पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, साधे राहा, बडेजाव टाळा! मंत्र्यांना ते जमेल?

By यदू जोशी | Updated: January 17, 2025 08:07 IST2025-01-17T08:06:22+5:302025-01-17T08:07:49+5:30

माजी पंतप्रधान वाजपेयी यांनी भाजप खासदारांना एकदा सांगितले होते, निवडणूक जिंकल्यानंतर नवी अंगठी, सोन्याची चेन घेऊ नका. मोदीही आता तेच सांगत आहेत.

Prime Minister Narendra Modi said, "Keep it simple, avoid big answers!" Will the ministers be able to do that? | पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, साधे राहा, बडेजाव टाळा! मंत्र्यांना ते जमेल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, साधे राहा, बडेजाव टाळा! मंत्र्यांना ते जमेल?

- यदु जोशी
(सहयोगी संपादक, लोकमत)

मध्यंतरी भाजपचे एक जुनेजाणते नेते सांगत होते की, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी दरवर्षी भाजपच्या खासदारांची एक चिंतन बैठक दिल्लीलगत असलेल्या हरयाणातील एका फार्महाउसवर घेत असत. वाजपेयींनी एका वर्षी सांगितले की, निवडणुकीच्या आधी तुम्ही एक अंगठी घालत असाल तर निवडणुकीत जिंकल्यानंतर दुसरी अंगठी घेऊ नका. निवडणुकीआधी एकही अंगठी घालत नसाल तर जिंकल्यानंतर नवीन अंगठी विकत घेऊ नका. सोन्याच्या चेनबाबतही तेच करा. 

पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी महाराष्ट्रातील मंत्री, आमदारांच्या बैठकीत साधे राहा, बडेजाव टाळा, असा सल्ला दिला. अटलजींनी मार्गदर्शन केले होते, त्याला आता पंचवीसएक वर्षे झाली असतील. एवढ्या वर्षांत आमदार, खासदार किती बदलले? किती बिघडले? दोन-दोन कोटी रुपयांच्या गाड्या अनेकांकडे आहेत. सामाजिक न्याय खाते हे शेवटच्या माणसासाठीचे, पण या खात्याचे मंत्री अत्यंत महागड्या गाडीतून मंत्रालयात येतात तेव्हा अस्वस्थता येते. अस्वस्थ होण्यापलीकडे आपण करूही काय शकतो? 

सत्ता नेमकी कोणाची? 
मंत्री, अधिकारी बदलतात, पण सत्ता कोणाचीही असली तरी पाच-सात बडे कंत्राटदार वर्षानुवर्षे तेच आहेत. मंत्रालय तेच चालवतात. त्यातलेच एक आता जेलमधील दीर्घ मुक्कामानंतर बाहेर आले आहेत, ९५ मधील युती सरकारमध्ये त्यांचा उदय झाला होता, आता महायुती सरकारमध्ये त्यांचा प्रभाव वाढतो का ते पहायचे. स्वयंसेवक ते आमदार आणि आता कामगारमंत्री झालेले आकाश फुंडकर साधेबाधे आहेत, पण पडद्याआडचे कामगार मंत्री वेगळेच आहेत, आकाशभाऊ! त्यांची अजून भेट झाली की नाही तुमची? अशोक उईके आदिवासी विकासमंत्री झाले, एकदम साधा माणूस आहे हा. खात्यातील गब्बर ठेकेदार अन् नाशिकपासूनचे अधिकारी त्यांना किती काम करू देतील, हा प्रश्नच आहे. नवे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आठएक दिवसांपूर्वी  पुण्यात एक बैठक घेतली. तेव्हा भूमिअभिलेखच्या दोन मोठ्या अधिकाऱ्यांविषयी त्यांच्याकडे गंभीर तक्रारी आल्या, या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचे घबाड जमविल्याची प्रकरणे समोर आली तेव्हा बावनकुळे यांनी बैठकीतूनच पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन लावून या दोन अधिकाऱ्यांची अँटी करप्शनमार्फत चौकशी लावा, असे सांगितले. पुढे काय झाले ते लवकरच कळेल. शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले आहेत, ते छत्रपतींच्या वंशज घराण्यातले आहेत. एकीकडे छत्रपतींच्या सुशासनाची बूज राखून काम करण्याचे आव्हान आणि दुसरीकडे अनेकांचे अनेक इंटरेस्ट यातून स्वत:ची प्रतिमा टिकवताना त्यांची कसरत होईल. प्रताप सरनाईक आपल्या व्यवसायासारखे एसटीही चकचकीत आणि कॉर्पोरेट करतील का? शिवशाही बसने प्रवास करायचा तर जीव मुठीत घेऊनच बसावे लागते; प्रतापजी! एकदा तरी बसा या बसमध्ये!! 

फडणवीसांसमोर आव्हान
देणारे सरकार ही प्रतिमा जपण्यासाठी कायदे, नियमांना बाजूला सारून लोकलाभ पोहोचविण्याचे काम गतकाळात बिनबोभाट झाले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शक आणि प्रामाणिक सरकारची हमी दिली आहे. ते इतके सोपे नाही.  आपल्याच मित्रपक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी लावून दिलेल्या सवयी त्यांना बदलायच्या आहेत,  आजचे विरोधक आधीची अडीच वर्षे सत्तेत असते तर आधीचे सगळे बदलणे सोपे गेले असते. आता महायुतीचे नेते, मंत्री, आमदारांची काही प्रसंगात नाराजी ओढावून घ्यावी लागेल. आपल्यांना दुखावणे  अधिक कठीण असते.  मागील सरकारमध्ये काही फायलींना मान्यता देताना उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील अस्वस्थ असायचे; पण त्यांचाही उपाय नसायचा. आता फडणवीसांच्या मिशन साफसफाईसाठी वित्तमंत्री म्हणून ते योगदान देतील. राज्य सरकारच्या चालू योजनांचे मूल्यमापन करणे आणि राज्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी समिती नेमण्यात आली.  आर्थिक सुधारणांमध्ये आर्थिक शिस्तदेखील येईलच, असा विश्वास बाळगायला हरकत नाही. 

रवींद्र चव्हाण कोण आहेत, कसे आहेत? 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू रवींद्र चव्हाण यांच्या रुपाने जीन्स पँट, शर्ट, चप्पल घालणारा साधा कार्यकर्ता भाजपला प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून मिळाला आहे.  चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभेला हरलेल्या पक्षाला विधानसभेत सत्तेत बसविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. चव्हाण यांना आता जिंकलेली फौज सांभाळायची आहे, ते हरलेली फौज सांभाळण्यापेक्षाही कठीण असते. दोन महिन्यांनी ते पूर्णवेळ अध्यक्ष होतील तेव्हा नवीन कार्यकारिणी आलेली असेल. कालपर्यंत बावनकुळेंच्या अवतीभोवती असलेले लोक आता भविष्याचा विचार करून चव्हाणांभोवती फिरताना दिसत आहेत. चव्हाण यांना तिसरा डोळा आहे. पक्षात कोण कसे आहे, कोण फक्त चमकोगिरी करतात याची फेअर यादी तयार आहे त्यांच्याकडे.

- yadu.joshi@lokmat.com

Web Title: Prime Minister Narendra Modi said, "Keep it simple, avoid big answers!" Will the ministers be able to do that?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.