सोनियाच फक्त...
By Admin | Updated: March 22, 2015 23:15 IST2015-03-22T23:15:44+5:302015-03-22T23:15:44+5:30
०१४ च्या निवडणुकीतील अभूतपूर्व पराभवाने कॉँग्रेस पक्ष पार गठाळून गलितगात्र झाला आहे. महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा, तेलंगण, आंध्र आणि दिल्लीतील पराभवानेही त्याचे उरलेसुरले अवसान हिरावून घेतले आहे.
सोनियाच फक्त...
२०१४ च्या निवडणुकीतील अभूतपूर्व पराभवाने कॉँग्रेस पक्ष पार गठाळून गलितगात्र झाला आहे. महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा, तेलंगण, आंध्र आणि दिल्लीतील पराभवानेही त्याचे उरलेसुरले अवसान हिरावून घेतले आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज सुटीवर असले तरी बऱ्याच काळापासून तेही दिसेनासे झालेले दिसले आहेत. पक्षातील अनेक जुन्या पुढाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी निष्ठांतर करून भाजपा व इतर पक्ष जवळ केले आहेत. जे पक्षात शिल्लक राहिले त्यांचीही भाषा नरमाईची बनली आहे. सव्वाशे वर्षांचा इतिहास, स्वातंत्र्यलढ्याची तेजस्वी पार्श्वभूमी, राष्ट्रीय नेतृत्वाची दिपवून टाकणारी प्रभावळ आणि साऱ्या देशात कार्यकर्त्यांचे व चाहत्यांचे असलेले प्रचंड सामर्थ्य एवढे सारे असलेल्या पक्षाला इतके वाईट दिवस प्रथमच आल्याचे दिसले आहे. या काळात त्या पक्षाचे एकच नेतृत्व आपला संयम, आब, प्रतिष्ठा व उंची कायम राखून संसदेत व देशात वावरताना दिसले आहे. ते नेतृत्व सोनिया गांधींचे आहे. त्यांच्या आजाराच्या आणि त्या आजारावरील उपचारांच्या बातम्या नियमितपणे प्रकाशित होत असतानाही त्या कमालीच्या स्थिर व धीरगंभीर दिसल्या आहेत. परवा लोकसभेत त्यांनी आक्रमकरीत्या भाषण करून केंद्रातील मोदी सरकारने आंध्र प्रदेशावर केलेल्या अन्यायाला जी वाचा फोडली ती त्यांच्यातील नेतृत्वाची धग अद्याप तशीच प्रखर असल्याचे सांगणारी आहे. त्याच दिवशी दुपारी देशातील चौदा प्रमुख विरोधी पक्षांच्या पुढाऱ्यांच्या संसदेतून राष्ट्रपती भवनापर्यंत गेलेल्या मोर्चाचे त्यांनी जे प्रखर नेतृत्व केले तेही त्यांच्यातील लढाऊपण अजून तेवढेच व तसेच राहिले असल्याचे सांगणारे आहे. सरकारने संसदेत आणलेले ‘शेतकरीविरोधी’ भूमी अधिग्रहण विधेयक कोणत्याही परिस्थितीत आम्ही मंजूर होऊ देणार नाही, प्रसंगी त्यासाठी आम्ही लढू आणि मरू असे घोषित करून त्यांनी सरकारएवढेच विरोधी पक्षांना व देशालाही जागे केले आहे. हा सारा प्रसंग पूर्वीच्या अशा एकाच घटनेची आठवण करून देणारा आहे. १९९९ मध्ये वाजपेयींचे रालोआ सरकार सत्तेवर आले होते आणि काँग्रेस पक्षावर अशीच मरगळ आली होती. पक्षातून अनेक महत्त्वाची माणसे बाहेर पडली होती. जीवनावश्यक वस्तूंचे भाव त्यावेळी कमालीचे कडाडले होते पण त्याविरुद्ध बोलायला विरोधी पक्ष धजावत नव्हते. त्या काळात सोनिया गांधींनी असाच एक मोर्चा संसदेवर नेला होता. त्याला सामोरे जायला खुद्द पंतप्रधान वाजपेयी हे त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सभासदांसोबत रस्त्यावर आले होते. ‘जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी होत आहेत’ असे त्या रस्त्यावरील चर्चेत वाजपेयींनी म्हणताच ‘भाव कमी झालेली एक वस्तू आम्हाला सांगा’ असा प्रतिप्रश्न विचारून सोनिया गांधींनी भाववाढ झालेल्या जीवनावश्यक वस्तूंची मोठी यादीच पंतप्रधानांच्या हाती तेव्हा दिली होती. सोनिया गांधींमध्ये दडलेले लढाऊ नेतृत्व त्यावेळी प्रथमच माध्यमांनी व देशाने अनुभवले. तेव्हा गठाळलेल्या काँग्रेस पक्षातही त्यानेच पहिली सुरसुरी आणली. नंतरच्या काळात ठिकठिकाणी आंदोलने उभारून व पक्षाला आक्रमक बनवून सोनिया गांधींनी तो पक्ष २००४ च्या निवडणुकीत थेट सत्तेवरच आणला. बाकीचे नेते थकतात. त्यातले काही समझोते करतात. काही नव्या सत्तेच्या गळाला लागतात, तर पवारांसारखी माणसे अंधारात राहून सत्ताधाऱ्यांशी मैत्री करतात. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींच्या नेतृत्वाचे असे एकाकी पण ताठ उभे राहणे आश्वासक वाटू लागते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विश्वास वाटायला त्यांच्या वाट्याला आलेले जीवघेणे स्फोटक अनुभव जसे आहेत तसे त्यांनी केलेल्या लोकविलक्षण त्यागाचे अनुभवही त्यांच्या गाठीशी आहेत. इंदिरा गांधींचा खून होताना त्यांना प्रत्यक्ष पहावा लागला आणि राजीव गांधींचा स्फोटक मृत्यूही तसाच अनुभवावा लागला. २००४ च्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीला बहुमत मिळाले होते. त्या आघाडीने सोनिया गांधींना देशाचे पंतप्रधानपद एकमुखाने देऊ केले होते. डावे पक्षही त्या निर्णयाच्या बाजूने उभे राहिले होते. अगोदरच्या स्फोटक अनुभवांच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींनी देशाचे पंतप्रधानपद नाकारून एक नवा व त्यागाचा इतिहास तेव्हा घडविला होता. परवाच्या मोर्चात त्यांच्यासोबत जाणाऱ्या १४ पक्षांत मुलायमसिंगांच्या समाजवादी पक्षापासून करुणानिधींच्या द्रमुकपर्यंतचे सारे पक्ष होते ही बाब सरकार विरुद्ध सारे असे राजकीय चित्र देशात उभे करणारी आहे. काँग्रेस पक्षात जे बदल व्हायचे असतील ते होवोत, त्यात जी नवी माणसे यायची तीही येवो पण या पक्षाजवळ आजतरी सोनिया गांधींच्या नेतृत्वाएवढ्या उंचीचे व प्रतिष्ठेचे नेतृत्व दुसरे नाही हे उघड आहे. त्यांच्या तुलनेत राहुल नाहीत आणि प्रियंकाही नाही. जनतेचा काँग्रेसवरील शिल्लक विश्वासही सोनिया गांधींमुळेच आहे हे स्पष्ट आहे. त्यामागे त्यांचे लढाऊपणच केवळ नाही, संकटात स्थिर राहण्याची व विजयात त्यागी होण्याची त्यांची तयारीही त्याला कारणीभूत आहे हे महत्त्वाचे. देशात आज माजलेला धर्मांधांचा कल्लोळ रोखायचा तर त्याला पायबंद घालायलाही असेच शांत व गंभीर नेतृत्व लागत असते. सोनिया गांधींवाचून दुसरे असे नेतृत्व आज राष्ट्रीय पातळीवर कोणते दिसत नाही. ते या देशाला दीर्घकाळ लाभावे एवढेच अशावेळी म्हणायचे.