प्रादुर्भाव कमी, पण भीती कायम...

By किरण अग्रवाल | Published: July 22, 2021 08:29 AM2021-07-22T08:29:41+5:302021-07-22T08:36:17+5:30

Coronavirus : कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे हे खरे; पण म्हणून अनिर्बंधपणे वावरणे योग्य ठरणार नाही. शासनाने अजूनही कायम ठेवलेल्या निर्बंधांना धुडकावून लावत नागरिक बेफिकीरपणे वावरताना दिसतात हे धोक्याला निमंत्रण देणारेच आहे.

spacial editorial on coronavirus less risk but cant take easily | प्रादुर्भाव कमी, पण भीती कायम...

प्रातिनिधीक छायाचित्र

Next
ठळक मुद्देकोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे हे खरे; पण म्हणून अनिर्बंधपणे वावरणे योग्य ठरणार नाही. निर्बंधांना धुडकावून लावत नागरिक बेफिकीरपणे वावरताना दिसतात हे धोक्याला निमंत्रण देणारेच आहे.

किरण अग्रवाल

कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे हे खरे; पण म्हणून अनिर्बंधपणे वावरणे योग्य ठरणार नाही. शासनाने अजूनही कायम ठेवलेल्या निर्बंधांना धुडकावून लावत नागरिक बेफिकीरपणे वावरताना दिसतात हे धोक्याला निमंत्रण देणारेच आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा पाहता जग तिसऱ्या लाटेच्या दिशेने जात आहे. नेदरलँडसारख्या देशात तर तीनशे टक्के रुग्णवाढ झाल्याने आपणासही गाफील राहून चालणार नाही. आपल्याकडे अजूनही देशातील 73 जिल्ह्यांमध्ये दररोज शंभराहून अधिक नवीन रुग्ण आढळत आहेत, शिवाय यापैकी बारा राज्यांमधील 47 जिल्ह्यांत संसर्ग दर दहा टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असून, यात महाराष्ट्राचाही समावेश असल्याचे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे. तेव्हा यासंदर्भातील बेफिकिरी परवडणारी नाही, हे साऱ्यांनीच लक्षात घ्यायला हवे.

कोरोना ओसरत असल्याने जनजीवन पूर्वपदावर येत असून, उद्योग व्यवसायही पुन्हा गती घेऊ पाहत आहेत. मध्यंतरी सारे थबकल्यामुळे अनेकांना नोकरीस म्हणजे रोजीरोटीस मुकावे लागले होते; परंतु आता पुन्हा मनुष्यबळाची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे विविध आस्थापनांमध्ये नोकरभरती सुरू झाली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये नोकऱ्यांचे प्रमाण वाढले असून, यात जयपूर आणि अहमदाबादमधील नोकऱ्यांमध्ये 30 आणि 22 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे, तर मुंबईत 12 व पुण्यात सहा टक्‍क्‍यांनी नोकऱ्या वाढल्या असल्याचे सांगणारा साईकी मार्केट पोर्टल वेबसाइटचा अहवाल आला आहे. टीसीएस, इन्फोसिस, विप्रो आदी आयटी कंपन्यांनी यावर्षी एक लाखापेक्षा अधिक फ्रेशर्सना संधी देण्याचे सूतोवाच मागे केले होतेच, आता एल अँड टी कंपनीने देखील तीन वर्षांत मोठ्या प्रमाणावर नोकर भरती करणार असल्याचे म्हटले आहे. बेरोजगारांसाठी ही बाब दिलासादायक असून त्यामुळे उत्पादन वाढ होऊन त्याचा एकूणच चलनवलनावर परिणाम होणे अपेक्षित आहे.

बाजारातही चैतन्य असून जागोजागच्या बाजारपेठा गजबजल्या आहेत. शेअर मार्केटमध्येही तेजी दिसून येत असून, गेल्या सप्ताहात सेंन्सेक्स, निफ्टी आणि स्मॉल कॅप या निर्देशांकांनी उच्चांकाची नवीन नोंद केली आहे. काही कंपन्यांनी तर अगदी अल्पावधीत गुंतवणूकदारांना मालामाल केल्याचे आकडे आहेत. अर्थव्यवस्थेचा अडलेला वा रुतलेला गाडा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. हे शुभवर्तमानच म्हणायला हवे. आपल्याकडेच नव्हे तर जागतिक पातळीवरही अशीच स्थिती आहे. अगदी ज्या चीनमधून कोरोना आला, असे म्हटले गेले त्या चीनमध्येही मागील वर्षाच्या तुलनेत गेल्या जून महिन्यातील निर्यात 32 टक्क्यांनी वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. परदेशातील स्थावर मालमत्तेच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे भारताच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये 1.88 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. एकूणच स्थिती सुधारते आहे; परंतु ही सुरळीत होऊ पाहत असलेली स्थिती कायम राखायची तर खबरदारी घेणे गरजेचे असून, तेच दुर्दैवाने होताना दिसत नाही. पहिली लाट ओसरल्यानंतर सणावाराच्या निमित्ताने जशी गर्दी झाली व निर्बंध धुडकावले गेलेत तशीच स्थिती आता दुसरी लाट ओसरताना दिसून यावी, हे चिंताजनकच आहे. विशेषतः यापुढील 125 दिवस हे अतिसंवेदनशील असल्याचे सांगितले जात असताना निष्काळजीपणा दिसतो आहे, हे अधिक दुर्दैवी म्हणावयास हवे.

आपल्याकडे लग्नसराई जोरात असून, त्यातील उपस्थितीच्या मर्यादा कुणीही पाळताना दिसत नाही. तेथे गर्दी तर होतेच आहे; परंतु मास्कचाही वापर केला जाताना आढळत नाही. कोरोनापासून बचावण्याचा लसीकरण हाच एकमेव मार्ग आहे; पण याबाबतही गांभीर्य नाही. कुठे लस घेणारे उत्सुक आहेत, तर यंत्रणा अपुऱ्या पडताना दिसत आहेत व कुठे यंत्रणा तयार असताना नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाणही तुलनेने कमीच आहे. कशाला, हेल्थ केअर व फ्रंटलाइन वर्कर्सचेही 50 ते 60 टक्केच लसीकरण झाले आहे. केंद्र सरकारने दररोज एक कोटी डोस देण्याचे लक्ष ठेवले आहे; पण ते सरासरी 40 ते 50 टक्के इतकेच गाठले जात आहे; किंबहुना जुलै महिन्यात त्याचीही गती मंदावल्याचे आढळून आले आहे. राज्यातील कोरोनामुक्त जिल्ह्यात आठवी ते दहावीच्या शाळा उघडत आहेत. मात्र, शिक्षकांचेही लसीकरण पूर्ण झालेले नाही. अशा स्थितीत तिसरी लाट रोखणे अवघडच ठरेल. तेव्हा आज प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी भविष्यातील तिसऱ्या लाटेचा धोका कमी झालेला नाही हे लक्षात घेऊन लसीकरणाचा वेग वाढविणे व कोरोना टाळण्यासाठी म्हणून लावल्या गेलेल्या निर्बंधांचे कटाक्षाने पालन होणे गरजेचे बनले आहे. दुसरी लाट ओसरतेय म्हणून सुटकेचा श्‍वास सोडत सारेजण निर्धास्त होणार असतील तर संकट लवकर ओढावल्याखेरीज राहणार नाही इतकेच यानिमित्ताने.

Web Title: spacial editorial on coronavirus less risk but cant take easily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app