तोट्यात चालणारा शेतीसारखा व्यवसाय करण्यास कोणालाही आनंद नाही. पण पर्याय कोणते आहेत? सरकारी नोकरी किंवा उच्चशिक्षित होऊन उद्योगक्षेत्रातील नोकऱ्या हाच उपाय शेतकऱ्यांना वाटतो. आपण पुरेसे पर्यायच उभे केलेले नाहीत, त्यामुळे त्यांचे काहीच चुकत नाही.भारतासारख्या कृषिप्रधान देशाचे सलग दहा वर्षे कृषिमंत्री राहिलेले शरद पवार यांनी पुन्हा एकदा शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी करावा, असे प्रतिपादन केले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात शेती उत्तम मानणाºया ग्रामीण भागातील लोकसंख्येचे प्रमाण ८२.६९ टक्के होते. औद्योगिक आणि व्यापार तसेच सेवाक्षेत्राचा विकास होत गेला. त्याचा परिणाम होत उत्तम मानल्या गेलेल्या शेतीवर आता ५८.२० टक्केच लोकच अवलंबून आहेत. आताच्या वेगानेच जर भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास होत राहिला, तर शेतीवर अवलंबून राहणाºयांची संख्या आणखी तीस वर्षांनी (२०५० पर्यंत) २८ टक्क्यांपर्यंत खाली येईल, असा एका पाहणीचा निष्कर्ष सांगतो. भारतात शेतीवर अवलंबून असलेली ५८ टक्के जनता देशाच्या उत्पन्नात १८ टक्क्यांची भरच घालते. हे एकूण उत्पन्न १८.५५ लाख कोटी आहे. त्याद्वारे अन्नधान्य उत्पादनात देशाचा जगात सहावा क्रमांक लागतो. फळ उत्पादनात दुसरा क्रमांक आहे. आपल्या देशाच्या शेतीव्यतिरिक्त उत्पादनक्षेत्राची तसेच सेवाक्षेत्राची अपेक्षित वाढ होत नाही. सेंटर फॉर स्टडीज आॅफ डेव्हलपिंग सोसायटीज या संस्थेच्या एका पाहणीनुसार, सध्या शेतीवर काम करणाºया ६२ टक्के लोकांना हा व्यवसाय सोडावा असेच वाटते. केवळ २६ टक्के शेतकºयांना शेती हा व्यवसाय आवडतो आणि फायद्याचा आहे, असे वाटते. केवळ दहा टक्के शेतकºयांना हा व्यवसाय जीवनात आनंद देणारा वाटतो. आपल्या देशातील असंख्य तज्ज्ञमंडळी ही लोकसंख्या नियंत्रणात आल्याशिवाय आर्थिक प्रगती होणारच नाही, या मुद्द्यावर येऊन ठेपतात आणि पर्यायी विचारमंथनच करायचे सोडून देतात. शरद पवार यांचेही थोडेफार असेच झाले आहे, असे वाटते. गेली अनेक वर्षे ते वारंवार शेती सोडा, पर्यायी व्यवसाय करा, असे सांगून काही उदाहरणे देतात. वास्तविक तोट्यात चालणारा शेतीसारखा व्यवसाय करण्यात कोणालाही आनंद नाही.
पवार सांगतात शेती सोडा; पण पर्याय कोणते आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 04:33 IST