‘ब्रेकिंग न्यूज’बरोबरचे युद्ध जबाबदारीने, गांभीर्याने लढूया!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 07:08 IST2025-05-10T07:07:48+5:302025-05-10T07:08:06+5:30
Operation Sindoor: प्रत्यक्ष युद्ध सैन्यदले लढतातच; पण ‘माहितीच्या युद्धा’त नागरिकही सैनिकच असतो. हे युद्ध आपणही पुरेशा गांभीर्याने लढणे, हीच या क्षणी सर्वोच्च ‘देशभक्ती’ होय!

‘ब्रेकिंग न्यूज’बरोबरचे युद्ध जबाबदारीने, गांभीर्याने लढूया!
- विश्राम ढोले, माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृती या विषयांचे अभ्यासक
युद्धात पहिला बळी जातो तो खऱ्या माहितीचा, असे म्हणतात. जगभरातील सर्व युद्धांच्या इतिहासामध्ये ते कमी-अधिक प्रमाणात दिसते. खरी माहिती मिळणे कठीण होत जाणे, खोट्या माहितीचा महापूर येणे अशा अनेक प्रकारे युद्धकाळात खऱ्या माहितीचा आणि सत्याचा बळी जात असतो. महाभारत युद्धात द्रोणाचार्यांचा अडथळा दूर करण्यासाठी धर्मराजाने घेतलेली ‘नरो वा कुंजरो वा’ ही संदिग्ध भूमिका असो; वा दुसऱ्या महायुद्धामध्ये नाझींनी आणि मित्रराष्ट्रांनी केलेला व्यापक प्रोपगंडा असो; युद्धामध्ये माहितीचाही शस्त्र म्हणून भलाबुरा वापर कसा करता येतो, हेच लक्षात येते.
समकालीन युद्धांच्या बाबतीत तर हे अधिकच ठळकपणे दिसून येते. कारण मुळातच ही युद्धे फक्त युद्धभूमीवर खेळली जात नाहीत. ती जनमत निर्मितीच्या युद्धभूमीवरही खेळली जातात. युद्धाची पार्श्वभूमी, युद्ध सुरू असतानाचे समर्थन आणि युद्धानंतर प्रस्थापित करायचे नॅरेटिव्ह अशा सगळ्याच पातळ्यांवर राज्यकर्त्यांना जनमतचा आधार घ्यावाच लागतो. त्यासाठी युद्धाच्या कथा जशा सांगाव्या लागतात तशीच युद्धासंबंधीची खरीखोटी माहितीही द्यावी लागते. माध्यमांनी भरलेल्या आणि भारलेल्या सध्याच्या काळात हे काम आव्हानात्मक असते. साठच्या दशकात अमेरिका व्हिएतनाम युद्ध फक्त व्हिएतनामच्या युद्धभूमीतच हरली होती, असे नाही. अमेरिकी माध्यमांमध्ये तयार होत गेलेल्या माहिती आणि नॅरेटिव्हच्या लढाईतही त्यांना बरेच नुकसान सोसावे लागले होते. त्याच्यापासून धडा घेऊन १९९० च्या पहिल्या आखाती युद्धात अमेरिकेने वृत्तमाध्यमांतील एका गटालाच आपला युद्ध सहकारी करत ‘एम्बेडेड जर्नालिझम’ किंवा ‘आश्रित पत्रकारिता’ हा एक नवाच युद्धपत्रकारितेचा प्रकार जन्माला घातला होता. माहितीचा भलाबुरा वापर हा युद्ध किंवा कोणत्याही सशस्त्र संघर्षातील एक कळीचा मुद्दा असतो. ताज्या भारत-पाकिस्तान संघर्षातही माहितीचे युद्ध लढणे किती जिकिरीचे आणि आव्हानात्मक असते याचा प्रत्यय येतो आहे.
पाकिस्तान तसेही विश्वासार्ह राष्ट्र म्हणून जगाला कधी परिचित नव्हतेच. पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या अत्यंत नेमक्या, संयमित आणि भेदक कारवाईनंतर पाकिस्तानच्या खोटारडेपणाने नवे टोक गाठले. भारताच्या कारवाईचे यश, भारतीय लष्कराने पत्रकार परिषदेद्वारे साऱ्या जगाला पुराव्यासह दिलेली स्पष्ट, नेमकी माहिती यामुळे प्रत्यक्ष युद्धभूमीवरच्या हल्ल्यात आपला टिकाव लागला नाही, हे स्पष्ट होताच पाकिस्तानने माहितीच्या युद्धभूमीवर भारतावर हल्ले करायला सुरुवात केली. पाकिस्तानी माध्यमांनी आणि विशेषतः समाजमाध्यमांनी खोटी ते धादांत खोटी माहिती पसरविण्यास सुरुवात केली. ताज्या संघर्षांशी काहीही संबंध नसलेले व्हिडीओ, छायाचित्रे वापरून पोस्टस् तयार केल्या, विविध समाजमाध्यम हँडल्समधून त्या पसरविल्या आणि मंत्री, अधिकाऱ्यांना त्या वापरायला सांगून त्यावर काहीएक वैधतेचा शिक्का मारण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्यांचा प्रतिवाद करणे, त्यातील खोटारडेपणा दाखवून देणे आणि अशा पोस्ट्स, त्यांचे वापरकर्ते यांची भारतीय डिजिटल क्षेत्रातून हकालपट्टी करणे ही आणखी एक नवी मोहीम भारताला हाती घ्यावी लागली. आणि ती एवढ्याने थांबेल असे अजिबात नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असेल तोवर आणि कदाचित त्यानंतरही काही दिवस ही मोहीम सुरूच राहील.
युद्ध आणि माहिती यांचे नाते गुंतागुंतीचे असते. युद्धामधील वेगवेगळे निर्णय घेण्यासाठी अधिकाधिक विश्वासार्ह आणि सखोल माहिती मिळवावी लागते; पण युद्धासंबंधीची माहिती आपल्या लोकांपर्यंत किंवा शत्रू आणि शत्रू समर्थकांपर्यंत पोहोचविताना विश्वासार्हतेचा बळी मोठ्या प्रमाणात जातो. चोवीस तास चालणाऱ्या स्पर्धात्मक वृत्तवाहिन्या, कसलेही बंधन नसलेली समाजमाध्यमी हँडल्स आणि सुलभ झालेले डीपफेक तंत्रज्ञान यामुळे तर युद्धविषयक माहिती फार मोठ्या प्रमाणावर गढूळ होत आहे.
संघर्षकाळात जनतेला अधिकाधिक आणि अधिकाधिक विश्वासार्ह माहिती हवी असते; नेमके त्याचाच फायदा घेऊन अर्धवट, अर्धसत्य, खोट्या आणि धादांत खोट्या माहितीचे पीक पेरले जाते. या वाईट मार्गाने जनमत प्रभावित न होऊ देण्याची जबाबदारी जशी सरकारची आणि युद्ध यंत्रणांची; तशी ती सामान्य जनतेचीही आहे.
भारतीय सैन्यदलाची कार्यपद्धती अशा खोट्याला थारा देणारी नाही, हे इतिहासात दिसून आले आहे. सामरिक व्यूहरचनेसंदर्भात माहितीची लढाई भारतीय सैन्यदलेही खेळतात; पण आपल्याच लोकांची दिशाभूल करण्याचे प्रकार करत नाहीत. हे ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यानच्या आपल्या स्वच्छ मांडणीतून दिसूनही आले. त्यामुळे आपले टीव्ही अँकर कितीही उत्तेजित स्वरात वर्णन करीत असो; सैन्यदलांकडून, सरकारमधील जबाबदार व्यक्तींकडून त्यावर औपचारिक शिक्कामोर्तब होईपर्यंत त्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या बातम्यांबाबतही सावध भूमिका घेणेच योग्य असते. मुळात युद्धामध्ये अशी निर्णायक आणि ठोस माहिती मिळत जाणे हेच दुरापास्त असते. त्यामुळे ‘ब्रेकिंग न्यूज’च्या फार आहारी जाणे धोक्याचे असते. सुदैवाने माहितीची शहानिशा करण्यासाठी ‘फॅक्ट चेक’सारख्या अनेक सुविधा आज डिजिटल माध्यमांवर उपलब्ध आहेत. त्यांचा वापर केला पाहिजे.
प्रत्यक्षातील युद्ध आपली सैन्यदले लढतातच; पण माहितीच्या युद्धात आपण सगळे नागरिकही सैनिकच असतो. त्यामुळे माहितीचे हे युद्ध आपणही पुरेशा तयारीने आणि गांभीर्याने लढले पाहिजे. तसे लढणे हेही आपल्या देशभक्तीचेच द्योतक ठरेल.
vishramdhole@gmail.com