Smile please! Nose stick; Still the sweetness of ‘photosession’ .. | स्माईल प्लीज ! नाकात काडी; तरीही ‘फोटोसेशन’ची गोडी..

स्माईल प्लीज ! नाकात काडी; तरीही ‘फोटोसेशन’ची गोडी..

- सचिन जवळकोटे

सतत फोकसमध्ये राहणं हा राजकारण्यांचा आवडता छंद. त्यापायीच कॅमे-याच्या लेन्सचा जसा ‘खाकी’ला लळा, तसाच समोर नेता असल्याशिवाय ‘खच्यॅऽऽक’लाही येत नाही मजा; मात्र त्याला काही लिमिट-बिमिट ? ‘पब्लिसिटी’ची चटक लागलेल्यांना जेव्हा होते ‘फोटोसेशन’चीही लागण, तेव्हा नाकात काडी घालतानाही म्हटलं जातं ‘स्माईल प्लीऽऽज.’

काडी’बहाद्दर मेंबर !

परवाचीच घटना. झेडपीची सभा सुरू होणार होती. त्याअगोदर प्रत्येक मेंबरची कम्पलसरी अँटिजेन टेस्ट सुरू. काही जणांची तपासणीही झालेली. एवढ्यात प्रेस फोटोग्राफर तिथं आला. त्याला पाहताच अनेकांना हुरहुरी आली. पुन्हा नाकात काडी घालण्याची सुरसुरी निर्माण झाली. पाच मिनिटांपूर्वीच टेस्ट झालेली असतानाही केवळ ‘फोटो’साठी खरीखुरी काडी खोटं-खोटी नाकाजवळ नेण्याची अ‍ॅक्टिंग काही मेंबर्सनी केली. चांगला अँगल मिळण्यासाठी उद्घाटनाला नारळ दोनदा फोडला जातो. ओके. भूमिपूजनाला चारदा कुदळ हाणली जाते. तरीही ठिक...पण काडीच नाकात दोन-दोनदा म्हणजे अतीच झालं राऽऽव !

आता हा फोटोही पहा की. ‘बळीरामकाकां’ची टेस्ट सुरू असताना फ्लॅश चमकला. डॉक्टरचा हात ‘काकां’च्या नाकाकडं जात असताना त्यांची नजर मात्र ‘लेन्स’वरच खिळलेली. हे पाहताच लांब पलीकडं नोंदणीसाठी उभारलेल्या ‘ताई-माई-आक्का’ही पटकन् अलर्ट झाल्या. कॅमे-यासमोर व्यवस्थित ‘फोटोसेशन’ झाल्यानंतरच पुन्हा मागं गेल्या. हे कमी पडलं की काय म्हणून आरोग्य खात्यातला एक कर्मचारीही ‘अटेन्शन’मध्ये उभा राहिला. त्याचीही ‘बॉडीलॅँँग्वेज’ क्षणाधार्थ बदलली. क्षणभर बिच्चा-या डॉक्टरांनाही कळालं नाही की, आपण अँटिजेन टेस्ट कॅम्पमध्ये आहोत की गड्डा यात्रेतल्या फोटो स्टुडिओत. लगाव बत्ती...

न्यूज व्हॅल्यू’ वाढविणारे आंदोलक..

मीडियात आपली न्यूज चांगल्या पद्धतीनं व्हायरल करायची असेल तर ‘आंदोलनात व्हरायटी’ आणावी लागेल, हे सर्वप्रथम कुणी ओळखलं असेल तर पूर्वभागातल्या ‘मास्तरां’नी. समोर जेवढे कॅमेरे जास्त, तेवढा भाषणातील आवाज टिपेला पोहोचविणा-या या ‘मास्तरां’ची ‘आंदोलन क्रिएटिव्हीटी’ही तशी जबरदस्त. कधी हातगाडा ढकलतील तर कधी टोप्या वापरतील. याबाबतीत त्यांचा हात कुणीच नाही धरू शकत. अगदी महापालिकेतले ‘चंदनशिवे’ही नाही.

गेल्या ‘लोकसभे’ला सोलापुरात ‘प्रकाशराव’ उभारले होते की ‘आनंददादा’.. हेच प्रचारात म्हणे लोकांना अनेकदा समजत नव्हतं, एवढा ‘उत्स्फूर्त पुढाकार’ त्यांचा कॅमे-यासमोर असायचा. अगदी ‘मेंगजीं’नाही मागं टाकेल एवढा. पालिकेच्या सभागृहातही कॅमे-याचा फोकस सातत्यानं स्वत:वर ठेवण्यात ‘दादा’ नेहमीच यशस्वी ठरलेले. त्यांच्या खर्जा आवाजाच्या गोंधळात हुश्शाऽऽर ‘चेतनभाऊ’ अन् ‘महेशअण्णा’ आपापल्या ‘फायद्या’चे ठराव पटापट मंजूर करून घेतात, हा भाग वेगळा. त्या बदल्यात ‘संजयअण्णा’ अन् ‘सुरेशअण्णा’ही आपल्याला हवी असणारी ‘प्रोसिजर’ हळूच पूर्ण करतात, हा भाग तर अजून वेगळा.

असो. पेपरात ‘आनंददादां’चा फोटो नाही, असा एकही दिवस नाही जाणार. गेल्या आठवड्यात ते ‘क्वारंटाईन’ झाल्यानंतर सोलापूरकरांना हुरहुर लागली की, आता पेपरात नेमकं पहायचं तरी काय ? ‘दादां’चं दर्शन होणार तरी कसं ? मात्र ‘आनंददादा’ नेहमीच जनतेची काळजी घेणारे. त्यांनी सोलापूरकरांची ही चिंताही मिटविली. हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असतानाही तिथून स्वत:च धडपडत सेल्फी व्हिडिओ-बिडीओ काढून बाहेर पाठविला. व्वाऽऽ किती हा त्याग ? किती ही जनसेवा ?

पालिकेत इतरही काही मेंबर असेच कॅमे-याला सरावलेले. ‘श्रीदेवी’तार्इंनी नवीन डिझाईनचा सोन्याचा कोणता दागिना घेतला, हे सोलापुरातली कोणतीही गृहिणी घरातला टीव्ही बघून सहजपणे ओळखू शकते. ‘फिरदोस दीदीं’ची मराठी भाषा आता चांगलीच सुधारलीय, हेही गल्लीबोळातलं लेकरू सांगू शकतं. ‘निकंबे पैलवाना’चं लेकरुही किती मोठं झालं, हे जयंती-पुण्यतिथी सोहळ्यातील केवळ ‘पिता-पुत्रा’च्या फोटोतूनच सोलापूरकरांना कळतं.

पूर्वभागातले ‘मास्तर’ किमान रस्त्यावर उतरून तरी आंदोलन करतात, पण सांगोल्याचे ‘प्रफुल्ल’भैय्या फोनवरच्या डिजिटल आंदोलनातूनच जगभर प्रसिद्धी मिळवितात. त्यांच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ पत्रकांएवढा टीआरपी तर कधीच कुणाला न मिळालेला. अगदी मोहोळमधील ‘देशमुख भैय्यां’च्या ऑडिओ क्लिपलाही. या लोकांनी एखादा दिवस आंदोलन केलं नाही तर ‘मीडिया’वालेच कॉल करून विचारतात ‘आज काही बातमी नाही का ?’ खरंतर, यांची सामाजिक तळमळ कौतुकास्पद, मात्र लोक उगाचंच काहीही बोलतात.

माढा-करमाळ्याच्या टापूतही पूर्वी ‘खुपसे’ नामक एक जबराट कार्यकर्ता खूप गाजायचा. कोणत्याही नेत्याविरुद्ध आवाज उठविणा-या या गड्यालाही कॅमे-याची भुरळ पडलेली. मात्र एक दिवस त्याच्याच शेतातल्या लोकांनी असा काही ‘कॅमेरा’ फिरविला की बस्सऽऽ. एकाच व्हिडिओ क्लिपमध्ये गडी पुरता गारद झाला. गेल्या वर्षभरात आवाज काही बाहेरच नाही उमटला. त्यामुळं समोरच्या ‘लेन्स’समोर ‘स्माईल प्लीज’ करणारी मंडळी कॅमेºयाला तेवढीच असतात दबकूनही, हेही तेवढंच खरं.

जाता-जाता

दादा...जरा बापूंचं ऐका !

पंधरा-वीस वर्षांपूर्वी ‘कासव’वाले ‘सुभाषबापू’ राजकारणात नवीन होते, तेव्हा त्यांच्या बाबतीत येणा-या चांगल्या-वाईट सर्व बातम्या अगदी सहजरित्या ते स्वीकारत. ‘कुठूनही का होईना, नेता नेहमी मीडियातून चर्चेत राहिला पाहिजे,’ ही त्यांची प्रामाणिक भूमिका असायची. मात्र हेच ‘बापू’ आता त्यांच्या संदर्भात मीडियातून काहीही ‘खुट्टऽऽ’ वाजलं की लगेच सावध होतात. तत्काळ तटस्थ राहण्याचा प्रयत्न करतात. ‘अतिप्रसिद्धी राजकारणात नेहमीच घातक ठरते’ हे त्यांनी अनुभवातून शिकलेलं. आता ‘सुभाषबापूं’चा जळजळीत स्वानुभव सांगोल्यातील ‘श्रीकांतदादांं’च्या लक्षात कधी येणार कुणास ठावूक ? तोपर्यंत चालू द्या, आपली लगाव बत्ती...

(लेखक 'लोकमत सोलापूर'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Smile please! Nose stick; Still the sweetness of ‘photosession’ ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.