११ ऑगस्ट रोजी क्रिस्टियानो रोनाल्डो आणि जाॅर्जिना राॅड्रिग्ज यांनी साखरपुडा केल्याचं जगजाहीर केलं. त्यानंतर सर्वत्र चर्चा झाली ती रोनाल्डोने जाॅर्जिनाच्या बोटात घातलेल्या ३७ कॅरेटच्या हिऱ्याच्या अंगठीचीच. किंमत? - ५० लाख अमेरिकन डाॅलर्स! जाॅर्जिनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून साखरपुड्याची बातमी जाहीर केली त्यात टॅग केलेलं ठिकाण हे सौदी अरेबियाची राजधानी रियाध होतं. रियाधमध्ये या दोघांचा साखरपुडा होणं कसं शक्य आहे?
पोर्तुगालचा प्रसिद्ध फुटबाॅलपटू रोनाल्डो गेल्या दोन वर्षांपासून आपल्या कुटुंबासमवेत सौदी अरेबियात राहतो. त्याच्या कुटुंबात तो, त्याची मैत्रीण जाॅर्जिना आणि त्यांची पाच मुलं आहेत. त्यातील दोन मुलं रोनाल्डो आणि जाॅर्जिनाची, तर तीन मुलं रोनाल्डो आणि त्याच्या आधीच्या जोडीदाराची आहेत. सौदी अरेबियात लग्नाशिवाय एकत्र राहणं, लिव्ह इन नातेसंबंध, लग्नाबाहेरचे नातेसंबंध यांना मान्यताच नाही. दहा वर्षांपूर्वी सौदी अरेबियात पोलिस रस्त्यावर अविवाहित जोडप्यांना शोधत फिरायचे, असे कोणी दिसले की ताब्यात घेऊन तुरुंगात डांबायचे, विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्यांना तर फटक्यांची शिक्षा दिली जायची. अशा देशात रोनाल्डो आणि जाॅर्जिना लग्नाशिवाय आपल्या पाच मुलांसोबत राहतात. एकीकडे गाडीत परक्या व्यक्तीसोबत बसून प्रवास करण्याला येथील स्थानिक महिलांवर निर्बंध असतात, लग्नाचे प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय येथील महिलांना आरोग्य सेवा आणि त्यांच्या मुलांना शाळाप्रवेश मिळत नाही तिथे रोनाल्डो आणि जाॅर्जिना हे खुलेआम लग्नाशिवाय राहतात, हे कसं?
याचं उत्तर २०१५ मध्ये उदयास आलेल्या राजपुत्र मोहमद बिन सलमान यांच्या नवीन शासनपद्धतीत आहे. त्यांनी २०३० नजरेसमोर ठेवून सामाजिक नियम बरेच शिथिल केले. देशात क्रीडा स्पर्धा आणि मोठमोठ्या मैफली आयोजित करण्यावर भर दिला. फुटबाॅलच्या सौदी प्रो- लीगसाठी जागतिक वलय असलेल्या खेळाडूंना आपल्या देशाकडे आकृष्ट केले. २०२३ मध्ये रोनाल्डोने अल नासर या संघासाठी सौदी अरेबियाशी मोठा करार केला. या करारापोटी सौदी अरेबियाने रोनाल्डोला ७०० मिलियन डाॅलर्स एवढी मोठी रक्कम मोजली आहे. सायनिंग बोनस म्हणून ३३ मिलियन डाॅलर्ससोबतच त्याला आणि त्याच्या कुटुंबाला सौदी अरेबियात श्रीमंती जगण्यासाठी आणखी २ मिलियन डाॅलर्सही देण्यात आले आहेत.
जगाच्या नजरांना अजूनही सौदी अरेबियाचे सामाजिक निर्बंध खुपतात; पण रोनाल्डो आणि जाॅर्जिना मात्र सौदी अरेबियातील आपल्या मुक्त आणि श्रीमंती जगण्याचे फोटो टाकून जगाला सौदी अरेबियाची बदललेली प्रतिमा दाखवतात. जे आयुष्य रोनाल्डो आपल्या मैत्रिणीसमवेत जगतो आहे, तेच आयुष्य सौदी अरेबियातील सामान्य स्त्री-पुरुषही जगतात, असं मात्र नाही. कारण, मोहमद बिन सलमान यांनी सामाजिक नियमांमध्ये बदल केलेले असले तरी तेथील मूळ कायदे अजूनही तसेच आहेत. रोनाल्डो आणि जाॅर्जिना लग्नाशिवाय एकत्र राहत असले तरी या देशात लग्नाशिवाय एकत्र राहण्याला परवानगी आहे, असं कोणीही म्हणणार नाही. उलट स्थानिकांना वेगळा नियम आणि रोनाल्डोला वेगळा न्याय असाच समज जगाचा झाला आहे. जगाच्या नजरेतली आपली प्रतिमा बदलण्यासाठी धडपडणारा देश हा समजही बदलू शकेल का? - याचं उत्तर भविष्यात कदाचित मिळेल!