महाराष्ट्रात पुन्हा 'पहाटेचा शपथविधी' होईल?; थोड्याच दिवसांत अंदाज येईल

By यदू जोशी | Published: October 31, 2020 02:52 AM2020-10-31T02:52:05+5:302020-11-02T17:20:57+5:30

Maharashtra Politics : भाजपवाल्यांना आवडो न आवडो, पण ठाकरेंच्या भाषणानं शिवसेना चार्ज्ड झाली. शरद पवार कधीही भाजपसोबत जाणार नाहीत. राज्यातील काँग्रेसच्या  नेत्यांना सत्ता सोडण्याची दूरदूर इच्छा नाही. त्यामुळे सरकार ‘फेविकॉल का जोड’ होत चाललं आहे.

Shiv Sena's announcement of 'swabal' & more frustration of BJP' ! | महाराष्ट्रात पुन्हा 'पहाटेचा शपथविधी' होईल?; थोड्याच दिवसांत अंदाज येईल

महाराष्ट्रात पुन्हा 'पहाटेचा शपथविधी' होईल?; थोड्याच दिवसांत अंदाज येईल

Next

- यदू जोशी  

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चार दिवसांपूर्वी शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांची ऑनलाइन बैठक घेतली. ‘विधानसभेवर स्वबळावर भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा’ असं आवाहन त्यांनी त्या बैठकीत केल्याच्या बातम्या छापून आल्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर खोचक प्रतिक्रिया दिली. ‘स्वबळाची ही भाषा मी तीस वर्षांपासून ऐकतोय’ असा चिमटा त्यांनी काढला. 

तीन पक्षांचं सरकार आपण चालवतोय याचं भान उद्धवजींना नक्कीच आहे; पण तरीही पक्षातील नेत्यांचं मनोबल वाढविण्यासाठी तसं बोलावंच लागतं. शरद पवार पंतप्रधान होणार हेही आपण जवळपास  तीस वर्षांपासून ऐकतोच आहोत ना! पण स्वत: पवार यांनी  ‘माझ्या पक्षाचे खासदार किती, पंतप्रधान होण्यासाठी लागणारं संख्याबळ किती, या सगळ्यांचं भान मला आहे’, असं वेळोवेळी म्हटलंच आहे. 

 १९९५ पासून आतापर्यंतच्या २५ वर्षांत महाराष्ट्रातील मतदारांनीही युती वा आघाडी धर्मावरच शिक्कामोर्तब केलेलं आहे. गेल्यावेळी ते युतीवर केलं आणि सरकार आघाडीचं आलं हा भाग वेगळा. आघाडीशिवाय पर्याय नसलेली शिवसेना स्वबळाचं स्वप्न पाहत आहे अन् सर्वाधिक आमदार निवडून येऊनही सत्तेसाठी आवश्यक असलेले आणखी २५-३० आमदार मिळविण्याच्या विवंचनेत भाजपचं मनोधैर्य खचत चाललं आहे. भाजपचे केंद्रातील एकेक मित्रपक्ष सोडून जात आहेत आणि महाराष्ट्रात चंगूमंगू पक्षांशिवाय मोठा मित्र मिळत नाही ही अडचण आहे. आपलं सरकार येणार, हे छातीठोकपणे सांगत असलेल्या भाजप नेत्यांना  ‘आकड्यांचा मेळ कसा साधणार?’ असं विचारलं की ते  ‘तुम्ही फक्त पाहत राहा, डिसेंबरमध्ये चमत्कार होईल!’ एवढंच सांगतात. हे  केवळ विशफुल थिंकिंग आहे. 

भाजपपासून शिवसेना खूपच दुरावली अन् दुखावली आहे. दसरा मेळाव्यातील त्यांच्या भाषणात ही कटुता दिसली. भाजपवाल्यांना आवडो न आवडो, पण ठाकरेंच्या भाषणानं शिवसेना चार्ज्ड झाली. शरद पवार कधीही भाजपसोबत जाणार नाहीत. भाजपसोबत जावं असं वाटणाऱ्या त्यांच्या आप्तस्वकीयांचे मनसुबे म्हणूनच प्रत्यक्षात उतरत नाहीत. राज्यातील काँग्रेसच्या  नेत्यांना सत्ता सोडण्याची दूरदूर इच्छा नाही. त्यामुळे सरकार ‘फेविकॉल का जोड’ होत चाललं आहे. तरीही  बिहारच्या निकालावर बरंच काही अवलंबून असेल. तिथे नितीशकुमार-भाजप हे कॉम्बिनेशन जिंकलं तर महाराष्ट्रात पहाटेच्या शपथविधीची पुनरावृत्ती होऊ शकेल. पार्टनर कोण असेल ते आताच सांगता येत नाही. 

भाजप खुर्द अन् भाजप बुद्रुकमधील वाद 
खेड्यात एकाच गावाचे दोन भाग असतात ते म्हणजे खुर्द अन् बुद्रुक. खुर्द हे लहान तर त्या मानानं बुद्रुक मोठं असतं. गाव एकच; पण एखादी नदी, ओढ्यानं ते विभागलेलं असतं. गावावर संकट आलं की सगळे एक होतात. एरव्ही बरेचदा आपसी वाद उद‌्भवतात अन् ते सामोपचारानं पंचायतीसमोर मिटतातही. महाराष्ट्र भाजपमध्ये असं खुर्द-बुद्रुकचं वातावरण सध्या दिसतं आहे. तिथेही एका पंचायतीची गरज आहे. काही नेते समृद्ध अडगळ ठरू लागले आहेत. एकनाथ खडसे सोडून गेले हा पक्षासाठी आत्मचिंतनाचा विषय असल्याचं एका नेत्याला वाटतं, तर दुसरा म्हणतो की खडसेंनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. यातून विरोधाभास दिसतो. महाविकास आघाडीच्या सरकारला घेरण्याची मोठी संधी असताना भाजपचे नेते एकमेकांना पाण्यात पाहताना दिसत आहेत. 

सामाजिक अस्मितांना आणखी टोक 
मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, मुस्लीम आरक्षण, ओबीसींवरील अन्याय, पदोन्नतीतील आरक्षण अशा मुद्द्यांवर सामाजिक अस्मिता टोकदार होत असतानाच त्या आपसातील संघर्षाचा विषय ठरू पाहताहेत. अकरावीची प्रवेशप्रक्रिया आरक्षणाच्या मुद्द्यावरून रखडली. एमपीएससीची परीक्षा रद्द झाली. पदोन्नतीतील आरक्षणावरून कर्मचाऱ्यांमध्ये आपसात कटुता आहे. बडे अधिकारी, सामान्य कर्मचाऱ्यांचे जातनिहाय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप विद्वेषाचे वाहक बनले आहेत. सवलतींच्या गाडीत बसण्यावरूनचे वाद तीव्र होण्याची भीती आहे. ते टोकाला जाऊ न देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. 

अधिकार मिळेनात; राज्यमंत्र्यांमध्ये खदखद
बरेचसे कॅबिनेट मंत्री अधिकारच देत नसल्याने राज्यमंत्र्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. सगळ्याच पक्षांचे राज्यमंत्री सध्या एकत्र आले असून, दर आठवड्याला भेटून चर्चा करतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे बहुतेकांनी तक्रारी केल्या. राज्यमंत्री बच्चू कडूंचंच घ्या, जलसंपदा, कामगार, शालेय शिक्षण, महिला व बालविकास आदी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आहेत; पण जलसंपदाचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील सोडले तर त्यांना कोणी अधिकारच देत नाही. पूर्वी एक राज्यमंत्री गजानन महाराजांची मूर्ती, फोटोंना नमस्कार करत दिवसभर रिकामे बसलेले असत. बिनपगारी फुल अधिकारी अशी राज्यमंत्र्यांची अवस्था अजूनही कायम आहे.

Web Title: Shiv Sena's announcement of 'swabal' & more frustration of BJP' !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.