शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?

By यदू जोशी | Updated: May 9, 2025 06:53 IST2025-05-09T06:52:44+5:302025-05-09T06:53:33+5:30

'सुप्रिया कधीही भाजपसोबत जाणार नाही', असे पवार म्हणत नाहीत; पण 'एकत्र येण्याचा निर्णय अजित-सुप्रिया यांनी घ्यावा, असेही म्हणतात, म्हणजे काय?

Sharad Pawar spoke about ncp going with ajit pawar, what exactly does that mean? | शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?

शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?

- यदु जोशी, 

सहयोगी संपादक, लोकमत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील, असे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिसते. 'मिनी विधानसभे'ला राज्य सामोरे जाईल. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवातून उद्धवसेना, काँग्रेस आणि शरद पवार गट अद्याप सावरलेले नाहीत. महाविकास आघाडीसाठी भूकंपच इतक्या रिश्टर स्केलचा होता की, अपार पडझडीने झालेले नुकसान अजूनही भरून निघालेले नाही. हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तर झाले; पण त्यांच्याकडे ओसाड गावची पाटीलकी आलेली आहे. वाळवंटात पाणी शोधत आहेत. भाजपशी जोरदार संघर्ष करण्याची मानसिकताच काँग्रेसमध्ये दिसत नाही. फोटो काढून तो छापण्यासाठी आंदोलन करणारे अधूनमधून काहीतरी करत असतात तेवढेच. काँग्रेस आजही लोकांमध्ये आहे; पण ती त्यांच्या नेत्यांनाच दिसत नाही.

शरद पवारांचे सगळे गुण घेऊन अजित पवार पक्ष वाढवत आहेत आणि तिकडे शरद पवार कधी नव्हे ते गोंधळलेले दिसत आहेत. 'कन्या सुप्रिया सुळे यांनी संसदेत विरोधी पक्षात बसावे की, सत्तापक्षात याचा निर्णय तिनेच घ्यावा,' असे पवार यांनी एका मुलाखतीत नुकतेच म्हटले आहे. त्याच वेळी विरोधी इंडिया आघाडीने भाजपला एक सक्षम पर्याय द्यायला हवा असेही ते म्हणत आहेत. 'अजित पवार यांच्यासोबत जावे' असा एक मतप्रवाह त्यांच्या पक्षात असल्याचेही त्यांनी मान्य केले. भाजपसोबत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षही जाऊ नये, असा दुसरा प्रवाहही त्यांच्या पक्षात आहे. इंडिया आघाडीचा एक प्रमुख आधारस्तंभ असलेले शरद पवार आपल्या मुलीने इंडिया आघाडीसोबत राहावे की नाही याचा निर्णय तिच्यावर सोडत आहेत. 'सुप्रिया माझी कन्या आहे, ती कधीही भाजपसोबत जाणार नाही' असे ते ठामपणे म्हणत नाहीत. त्याच वेळी, 'एकत्र येण्याचा निर्णय अजित आणि सुप्रिया यांनी घ्यावा, मी त्या प्रक्रियेत नाही,' असेही ते म्हणतात. याचा अर्थ काय घ्यायचा? अशा विधानांमध्येच उद्याची समीकरणे दडलेली आहेत, पुढेमागे एकच राष्ट्रवादी राहील, असे दिसते. काँग्रेस, शरद पवार गटात भवितव्य दिसत नाही, तेव्हा महायुतीसोबत गेलेले बरे असे वाटणारा एक वर्ग या दोन्ही पक्षांत आहे. अजित पवार गट अनेकांना सुरक्षित वाटतो. सत्तेसोबत जायलाही मिळते आणि पक्षाच्या नावात काँग्रेसही राहते असा हा विचार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपखालोखाल यश अजित पवारांना मिळेल असा एक अंदाज आहे.

शिंदेंचे काय चालले आहे?
एकनाथ शिंदेंच्या पक्षात विधानसभा निवडणुकीपूर्वी बरेच लोक गेले, नंतरही गेले; पण सध्या जरा हे प्रमाण कमी झाले आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर शिंदेंच्या पक्षाला किती आणि कसे भवितव्य असेल हा विचार आता सुरू झाला आहे. मुख्यमंत्री म्हणून शिंदे भरभरून देत होते, आता त्या देण्याला साहजिकच मर्यादा आल्या आहेत किंवा येत राहतील. शिवाय अजित पवार आपल्या पक्षातील मंत्र्यांना, नेत्यांना पक्षकामासाठी जेवढे उत्तरदायी करतात, तेवढे शिंदे करताना दिसत नाहीत. शिंदेंचे बरेच मंत्री थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असतात. 'पक्ष म्हणून आमचे नेते शिंदे, तर सरकार म्हणून फडणवीस' अशी विभागणी करताना काही मंत्री दिसतात. तरीही 'लाडकी बहीण' सारख्या धडाकेबाज योजना आणणारे शिंदे आजही जनमानसांत प्रिय आहेत.

भाजपमध्ये नो व्हेकन्सी
इतर कोणत्याही पक्षापेक्षा भाजपमध्ये जाण्यास अन्य पक्षजन इच्छुक आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचे विविध पक्षांमधील नेत्यांना आकर्षण आहे; पण त्या-त्या जिल्ह्यातील प्रस्थापित भाजपवाल्यांना बाहेरचे लोक आता नको आहेत. बाहेरून आलेल्यांचे खूप लाड झाले, आता आमचे लाड करा, ही त्यांची भावनाही चुकीची नाही! सत्तेत आणखी वाटेकरी त्यांना नको आहेत. लोकसभा आणि विशेषतः विधानसभा निवडणुकीत पक्ष सोडून गेलेले लोक परतू पाहत आहेत; पण 'त्यांना धडा शिकवा, ताटकळत ठेवा, थोडक्यात काय तर त्यांची गंमत घ्या' असा अॅप्रोच दिसत आहे.
yadu.joshi@lokmat.com

Web Title: Sharad Pawar spoke about ncp going with ajit pawar, what exactly does that mean?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.