Shinde government! | शिंदे सरकार !

शिंदे सरकार !

- सचिन जवळकोटे

गेली पाच वर्षे सोलापूरकरांनी ‘देशमुखी थाट’ पाहिला. दोन देशमुखांचा रुबाब अनुभवला. त्यांचे रुसवे-फुगवेही बघितले. आता काळ बदलला, परिस्थितीही बदलली. नवं सरकार आलं. ‘देशमुखी’ गेली, ‘शिंदेशाही’ आली. होय... आता दोन ‘शिंदें’च्या ताब्यात हळूहळू जिल्ह्याची सूत्रं चालली. एक ‘सोलापूरच्या ताई’ तर दुसरे ‘माढ्याचे मामा’. लगाव बत्ती.

कुणाचं विमान हवेत ?

गोष्ट बोरामणी विमानतळाची. घोषणा होऊन कैक वर्षे झाली. नियोजित जागा राजकीय ढेकळात अडकली. गटबाजीच्या कुसळात भरकटली. आपल्या नातवाच्या नातवाला तरी बोरामणी गावावरनं उडणारं विमान पाहता येईल की नाही, याची शाश्वती सोलापूरकरांनीच सोडली; मात्र ‘प्रणितीताई’ चिवट. सरकार बदलल्यानंतरचा सर्वात मोठा फायदा त्यांनी या विमानतळासाठी करून घेतला. खरंतर ‘धाकटे दादा बारामतीकर’ यांनी काही महिन्यांपूर्वीच निधीची घोषणा केलेली; मात्र ती पेपरातल्या बातमीपुरतीच रंगलेली. बोरामणीच्या माळरानावर गवताचं पातंदेखील हललं नाही. 
मात्र परवाच्या बैठकीआधी वेगळंच घडलं. ‘धाकटे दादा बारामतीकरां’चा कॉल थेट ‘संजयमामां’ना. ‘सोलापूरसाठी अशी-अशी बैठक लावलीय, तुम्हीपण आवर्जून उपस्थित राहा.’ बैठकीच्या ठिकाणी ठरल्याप्रमाणं ‘ताई’ आल्या. ‘भरणेमामा’ही आले; मात्र ध्यानीमनी नसताना तिथं ‘संजयमामां’ना पाहून बरेचजण दचकले. बैठक सुरू झाली. ‘निधी आत्ताच मिळावा,’ हा ‘ताईं'चा हट्ट होता, तर ‘डिसेंबरमध्ये निधी खर्ची टाकू या’ असा ‘अजितदादां’चा मानस होता. ‘ताई’ हटून बसल्या. ‘दादा’ही ठाम राहिले. आता पुढं काय...?

  एवढ्यात ‘संजयमामां’नी शब्द टाकला. ‘दादाऽऽ जाऊ द्या करून टाकाऽऽ’...मग काय...झटक्यात सही झाली. ‘ताईं'चा चेहरा उजळला. ‘दादा’ही गालातल्या गालात हसले; कारण त्यांनी ‘शिंदें’च्या एका दगडात दोन पक्षी मारले. एकीकडं ‘हात’वाल्यांच्या डोक्यावर हात ठेवला, तर दुसरीकडं जिल्ह्यात आपल्या माणसाचा म्हणजे ‘संजयमामां’चा वट वाढवून ठेवला. खरंतर, बोरामणी कुठं अन् निमगाव कुठं ? काय संबंध या विमानतळाशी ‘मामां’चा ? तरीही जिल्ह्याशी संबंधित कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात यापुढे ‘संजयमामा’च चालणार, हा ‘मेसेज’ही ‘दादां’नी पद्धतशीरपणे जगाला देऊन टाकला. बिच्चारे ‘भरणेमामा’ मात्र शेवटपर्यंत बघतच राहिले. कारण तिथल्या अधिका-यांनाही कळेना की जिल्ह्याचे खरे ‘पालक’ कोणते ‘मामा’ ?

दरम्यान, ‘बोरामणी’चा गाजावाजा झाला तर आपसूकच ‘होटगी रोड’कडं दुर्लक्ष केलं जाऊ शकतं. तिथल्या ‘चिमणी’चंही विस्मरण होऊ शकतं, ही जबरदस्त स्ट्रॅटेजी कुणी राबविली, याचा शोध म्हणे काही सोलापूरकर घेताहेत. ‘थोरले काका बारामतीकरां’नी दिलेला शब्द सोलापुरात कोण पूर्ण करतंय, याचीही ‘केतनभाई’ म्हणे ‘शहा’निशा करताहेत. कदाचित त्यासाठी तर नव्हे त्यांनी शनिवारी ‘ताईं'ची भेट घेतलेली. लगाव बत्ती..

जाता-जाता

सत्तांतरानंतर ‘ताई’ अन् ‘मामा’ या दोघांचाही राजकीय टीआरपी सध्या वाढत चाललाय. ‘ताईं'च्या या जडणघडणीत जसा त्यांच्या ‘पिताश्रीं’चा मोठा वाटा, तसाच ‘मामां’च्या यशातही त्यांच्या ‘वहिनीं’चा अन् ‘भैय्यां’चा सिंहाचा वाटा राहिला, तर ‘निमगाव’चं ‘शिंदे’ घराणं जिंकलं म्हणायचं. तसंच सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची स्टाईल जशी ‘मामां’नी डेव्हलप केली, तशीच ‘ताईं'नीही अवलंबिली तर लय भारी म्हणायचं. लगाव बत्ती..

नेते असतातच एकत्र...
.. भांडतात केवळ कार्यकर्ते !

विमानतळासाठी निधी मिळाल्याची बातमी देताना ‘शिंदेसाहेबांनी अजितदादांना स्वत:हून फोन केला बरं काऽऽ’ असं आवर्जून दोन-दोन वेळा ‘शहां’चे ‘पराग’ मीडियावाल्यांना सांगत होते. तेव्हाच आम्हा पामरांच्या डोक्यात बत्ती लागली की, ‘शिंदे-पवार एकच आहेत’ हे ठसविण्याचा प्रयत्न म्हणजे ‘सुरेश-प्रकाश’ जोडगोळीचा स्वप्नभंग निश्चित.. अन् लगेच दुस-या दिवशी घडलंही तसंच. ‘बळीरामकाकां’ना भेटून साष्टांग नमस्कार घालण्याची वेळ ‘हात’वाल्यांवर आलेली. ‘काकां’च्या विरोधातील पत्र मागं घ्यायला लावणार म्हणजे लावणारच, हे गेल्या ‘लगाव बत्ती’मध्येच छातीठोकपणे सांगितलेलं; कारण वरचे मोठे नेते आतून एकच असतात. सतरंज्या उचलणारी खालचीच मंडळी घडी घालण्यावरून एकमेकांशी विनाकारण भांडत बसतात.
 
  असो. ‘निधी’च्या बदल्यात ‘रिटर्न लेटर’ द्यायला लावणा-या ‘सुशीलकुमारां’नी ‘पाटलां’च्या ‘प्रकाश’ना ‘दुधनी’च्या ‘सिद्धूअण्णां’कडं पाठविलेलं. बिच्चारे ‘अण्णा’ अगोदरच ‘एमएलसी’ची मांडणी करून बसलेले. त्यांच्या जीवावर ‘हसापुरे’ परस्पर काय करताहेत, हे त्यांनाही म्हणे (!) माहीत नव्हतं; परंतु ‘अण्णां’ना एवढं पुरतं ठावूक की, ‘जसं बारामतीकरांना खूश ठेवलं, तर सुशीलकुमार राहू शकतात निर्धास्त. तसंच शिंदेंना खूश ठेवलं तर आपणही राहू शकतो बिनधास्त’.. त्यामुळंच बिच्चा-या ‘हसापुरें’चा प्लॅन मोडला; पण कोणता म्हणता.. ‘हात’वाल्यांचा ‘जिल्हाध्यक्ष’ होण्याचा ?  लगाव बत्ती...

(लेखक 'लोकमत सोलापूर'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Shinde government!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.