- अच्युत गोडबोले (आर्थिक विषयाचे तज्ज्ञ)अलीकडेच एकीकडे भारताचा जीडीपी वाढीचा दर ८.२% असल्याची बातमी आली आणि त्याचवेळी डॉलरचा भाव ९० रुपयांपेक्षा जास्त झाल्याचीही बातमी आली. त्याचबरोबर स्टॉक मार्केट खूप वरती जातंय अशीही बातमी आली. मग हे काय गौडबंगाल आहे ? हे सगळं चांगलं म्हणायचं का वाईट म्हणायचं याचा गोंधळ बऱ्याच लोकांच्या मनात घोळायला लागला. पण यातल्या एकेक गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत. फॉरेन एक्सचेंजच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जेव्हा पुरवठ्यापेक्षा चलनाची मागणी जास्त होते तेव्हा चलनाचा भाव वाढतो आणि मागणीच्या मानानं चलनाचा पुरवठा वाढतो तेव्हा चलनाचा भाव कमी होतो.
कुठलाही देश जेव्हा निर्यातीपेक्षा आयात जास्त करतो तेव्हा त्याच्या चलनाचा भाव घसरतो. याचं कारण निर्यात आणि आयात या दोन्ही गोष्टी डॉलरमध्ये होत असल्यामुळे आपण जेव्हा निर्यात करतो तेव्हा डॉलर्स आपल्याला मिळतात पण जेव्हा आपण आयात करतो तेव्हा आपण रुपयाचे डॉलर्स विकत घेतो आणि ते डॉलर्स देऊन परदेशातून वस्तू किंवा सेवा आयात करतो. त्यामुळे डॉलरचा भाव वाढतो व रुपयाचा घसरतो. भारतामध्ये गेली अनेक वर्ष हेच चाललेलं असल्याने रुपयाचा भाव घसरत चालला आहे.
आणखीन एक कारण म्हणजे शेअर मार्केटमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवलेला पैसा काढून घ्यायला सुरुवात करणं. जेव्हा परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअरबाजारात शेअर विकत घेतो तेव्हा तो आपले डॉलर्स देऊन रुपये विकत घेतो. त्या रुपयांनी भारतातले शेअर्स विकत घेतात. याउलट जेव्हा ते शेअर्स विकतात तेव्हा मिळालेल्या रुपयांचे डॉलर्स खरेदी करतात आणि ते परदेशी नेतात. त्यामुळे डॉलर्सची मागणी वाढते व डॉलरचा भाव रुपयाच्या मानानं वाढतो म्हणजेच रुपया घसरतो. परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक काढून घेत आहेत. त्यामुळे रुपयाचा भाव घसरतोय.
काय करावे लागेल?
रुपयाचा भाव वाढण्याकरता निर्यात वाढवली पाहिजे, किंवा परदेशी गुंतवणूक आकर्षुन घेतली पाहिजे. या दोन्ही गोष्टी शक्य नसतील तर तिसरा उपाय म्हणजे रिझर्व बँक डॉलर्स विकून रुपये विकत घेते व अशा कृत्रिम तऱ्हेनं रुपयाची मागणी वाढवून रुपयाचा भाव वधारते.
Web Summary : Rupee dips due to high imports, foreign investor pullout. Boosting exports and attracting investment can stabilize it. RBI intervention offers temporary relief.
Web Summary : उच्च आयात, विदेशी निवेशक निकासी के कारण रुपया गिरा। निर्यात को बढ़ावा देना और निवेश आकर्षित करना इसे स्थिर कर सकता है। आरबीआई का हस्तक्षेप अस्थायी राहत प्रदान करता है।