पक्षांमध्ये प्रचंड खेचाखेची होईल. उद्धवसेनेचा दबाव काँग्रेसला मान्य नाही, कोणत्याही परिस्थितीत १२०च्या खाली जागा घेऊ नका, असा काँग्रेसच्या नेत्यांवर स्वपक्षीयांचा दबाव आहे. शरद पवार सावध पावले टाकत आहेत. त्यांचा भर स्ट्राईक रेट वाढविण्यावर आहे. उद्धवसेना किमान १०० जागांसाठी अडून बसल्याची माहिती आहे. जागा २८८ आणि मागणी साडेतीनशेची - हीच स्थिती युती व आघाडीतही आहे.

yadu.joshi@lokmat.com

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीBJPभाजपा