पुतीन परतले, पुढे...?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 07:43 IST2025-12-06T07:39:26+5:302025-12-06T07:43:21+5:30
भारतासाठी हा दौरा प्रतिकात्मकतेपेक्षा व्यावहारिक पातळीवर अधिक महत्त्वाचा होता. भारताच्या दृष्टीने गेल्या दोन-तीन वर्षांत घडलेला कदाचित सर्वात धक्कादायक बदल म्हणजे पाकिस्तानचे पुन्हा अमेरिकेच्या कवेत जाणे!

पुतीन परतले, पुढे...?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. त्यामागील कारण म्हणजे जागतिक समीकरणे झपाट्याने बदलत असताना पुतीन यांचा भारत दौरा झाला. एका बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका जगाच्या शक्तिसंतुलनात नव्या अक्षांकडे झुकत आहे, तर दुसरीकडे चीनचा विस्तारवाद सर्वकाही गिळंकृत करण्याच्या घाईत आहे. पश्चिमेकडे युरोप, पूर्वेकडे आशिया, मध्यपूर्व आशियात उफाळत असलेले संघर्ष आणि दक्षिण आशियात होत असलेल्या उलथापालथीच्या छायेत झालेली पुतीन यांची भारत भेट शिष्टाचाराचा भाग असली तरी, जागतिक परिस्थितीला वळण देणाऱ्या प्रक्रियेची ती एक मोठी खूण ठरू शकते.
भारतासाठी हा दौरा प्रतिकात्मकतेपेक्षा व्यावहारिक पातळीवर अधिक महत्त्वाचा होता. अमेरिका आणि भारतातील संबंध गेल्या काही वर्षांत सर्वोच्च उंचीवर पोहोचले होते; परंतु अलीकडे ते शीतयुद्धकालीन पातळीवर पोहोचतात की काय, अशी आशंका व्यक्त होऊ लागली आहे. ट्रम्प यांच्या कठोर, पारंपरिक, उजवीकडे झुकलेल्या आणि अस्थिर धोरणांमुळे भारताला आता स्पष्ट संदेश मिळू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पुतीन यांचा दौरा पर्यायी सत्तासंतुलनाची दारे नव्याने उघडणारा ठरू शकतो.
भारताच्या दृष्टीने गेल्या दोन-तीन वर्षांत घडलेला कदाचित सर्वात धक्कादायक बदल म्हणजे पाकिस्तानचे पुन्हा अमेरिकेच्या कवेत जाणे! एकेकाळचे अमेरिकेचे हे लाडके बाळ एकविसाव्या शतकात नावडते झाले होते; परंतु अलीकडे हे बाळ पुन्हा अमेरिकेच्या मांडीवर खेळू लागले आहे. त्याबरोबरच एक वर्तुळ पूर्ण होताना दिसत आहे. शीतयुद्धाच्या काळात पाकिस्तानला अमेरिकेच्या गोटातील, तर भारताला तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या गोटातील समजले जात असे. कालांतराने पाकिस्तान अमेरिकेपासून दुरावत गेला आणि भारत निकट होत गेला; पण आता ट्रम्प यांची धोरणे भारताला पुन्हा एकदा रशियाच्या जवळ जाण्यास भाग पाडत आहेत.
पुतीन यांच्या दौऱ्याला त्यामुळेच अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. चीनची अफगाणिस्तान आणि मध्यपूर्वेतील वाढती सक्रियता अमेरिकेला पाकिस्तानला हाताशी धरण्यास भाग पडत आहे. भारताशी उभा दावा मांडलेल्या पाकिस्तानवर एकाच वेळी अमेरिका आणि चीनसारख्या महाशक्तींचा वरदहस्त असणे, ही भारतासाठी अत्यंत चिंतेची बाब ठरते. या पार्श्वभूमीवर भारतालाही जागतिक पटलावर रशियासारख्या बड्या देशाची साथ आवश्यक ठरते. त्यामुळेच अमेरिका आणि युरोपियन संघाची कितीही इच्छा असली तरी, भारत रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनची बाजू घेऊ शकत नाही.
केवळ युक्रेनच नव्हे, तर चीनच्या संदर्भातही भारताने आपली री ओढावी, चीनसोबतच्या त्यांच्या संघर्षात भारताने आघाडीवर असावे, अशी अमेरिका आणि युरोपियन संघाची इच्छा आहे. पुतीन यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, तीन प्रमुख युरोपियन देशांच्या भारतातील राजदूतांनी संयुक्तरीत्या लेख लिहून, भारताच्या युक्रेनसंदर्भातील भूमिकेवर आगपाखड केली; पण भारताने त्यांच्यासमोर मान झुकवायला नकार दिला आहे.
पुतीन भारतात असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेन युद्धासंदर्भात व्यक्त केलेले मत सुस्पष्ट आहे. पुतीन यांच्या दौऱ्यात भारत व रशियादरम्यान काही महत्वपूर्ण संरक्षण, तंत्रज्ञानविषयक करार झाले. तेदेखील अमेरिका आणि युरोपला खटकते. भारताने आपल्याकडून शस्त्रास्त्रे घ्यावी, अशी त्यांची इच्छा आहे; पण रशियाने भारतात जी विश्वासार्हता निर्माण केली आहे, ती आपल्या दुटप्पी, स्वार्थी आणि बदलत्या धोरणांमुळे आपण निर्माण करू शकलो नाही, याकडे ते डोळेझाक करतात.
भारताने आपल्या ताटाखालील मांजर व्हावे ही अमेरिका-युरोपियन संघाची इच्छा आहे. रशियाने शीतयुद्धाच्या काळातही तशी अपेक्षा केली नाही. मध्यंतरी भारताने अमेरिका आणि युरोपियन देशांसोबत संरक्षणासह अनेक क्षेत्रांत संबंध दृढ केले; पण रशियाने त्यावर कधीच आक्षेप घेतला नाही! चांगल्या-वाईट काळात रशियाने भारताला नेहमीच साथ दिली आहे.
भारताने अलीकडे आत्मनिर्भरतेचा वसा घेतला असला तरी, ऊर्जा, संरक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये अजूनही बरीच मजल मारायची आहे आणि या सर्वच क्षेत्रांत रशियाने भारताला नेहमीच सहकार्य केले आहे. पाकिस्तान-अमेरिका समीकरणाचा पुनर्जन्म, चीन-पाकिस्तान अक्षाचा विस्तार, अमेरिका-युरोपचा वाढता दबाव, ही आव्हाने पुढ्यात असताना, पुतीन यांच्या भेटीने भारताला एक मजबूत पर्याय, तर रशियाला जागतिक राजकारणात आधार मिळेल! कदाचित त्यातून नवे जागतिक शक्ती-संतुलनही उदयास येईल!