सुखकर्ता, दु:खहर्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 13:27 IST2018-09-14T13:27:36+5:302018-09-14T13:27:56+5:30

सुखकर्ता, दु:खहर्ता
- मिलिंद कुलकर्णी
गणेशोत्सव धुमधडाक्यात सुरु झाला. सर्वत्र उत्साहपूर्ण, मंगलमय आणि आनंददायी वातावरण आहे. प्रसारमाध्यमांमध्ये गणपतीविषयक संदेश, छायाचित्रांचे अदान प्रदान सुरु आहे. गणपतीबाप्पा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करेल, दु:ख दूर करेल, अशी प्रत्येक भाविकाची नितांत श्रध्दा आहे. मनोभावे पूजेतून तो हीच भावना प्रकट करीत असतो. उत्सव असल्याने प्रत्येक व्यक्ती, मंडळ, संस्था आपल्या ऐपतीनुसार, कल्पनेनुसार, क्षमतेनुसार ते साजरा करीत असतात. कुठे वर्गणीचा आधार असतो, तर कुठे काही व्यक्ती, संस्था, उद्योग या उत्सवासाठी मदतीचा भक्कम हात देतात. त्यामुळे बाप्पांची मूर्ती भव्य दिव्य, मंडप मोठा, रोषणाई, सजावट अनोखी, मिरवणुका विशाल, लेझीम, ढोल, ताशा पथकांमधील सदस्यांची संख्या सर्वाधिक असते. मंडळाची परंपरा, पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लावली जाते. इतर मंडळांपेक्षा आपण काकणभर सरस राहण्यासाठी धडपड केली जाते. याची खरोखर आवश्यकता आहे काय, असा प्रश्न सामान्यजनांच्या मनात निर्माण होतो.
याउलट काही मंडळे जाणीवपूर्वक सामाजिक बांधिलकी, काळाचे भान ओळखत उपक्रमशीलता जोपासतात. आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या कुटुंबियांना धान्यवाटप, त्यांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप, अनाथगृह, बालनिरीक्षणगृहात वर्षातून काही दिवस भोजन अशा उपक्रमांपासून तर काही जण शासकीय उपक्रमांना मदत करतात. कुठे पाणपोई उभारणे, चौक सुशोभीकरण करणे, गाव दत्तक घेणे, शेततळे वा नाला खोलीकरण करुन देणे यात मंडळे आर्थिक आणि शारीरिक हातभार लावतात. उत्सवामधील बडेजाव दूर सारत अनेक मंडळांनी यंदा केरळमधील पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत केली.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असते. व्यापार-उद्योग क्षेत्रात उत्साह असतो. दुष्काळाची दाट छाया दाटलेली असताना सणाचा मुहूर्त साधून नागरिक खरेदी करतात. तशी गणेशचतुर्थीला झाली. हा उत्साह टिकेल, पाऊस येऊन शेतातील पीक वाचेल, अशी सर्वांची अपेक्षा आहे.
गणेश मंडळांनी उत्सवकाळात काही पथ्य पाळावी, आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने यंदाही केले. त्याविषयी मात्र मंडळ पदाधिकाºयांनी दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. मंडळांचे मंडप रस्त्यात आहेत, त्याबद्दल कुणाची तक्रार राहणार नाही. उत्सव म्हणून दहा दिवस नागरीक त्रास सोसतात. पण मंडपापलिकडचा रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवला पाहिजे. उगाच गाड्या लावून तोही बंद करता कामा नये. कार्यक्रम किंवा दर्शनाच्या वेळी दोरी बांधून तो बंद होऊ नये. त्यासोबतच लाऊड स्पीकरचा आवाज ध्वनिमर्यादा ओलांडणार नाही, अशी काळजी घ्यायला हवी. रहिवासी भागातील वयोवृध्द नागरीक, लहान मुले, परीक्षार्र्थींसह सर्वसामान्यांना आवाजाचा त्रास होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. कुमारवयीन किंवा तरुण मुलांच्या हाती सर्वत्र सूत्रे असल्याने त्यांना समजावून सांगायला गेल्यास गैरसमज होण्याची भीती, वादाचे प्रसंग उद्भवण्याची शक्यता अधिक असते. उत्सवाच्या शेवटी भंडाºयांचे आयोजन केले जाते. उष्टे अन्न, पत्रावळी, पाण्याचे पेले इतस्तत: पडलेले असतात. ते कचराकुंडीत टाकले जातील, याची खबरदारी घ्यायला हवी. उत्सवाचा आनंद सगळ्यांना मिळायला हवा, त्रास व्हायला नको, याची काळजी गणेश मंडळांच्या ज्येष्ठ, अनुभवी पदाधिकाºयांनी घ्यायला हवी. बहुसंख्य मंडळे ती घेतातच, पण एखाद-दुसºया मंडळांमुळे वादाचे प्रसंग ओढवतात. तेही घडू नये, म्हणून प्रयत्न व्हायला हवे. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या मंगलमूर्तीचे आगमन, वास्तव्य आणि विसर्जन सारेच आनंददायी, मंगलदायी व्हायला हवे, नाही का?