लोकसहभागाचा दिशादर्शक उपक्रम

By Admin | Updated: August 13, 2016 05:36 IST2016-08-13T05:36:05+5:302016-08-13T05:36:05+5:30

जेमतेम करवसुली - शासकीय अनुदानाचे तोकडे आर्थिक उत्पन्न आणि कर्ज परतफेड, कर्मचारी पगार व अग्रक्रमाच्या मूलभूत सुविधांचा ताळमेळ बसविण्यासाठी कसरत करणाऱ्या जळगाव महापालिकेने

Public involvement guideline | लोकसहभागाचा दिशादर्शक उपक्रम

लोकसहभागाचा दिशादर्शक उपक्रम

- मिलिंद कुलकर्णी

जेमतेम करवसुली - शासकीय अनुदानाचे तोकडे आर्थिक उत्पन्न आणि कर्ज परतफेड, कर्मचारी पगार व अग्रक्रमाच्या मूलभूत सुविधांचा ताळमेळ बसविण्यासाठी कसरत करणाऱ्या जळगाव महापालिकेने लोकसहभागातून मेहरूण तलावाचे रूप पालटवले आहे. पण एखादे चांगले काम सुरु झाले की, त्याला विरोध, टीका हे प्रकार याबाबतीतहीे आले. तलाव परिसरातील श्रीमंतांच्या रस्त्यासाठी हा उपक्रम राबविला, चौपाटी बनविताना तलावाची व्याप्ती कमी झाली अशा तक्रारी आल्या

स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित आहेत. करवसुली आणि शासकीय योजनांद्वारे मिळणाऱ्या निधीवर विकास कामे करण्याची मदार असते. पुन्हा या दोन्ही स्त्रोतांकडून १०० टक्के निधी मिळेलच याची शाश्वती नसते.
करचोरी, थकबाकीचे प्रमाण मोठे आहे. दर चार वर्षांनी कराचे फेरमूल्यांकन अपेक्षित असताना त्याकडे काणाडोळा केला जातो. प्रशासनाची उदासीनता आणि भ्रष्टाचार यामुळे १०० टक्के करवसुली हे स्वप्न ठरते. शासकीय योजनांचा निधी आणण्यासाठी प्रशासन व पदाधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता, पाठपुरावा या बाबी आवश्यक ठरतात. खासदार-आमदार एका पक्षाचे आणि संस्था पदाधिकारी दुसऱ्या पक्षाचे असल्यास राजकारण शिरते. विकास कामांमध्ये आडकाठी येते. त्यावर मात करीत लोक सहभागातून कामे करण्यावर अलीकडे जोर दिला जात आहे.
औद्योगिक प्रतिष्ठानांसाठी सामाजिक उत्तरदायित्वासाठी ठरावीक निधी खर्च करण्याचे बंधन येण्यापूर्वी जळगाव शहरात लोक सहभागातून विकास कामे सुरू झाली होती. चौक सुशोभिकरणापासून या उपक्रमाला सुरुवात झाली. अनेक औद्योगिक व व्यापारी प्रतिष्ठानांनी चौक देखणे बनविले. खान्देशातील काव्यपरंपरेचा गौरव करणारा ‘काव्यरत्नावली’ चौक तर कल्पकतेचे अनोखे उदाहरण आहे. भवरलाल जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या चौकात साने गुरुजी, बालकवी, बहिणाबाई, कुसुमाग्रज, दु.आ. तिवारी यांच्या प्रसिद्ध कवितांच्या शिळा उभारल्या आहेत. रंगीत कारंजे, हिरवळ आणि हायमास्ट दिवे यामुळे हा चौक जळगावकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि अबालवृद्धांना दोन घटका करमणूक, गप्पांचा कट्टा बनला आहे. चौकात गाण्याची मैफील, पथनाट्य, पुस्तक प्रकाशन, राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम जल्लोषात होतात.
महापौर नितीन लढ्ढा यांनी काव्यरत्नावली चौकाप्रमाणे जळगावचा मानबिंदू असलेल्या मेहरूण तलावाच्या खोलीकरण आणि विस्तारीकरणाचा उपक्रम उन्हाळ्यात हाती घेतला. लोक सहभागाचे आवाहन आणि पारदर्शक कामाची ग्वाही देताच औद्योगिक व व्यापारी प्रतिष्ठाने, वित्तीय संस्था, व्यावसायिक संस्था, दानशूर नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. लोक सहभागातून चांगले काम होत असल्याचे पाहून जलसंपदामंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी मदतीचा हात पुढे केला. कामाचा वेग वाढला आणि पावसाळ्यापूर्वी तलावाचे खोलीकरण व विस्तारीकरण पूर्ण झाले. तलावाच्या गळतीचे मूळ शोधून त्याची दुरुस्ती करण्यात आली. आता सुशोभीकरणाच्या कामाचे नियोजन सुरू झाले आहे. जिल्हा नियोजन मंडळातून निधी मंजूर झाला. अतिक्रमण, सांडपाणी, म्हशी, वाहने आणि धुणी धुण्याचा प्रकार या समस्यांवर मात करायची आहे. वृक्षराजी बऱ्यापैकी आहे. तिचे संवर्धन आणि नवीन लागवड याकडे महापालिका व स्वयंसेवी संस्थांचे लक्ष आहे.
एखादे चांगले काम सुरु झाले की, त्याला विरोध, टीका हे प्रकार ओघाने आले. याबाबतीतही ते आलेच. तलाव परिसरातील श्रीमंतांच्या रस्त्यासाठी हा उपक्रम राबविला, चौपाटी बनविताना तलावाची व्याप्ती कमी झाली अशा तक्रारी आल्या.
लोक सहभागातून चांगली कामे होऊ लागल्यास शासनदेखील मदतीचा हात पुढे करते, हे मेहरूण तलावाच्या कामातून दिसून आले. सगळीकडे अंधार दाटला असल्याचा कोलाहल सुरू असताना हा प्रयत्न आशेचा दिवा ठरत आहे.

 

Web Title: Public involvement guideline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.