हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत,नवी दिल्ली
प्रियांका गांधी वड्रा या आजही काँग्रेसच्या ठरावीक मांडणीतच स्वतःला पाहताना दिसतात. स्टेडियममध्ये जनसमुदाय त्यांच्या नावाचा पुकारा करत आहे; पण पक्षाचे प्रशिक्षक मात्र मुख्य सामन्यांमध्ये त्यांना उतरवायला तयार नाहीत. प्रियांका यांना मोठी राष्ट्रीय भूमिका देण्यात यावी, अशी वाढती मागणी काँग्रेसमध्ये होत असतानाही त्यांना मिळालेली शेवटची कामगिरी छोटीशीच आहे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी छाननी समितीचे प्रमुखपद त्यांना देण्यात आले आहे. परिणामी त्या आता प्रचारमोहिमेचे नेतृत्व करणार नाहीत, प्रदेश शाखांना दिशा देणार नाहीत, तर इतरांनी तयार केलेल्या उमेदवारांच्या यादीवरून नजर फिरवतील.
अलीकडेच त्यांनी संसदेमध्ये आपली चमक दाखवून दिली. आताही जी जबाबदारी त्यांना मिळाली आहे ती बढती नसून अजूनही त्यांना प्रशिक्षणाच्या मांडवाखालून नेण्यात येत आहे असेच दिसते. आसामचे कप्तानपद त्यांच्याकडे नाही. प्रशिक्षण सत्रातली एक मर्यादित राजकीय भूमिका तेवढी आहे. नेहरू-गांधी परिवारातील व्यक्तीला तांत्रिक समितीच्या कारभारात टाकू नये असे पक्षातील अनेक जणांना वाटते. त्यांनी वैचारिक पातळीवर व्यापक अशी दिशा द्यावी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवावा आणि देशाला आवाहन करावे. मात्र, दैवदुर्विलास असा की प्रियांका यांना याआधी उत्तर प्रदेशची सूत्रे दिली होती, तेथे निवडणुकीच्या निकालामुळे अपयशाचा शिक्का बसला. राज्य त्यांच्याकडे देण्याच्या आधीच हे माहीत होते. आता आसाममध्येही तोच धोका दिसतो आहे. त्यामुळे प्रश्न असा उरतो की प्रियांका यांना नेता म्हणून पुढे केले जात आहे की, त्यांना मागच्या बाकावर बसवण्याचा प्रयत्न चालला आहे?
थंड डोक्याचे नवे सेनापतीभाजपचे नवनियुक्त अध्यक्ष नितीन नबीन सध्या पक्षाला जे हवे आहे तेच करत असल्याचा लौकिक झपाट्याने प्राप्त करत आहेत. टंगळमंगळ अजिबात नाही, ठाम आणि विषयावर पूर्णपणे लक्ष असा त्यांचा खाक्या आहे. भाजप स्वतःला जगातील सर्वांत मोठी राजकीय संघटना मानतो. तिचा हा ४५ वर्षांचा सर्वांत तरुण अध्यक्ष. प्रारंभी काहींनी खासगीत नबीन यांची संभावना कळसूत्री बाहुले अशी केली; परंतु नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दांत सांगून टाकले, ‘पक्षाच्या व्यवहारात नितीन नबीन हेच माझे वरिष्ठ आहेत.’ त्यांना बाहुले म्हणणारे नेतेच मग त्यांची भेट मिळण्यासाठी रांगेत उभे राहिले. नबीन हे कामाशी मतलब ठेवतात. पक्षप्रवक्त्यांच्या बैठकीत एका सदस्याने स्वतःची भलामण करणारे स्वगत सुरू केले. आपण मोदींवर पुस्तक लिहीत आहोत असे तो सांगत होता. नबीन यांनी आधी शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले; पण पुढे ‘जरा मुद्द्याचे बोला’ असे सांगायलाही ते कचरले नाहीत. नबीन सध्या विविध राज्यांच्या दौऱ्यावर जात आहेत; पण तेथेही प्रदर्शनबाजी नाही तर धोरणाच्या गोष्टी होतात. ते केरळमध्ये गेले तेव्हा त्यांनी तिथल्या नेत्यांना भाजपने जेथे ३० टक्क्यांपेक्षा जास्त मते घेतली आहेत अशा ३० मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करून पाया भक्कम करायला सांगितले. ते शांत राहतात, ठामपणे मुद्याचे बोलतात. आपण पद उबवायला आलेलो नाही, तर पक्षाच्या पुढील बांधणीचे सूत्रधार आहोत, हे ते सिद्ध करू पाहत आहेत.
ट्रम्प यांना हवे ते मिळाले!डोनाल्ड ट्रम्प यांना श्रेय घेणे आणि टाळ्या मागणे या दोन गोष्टींचा संकोच कधीच वाटला नाही. विनम्र धन्यवादाचे जादुई शब्द भारताकडून ऐकायची त्यांना घाईच झालेली होती. गेल्या मे महिन्यात भारत-पाकिस्तानमधील युद्ध आपणच थांबवले असे त्यांनी जाहीर केले तेव्हा तर त्यांना खडी मानवंदनाच अपेक्षित होती. पाकिस्तानने ती दिली; तोंडभरून आभार मानले, इतकेच नव्हे; एखाद्या खेळण्यासारखा नोबेल पुरस्कारही त्यांच्यापुढे नाचवला. भारताने यातले काहीच केले नाही. कूटनीतिक मौन तेवढे पाळले. विनम्र सहमती, आभाराचे पत्र, हार-तुरे काहीच नाही.
भारताचा हा मौनराग ट्रम्प यांना भयंकर अस्वस्थ करत होता. ‘आपण युद्ध थांबवले’ असे ते संधी मिळेल तेव्हा जगाला सांगत सुटले. कधी त्यांनी युद्धबंदीचे दावे केले तर कधी आयात शुल्काच्या धमक्या दिल्या. पृथ्वीतलावरील संस्मरणीय शांतिदूत म्हणून आपली आठवण काढली जावी अशी आस या महाशयांना लागलेली आहे. अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २ फेब्रुवारीची पोस्ट आली. ट्रम्प यांच्या प्रतिमेला साजेशा शब्दात मोदी यांनी ट्वीट केले- ‘ट्रम्प यांचे नेतृत्व जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. शांततेसाठी त्यांनी चालवलेल्या प्रयत्नांना भारताचा संपूर्ण पाठिंबा आहे.’ ट्रम्प यांना ज्याची आस लागली होती ती गोष्ट मोदी यांनी झटक्यात देऊन टाकली. मात्र, मोदी यांनी वेळ स्वतः ठरवली. आता ट्रम्प यांनी ही स्तुती ऐकली आहे. कदाचित आता ते प्रशंसेसाठी गळ टाकणे थांबवतील. harish.gupta@lokmat.com
Web Summary : Despite demands, Priyanka Gandhi gets a minor role, raising questions about her position in Congress. BJP's new chief, Nabin, gains respect for his focused approach. Trump finally gets praise from Modi for his global peace efforts.
Web Summary : मांगों के बावजूद, प्रियंका गांधी को एक छोटी भूमिका मिलती है, जिससे कांग्रेस में उनकी स्थिति पर सवाल उठते हैं। भाजपा के नए प्रमुख नबीन को उनके केंद्रित दृष्टिकोण के लिए सम्मान मिलता है। ट्रम्प को अंततः मोदी से उनके वैश्विक शांति प्रयासों के लिए प्रशंसा मिलती है।