दत्तात्रय वारे, शिक्षक, जि. प. प्राथमिक शाळा, जालिंदरनगर, ता. खेड, जि. पुणे
केरळच्या एका शाळेने पारंपरिक बैठक रचनेला फाटा देत वर्गात ‘यू’ आकाराची बैठक पद्धत स्वीकारल्याची बातमी वाचण्यात आली. उद्देश वर्गातल्या ‘बॅकबेंचर्स’ची संकल्पना मोडीत काढण्याचा! हे वाचताना वाबळेवाडी आणि जालिंदरनगर या शाळांमधले माझे अनुभव आठवले.वर्गातल्या बैठक रचनेचा हेतू केवळ शिक्षक समोर आणि विद्यार्थी मागे बसतील, एवढाच मर्यादित असू नये. शिक्षण ही एक कृतिशील, संवादात्मक आणि बहुपरिमिती प्रक्रिया आहे. प्रत्येक विद्यार्थी ही प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने अनुभवतो. कोणी ऐकून शिकतो, कोणी पाहून, तर कोणी कृती करून. त्यामुळे बैठकीची रचना ही शिकण्याच्या पद्धतीला पोषक असायला हवी. आजपर्यंत सरसकट स्वीकारलेली ‘बेंच पद्धती’ ही या सर्व विविधता गृहीत धरत नाही.
‘बॅकबेंचर्स’ ही संकल्पना ही केवळ मागच्या बाकांवर बसलेल्यांची नसून, ती विद्यार्थ्यांना केवळ श्रोते मानण्याच्या मानसिकतेतून निर्माण झाली आहे. वर्गातील प्रत्येक विद्यार्थी हा शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी असावा, ही खरी गरज आहे. मग तो मागे बसलेला असो वा पुढे. बैठक रचनेत परिवर्तन हे या मानसिकतेवर मात करण्यासाठी केले गेले पाहिजे.
काही मुलांमध्ये बॅकबेंचर्स असल्याची भावना निर्माण होणे हा वर्गातील शिक्षकाचा, नियोजनाचा पराभव आहे. केवळ एकच पद्धत सातत्याने वापरत राहिल्याने ही भावना निर्माण होण्यास मदत होते. ‘यू’ आकारात मुलांच्या बैठकव्यवस्थेचे काही दोष असू शकतील, जसे की फळ्याकडे पाहताना त्यांना शरीर रचनेच्या विपरीत डाव्या किंवा उजव्या बाजूला वळून पाहावे लागेल. अशी वर्गरचना केली तरीही जर काही विद्यार्थी शिक्षणप्रक्रियेमध्ये सहभागी होणार नसतील तर तीच पूर्वीची अवस्था पुन्हा नव्या नावाने निर्माण होऊ शकेल. थोडक्यात ही फक्त वरवरची मलमपट्टी वाटते.
ग्रामीण शाळांमध्ये मुलांना बसण्यासाठी बाके अवघ्या १५-२० वर्षांपूर्वीच आली. त्याआधी मुले जमिनीवर बसत. शहरी शाळा वा परदेशी शिक्षणपद्धतींचे अनुकरण हेच बेंच पद्धतीच्या स्वीकारामागचे प्रमुख कारण होते. थंड हवामानामुळे युरोपमध्ये बेंच आले आणि ‘शाळा आधुनिक वाटावी’ म्हणून आपणही ते तसेच स्वीकारले.
मी वाबळेवाडी आणि जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवले. बेंच पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये गटशिक्षण, संवाद, चळवळ, सहशिक्षण, आणि सहकार्य या सगळ्यात अडथळा होतो. शिक्षणप्रक्रिया खुली ठेवण्यासाठी बैठक रचना लवचिक हवी. शाळेत फक्त शिक्षक शिकवतील आणि मुले शिकतील इतक्याच संकुचित विचारांची बेंच ही व्यवस्था प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील सर्वांत मोठा अडथळा आहे. खरे तर शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून खूप काही शिकत असतात. त्यासाठी त्यांना सहजपणे बदलता येतील अशा वेगवेगळ्या गटांमध्ये जाण्यासाठी संधी, सुविधा व स्वातंत्र्य असावे लागते. हे बेंचमुळे शक्य होत नाही.
विद्यार्थ्यांच्या माणूस म्हणून जडणघडणीच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा अजून एक घटक शाळेमध्ये अप्रत्यक्षपणे अथवा अदृश्यपणे काम करत असतो त्याला आपण ‘स्कूल कल्चर’ असे म्हणू शकतो. हे स्कूल कल्चर विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. ते निर्माण होण्यासाठी विद्यार्थी-शिक्षक तसेच विद्यार्थी-विद्यार्थी यांचा परस्पर संबंध कारणीभूत असतो. बेंच आणि शिस्त अशा बंदिस्त व्यवस्थेमध्ये हे कल्चर विकसित व पूर्ण क्षमतेने कार्यरत होत नाही.
शाळा ही केवळ वर्गांचा समूह नसून, ती एक शिकणाऱ्या समुदायाची जागा आहे. शिक्षक हा संपूर्ण शाळेचा असतो- एका वर्गापुरता मर्यादित नसतो. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांचे शिक्षण चार टप्प्यांमध्ये विभागले गेले पाहिजे. स्वतः शिकणे, मित्रांच्या मदतीने शिकणे, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिकणे आणि शिक्षकाच्या मदतीने शिकणे. त्यासाठी संपूर्ण शाळा हेच एक शिक्षणकेंद्र असायला हवे. बैठक रचना, वेळापत्रक, वर्गरचना आणि पुस्तके- या सर्वांना जर छेद देता आला, तर आपण केवळ ‘बॅकबेंचर्स’च नव्हे, तर शिक्षणप्रणालीतील अनेक प्रश्नांना योग्य उत्तरं नक्कीच शोधू शकतो.
dattajiware@gmail.com