सोमनाथ स्वाभिमान पर्व – अखंड श्रद्धेची हजार वर्षे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 05:08 IST2026-01-05T05:08:11+5:302026-01-05T05:08:49+5:30
द्वेष आणि कट्टरतेला क्षणिक विध्वंस करता येतो, पण श्रद्धा आणि सद्भावना अनंत काळासाठी सृजन करू शकतात, हाच संदेश सोमनाथ देतो.

सोमनाथ स्वाभिमान पर्व – अखंड श्रद्धेची हजार वर्षे
नरेंद्र मोदी, पंतप्रधान, अध्यक्ष, श्री सोमनाथ ट्रस्ट
सोमनाथ… हे नाव उच्चारताच अंतःकरणात अभिमानाची भावना दाटून येते. तो भारताच्या आत्म्याचा शाश्वत घोष आहे. गुजरातमधील प्रभास पाटण येथे, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर उभे असलेले हे भव्य मंदिर आपल्या गौरवशाली परंपरेचे प्रतीक आहे. दुर्दैवाने, कोट्यवधी भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले हेच सोमनाथ मंदिर परकीय आक्रमकांचे लक्ष्य ठरले. त्यांचा हेतू भक्ती नव्हता, तर विध्वंस होता.
सोमनाथ मंदिरासाठी २०२६ हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. या महान तीर्थस्थळावर झालेल्या पहिल्या आक्रमणाला एक हजार वर्षे पूर्ण होत आहेत. जानेवारी १०२६ मध्ये महंमद गझनीने या मंदिरावर हल्ला केला. श्रद्धा आणि संस्कृतीच्या एका महान प्रतीकाचा विध्वंस करण्यासाठी केलेले हे आक्रमण क्रूर होते. त्या घटनेनंतर हजार वर्षांनंतरही सोमनाथ मंदिर आज तितकेच तेजस्वीपणे उभे आहे. त्याच्या पुनर्निर्माणासाठी अनेक पिढ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचे हे फलित आहे. अशाच एका ऐतिहासिक टप्प्याला २०२६ मध्ये ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. ११ मे १९५१ रोजी, तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत पुनर्बांधलेले सोमनाथ मंदिर भक्तांसाठी खुले झाले.
१०२६ मधील पहिले आक्रमण, त्यावेळी प्रभास पाटणमधील जनतेवर झालेला अमानुष अत्याचार आणि मंदिराचा विध्वंस या साऱ्याचे अनेक ग्रंथांत सविस्तर नोंदलेले तपशील वाचताना काळीज हादरते. प्रत्येक ओळीत वेदना, क्रौर्य आणि काळाच्या ओघातही न मिटणारे दु:ख दडलेले आहे. या घटनेचा भारतावर आणि तत्कालीन समाजाच्या मनोबलावर काय परिणाम झाला असेल, याची केवळ कल्पनाच करता येते. कारण सोमनाथ हे केवळ आध्यात्मिक केंद्र नव्हते. समुद्रकिनाऱ्यावर वसलेले हे मंदिर आर्थिकदृष्ट्या सक्षम समाजाचेही प्रतीक होते. येथील समुद्रमार्गे व्यापार करणारे व्यापारी आणि नाविक जगभर त्याच्या वैभवाच्या कथा सांगत असत. प्रत्येक वेळी मंदिरावर आघात झाला, तेव्हा त्याचे रक्षण करण्यासाठी अनेकांनी सर्वोच्च बलिदान दिले.
१८९० च्या दशकात स्वामी विवेकानंदांनी सोमनाथाला भेट दिली. त्या अनुभवाने ते अत्यंत भारावून गेले. १८९७ मध्ये चेन्नईतील एका व्याख्यानात त्यांनी म्हटले होते, ‘दक्षिण भारतातील ही प्राचीन मंदिरे आणि गुजरातमधील सोमनाथासारखी स्थळे तुम्हाला पुस्तकांपेक्षा अधिक इतिहास शिकवतील. या मंदिरांवर शंभर वेळा झालेले हल्ले आणि शंभर वेळा झालेले पुनरुत्थान पाहा. सतत उद्ध्वस्त होऊनही पुन्हा पुन्हा अधिक बळकट होऊन उभे राहणे, हाच राष्ट्रीय जीवनप्रवाह आहे.’ स्वातंत्र्यानंतर सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीचे पवित्र कार्य सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सक्षम हातात आले. १९४७ च्या दिवाळीत सोमनाथास दिलेल्या भेटीने ते इतके व्यथित झाले की त्यांनी मंदिर तेथेच पुन्हा उभारण्याची घोषणा केली. अखेर ११ मे १९५१ रोजी भव्य सोमनाथ मंदिर भक्तांसाठी खुले झाले. दुर्दैवाने, हा ऐतिहासिक क्षण पाहण्याआधीच सरदार साहेबांचे निधन झाले होते.
आज भारत जागतिक आघाडीवर आहे. शतकानुशतके झालेल्या आक्रमणांनंतरही आणि वसाहतवादी शोषणानंतरही भारत उभा राहिला. आपली मूल्यव्यवस्था आणि लोकांचा निर्धार यामुळेच आज जग भारताकडे आशेने पाहत आहे. आपल्या तरुणांच्या नवोन्मेषावर जगाची मदार आहे. आपली कला, संस्कृती, संगीत, सण-उत्सव जागतिक स्तरावर पोहोचत आहेत. योग आणि आयुर्वेद आरोग्यदायी जीवनशैलीला नवी दिशा देत आहेत. जागतिक समस्यांवर भारतातून उपाय सुचवले जात आहेत.
प्राचीन काळापासून सोमनाथाने विविध विचारधारांतील लोकांना एकत्र आणले आहे.
आजही सोमनाथामध्ये मन आणि आत्म्याला जागृत करण्याची तीच शक्ती आहे. १०२६ मधील पहिल्या आक्रमणानंतर हजार वर्षे झाली, तरी सोमनाथाजवळील समुद्र आजही त्याच जोमाने गर्जतो. त्याच्या लाटा उद्ध्वस्त होऊनही पुन्हा पुन्हा उभे राहण्याची कथा सांगतात. काळाच्या वाळूत आक्रमकांची नावे हरवून गेली आहेत. विध्वंसाशी जोडलेली ती नावे इतिहासाच्या पानांत केवळ तळटिपा ठरली आहेत. मात्र, सोमनाथ आजही तेजाने उजळून निघत आहे. द्वेष आणि कट्टरतेला क्षणिक विध्वंस करता येतो, पण श्रद्धा आणि सद्भावना अनंत काळासाठी सृजन करू शकतात, हा संदेश सोमनाथ देतो.
हजार वर्षांपूर्वी वारंवार हल्ले सहन करूनही जर सोमनाथ पुन्हा पुन्हा उभा राहू शकतो, तर आक्रमणांपूर्वीच्या आपल्या वैभवशाली भारताला पुन्हा उभे करणे आपण नक्कीच करू शकतो. श्री सोमनाथ महादेवांच्या आशीर्वादाने, ‘विकसित भारत’ घडवण्याचा संकल्प घेऊन आपण पुढे जात आहोत!