आजच्या काळात ‘शेतकऱ्याचा असूड’ची प्रासंगिकता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 06:01 AM2019-11-28T06:01:59+5:302019-11-28T06:02:18+5:30

महात्मा जोतीराव फुले यांनी १८८३ साली ‘शेतकºयाचा असूड’ हा ग्रंथ लिहून शेतकऱ्यांचे दैन्य प्रथमच जगाच्या वेशीवर टांगले.

The relevance of 'Farmer's Assad' today | आजच्या काळात ‘शेतकऱ्याचा असूड’ची प्रासंगिकता

आजच्या काळात ‘शेतकऱ्याचा असूड’ची प्रासंगिकता

googlenewsNext

- बी. व्ही. जोंधळे
सामाजिक विषयांचे अभ्यासक

महात्मा जोतीराव फुले यांनी १८८३ साली ‘शेतकºयाचा असूड’ हा ग्रंथ लिहून शेतकऱ्यांचे दैन्य प्रथमच जगाच्या वेशीवर टांगले. त्यांनी या ग्रंथात शेतकºयांच्या दुर्दशेचे जे दाहक वर्णन केले आहे त्या शेतकºयांच्या दैन्यावस्थेत आजही फारसा फरक पडलेला नाही. शेतकºयांना दररोज आत्महत्या कराव्या लागत आहेत. वस्तुत: म. फुले हे कुणी अर्थशास्त्रज्ञ नव्हते. त्यांनी शेतकºयांच्या प्रश्नांची शास्त्रीय पद्धतीने चिकित्सा केली आहे, असेही नव्हे. पण येथील जातीय नि वर्गीय व्यवस्थेमुळे शेतकºयांचे जे अमानुष शोषण होत आले त्याची पहिली जाण ही जोतीरावांनाच झाली आणि ती त्यांनी रोखठोक लेखनातून प्रभावीपणे व्यक्त केली; म्हणूनच ‘शेतकºयाचा असूड’ या ग्रंथाचे महत्त्व आज १३६ वर्षांनंतर कायम आहे, हे विशेष!

‘शेतकºयाचा असूड’ या ग्रंथात शेतकºयांच्या दुर्दशेची कारणमीमांसा करताना जोतीराव म्हणतात, ‘ब्राह्मण हे भूदेव आणि राजा हा ईश्वराचा अंश’ असल्यामुळे आपणावर काही अन्याय होतोय ही कल्पनाच येथील शेतकºयांच्या मनाला शिवली नाही. धर्म नि राज्यव्यवस्थेकडून होत आलेले शोषण म्हणजे आपल्या नशिबाचाच एक भाग आहे, असे समजून शेतकरी वागत आल्यामुळे ते दारिद्र्याच्या खाईत लोटले गेले. शेतकºयांचे अज्ञान, त्यांचे अडाणीपण यामुळेही शेतकºयांची पिळवणूक होत आली, असे निरीक्षण नोंदवून जोतीराव म्हणतात, ‘शेतकºयांनी आपले अज्ञान, आळस, धर्मभोळेपणा, व्यसनाधीनता व गतानुगतिकतेचा त्याग केल्याशिवाय त्यांचे भले होणार नाही.’

सावकार-अंमलदार शेतकºयांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना कसे लुबाडतात, याचे मर्मभेदी वर्णन करताना जोतीराव लिहितात, ‘शेतकºयाने स्टांप आणल्यानंतर कुलकर्णी वगैरे लोकांकडून त्याजमध्ये नाना प्रकारच्या अटी लिहून घ्याव्या आणि त्याजवर त्याची वा त्याच्या भाऊबंदाची किंवा मुलाची सही साक्ष घेऊन त्याच्या हातावर लिहिणावळीचा वगैरे खर्च कमी करून दहा-बारा रुपयांबद्दल नऊ-दहा रुपये ठेवावे. तो कागद लिहून त्यास काही दिवस लोटल्यावर त्याचे व्याज मुद्दल जरी त्यास मिळून चुकले तरी त्या व्याजाचे व्याज आणि पडव्याज जुळून त्याच्या मुलाच्या लग्नाकरिता थोडेसे पैसे देऊन त्याजबद्दल नवीन कागज लिहून घ्यावा. येणेप्रमाणे क्रम चालून तीन-चार वर्षांत सुमारे दोनशे-अडीचशे रक्कम फुगली म्हणजे सरकारात फिर्याद टाकून त्या खर्चासह तीनशे अथवा सव्वा तीनशे रुपयांचा हुकूमनामा काढून अन्नधान्य काढण्याच्या वेळी शेतीवर जप्ती बसवावी.’ जोतीरावांच्या काळात सावकार आणि अधिकाºयांच्या भ्रष्ट युतीमुळे शेतकºयांची जशी पिळवणूक नि फसवणूक होत असे तशी ती आजही होते म्हणून त्यांना आत्महत्या कराव्या लागतात, हे आपले दाहक समाजवास्तव.


म. फुले शेतकरी हितदक्ष होते. ब्रिटिश सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणास त्यांनी वेळोवेळी विरोध केला. उदा. शेतकºयांना भरपूर पाणी मिळावे म्हणून लक्षावधी रुपये खर्च करून शासनाने कालवे बांधले; पण त्याचा हेतू इंग्लंडमधील सावकारांना महाव्याज नि इंजिनीअरांना चांगला पगार मिळावा हा असल्याचे त्यांनी नोंदविले. शेतकºयांकडून भरमसाट करवसुली करून त्यांना पाणी व अन्य सुविधा मात्र पुरवीत नाही ही बाबही त्यांनी आक्षेपार्ह ठरवली. शेतकºयांच्या कराचा विनियोग शहरवासीयांच्या सुख-सुविधांसाठी होतो ही बाब त्यांना मान्य नव्हती.
जोतीरावांनी शेतीसुधारणेचे उपाय सुचविताना पाणीपुरवठ्याच्या योजनांना अग्रस्थान दिले. गोरक्षणाची आवश्यकताही त्यांनी प्रतिपादन केली होती; पण गोरक्षणामागची त्यांची दृष्टी धार्मिक नव्हे, तर सामाजिक उपयुक्ततेची होती. शेतकºयांना नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळून यंत्राद्वारे शेती करण्याचे तंत्र जोवर अवगत होत नाही तोवर गोरक्षण असावे, असे त्यांनी म्हटले होते. जनावरांमुळे शेतीचे नुकसान झाले तर शासकीय तिजोरीतून नुकसानभरपाई मिळावी, अशी सूचना त्यांनी केली होती.

शेतकºयांना कर्जपुरवठा करण्यासाठी बँकांचा विचार शासनाने केल्यावर जोतीराव म्हणाले, शेती किफायतशीर होत नाही तोवर बँका यशस्वी होणार नाहीत. त्यासाठी कराचा बोजा कमी करावा. शेतकºयांचे प्रश्न नजरेसमोर ठेवून अभ्यासक्रम तयार करावा, शेतकºयांना कर्जमुक्त करावे, अशा सूचना जोतीरावांनी केल्या होत्या.
जोतीरावांनी ‘शेतकºयाचा असूड’मधून शेतकºयांची जी दैन्यावस्था कथन केली, त्यात आजही फरक पडलेला नाही. महाराष्टÑात ऐन दिवाळीत अतिवृष्टीमुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल झाले. कोल्हापूर-सांगलीत महापूर आला. ताज्या आकड्यांनुसार राज्यातील ५४ लाख ८२ हजार हेक्टरवरील पिके नष्ट झाली. अतिवृष्टीने धुमाकूळ घातला होता तेव्हा महसूल कर्मचारी दिवाळीच्या सुटीचा आनंद लुटत होते. परिणामी, नुकसानीचे पंचनामे होऊ शकले नाहीत. अशातच विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. सत्तेची साठमारी सुरू झाली.
शेतकºयांच्या नावे पॅकेजेस् जाहीर होतात; पण ती शेतकºयांपर्यंत पोहोचत नाहीत. अतिवृष्टी किंवा अवर्षणाची झळ बसलेल्या शेतकºयांना मदतीसाठी विमा योजना आली; पण विमा कंपन्या शेतकºयांना मदत करण्याऐवजी त्यांची लूट करतात, असाच अनुभव आहे. तात्पर्य शेतकºयांची दैन्यावस्था कायम आहे. शेतकºयांनी आत्महत्या न करता त्यांचा ‘असूड’ शेतकरीविरोधी प्रवृत्तीवर उगारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Web Title: The relevance of 'Farmer's Assad' today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी