विशेष लेख: एक राज्य, एक पक्ष, एक मुख्यमंत्री : शाह यांचा मानस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 11:14 IST2025-11-12T11:11:29+5:302025-11-12T11:14:41+5:30
Amit Shah Newsशाह यांचे धोरण अतिशय साधे; परंतु साहसी आहे. भाजपला ते बिहारमधील प्रभावी शक्ती म्हणून उभे करू इच्छितात. तिथे त्यांना नवी संहिता लिहायची आहे.

विशेष लेख: एक राज्य, एक पक्ष, एक मुख्यमंत्री : शाह यांचा मानस
- हरीष गुप्ता
(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)
बिहारचे संपूर्ण भगवेकरण करण्याचे उद्दिष्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डोळ्यासमोर ठेवले असून, त्यासाठी ते अविश्रांत परिश्रम घेत आहेत. शाह यांच्यासाठी तेथील निवडणूक केवळ आणखी एका निवडणूक नसून त्यांनी उराशी बाळगलेले स्वप्न आहे. पंचायतीपासून संसदेपर्यंत दशकांमागून दशके भाजपला सत्तेवर ठेवण्याचे स्वप्न ते दीर्घकाळापासून पाहत आले. २०२५ साली लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांनी एकत्र येऊन भाजपच्या मार्गक्रमणात अडथळा उत्पन्न केला हे ते विसरलेले नाहीत. नितीशकुमार भाजपबरोबर नाममात्र स्वरूपात आघाडीत सामील असताना शाह यांनी भविष्यावर नजर ठेवली. बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री असला पाहिजे, असा संकल्प त्यांनी सोडला.
मतदान केंद्रनिहाय समित्या ते प्रचार मोहिमांपर्यंत अग्रभागी राहून शाह व्यक्तिगत पातळीवर प्रत्येक चाल बारकाईने खेळत आहेत. यावेळी भाजप आणि संयुक्त जनता दल प्रत्येकी १०१ जागा लढवत असला तरी या वरवर सारख्या दिसणाऱ्या आकड्यांच्या मागे एक राजकारण दडलेले आहे. २०२०च्या निवडणुकीत भाजपने ७४ जागा जिंकल्या. संयुक्त जनता दलाने ४३, तर राजद ७५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. २०२५ मध्ये शाह यांचे धोरण अतिशय साधे; परंतु साहसी आहे. भाजपला बिहारमधील प्रभावशाली शक्ती म्हणून ते उभे करू इच्छितात. पंजाब आणि हिमाचल वगळता संपूर्ण हिंदी पट्टा आधीच भाजपच्या अखत्यारित आलेला आहे. केवळ बिहार या कडीत जोडलेला नाही. भाजप जर सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला तर नवी संहिता लिहिली जाऊ शकेल. राज्यात सरकार स्थापनेची कला भाजपने साध्य करून घेतली आहे. तो केवळ आणखी एक विजय नसेल. पुन्हा होणाऱ्या उदयाच्या रूपात शाह यांनी उगवलेला तो सूड ठरेल.
निवडणुकीनंतर भाजपला नवा अध्यक्ष
बिहारमधील निवडणूक आटोपल्यावर भाजपमध्ये आणखी एक घडामोड होऊ घातली आहे. भाजपची धुरा नव्या नेत्याकडे सोपवली जाऊ शकते. अमित शाह यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. ‘बिहारची निवडणूक संपल्यावर भाजप नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडू शकतो. ते मी ठरवत नाही. पक्ष ठरवतो. अर्थात निवडणूक झाल्यावर ते करता येईल’, असे शाह म्हणाले आहेत. जयप्रकाश नड्डा यांना आणखी थोडा काळ अध्यक्षपदी ठेवण्याचे एक कारण विद्यार्थिदशेत ते बिहारमध्ये होते. अंतस्थ सूत्रांच्या सांगण्यानुसार पक्षाचा मुख्यमंत्री राज्यात आणण्याच्या दृष्टीने भाजप अहोरात्र काम करत आहे. त्याचा पक्षाच्या राष्ट्रीय धोरणावर नक्कीच प्रभाव पडेल. नड्डा हे भाजपचे आतापर्यंत सर्वाधिक काळ अध्यक्षपदावर राहिलेले नेते आहेत. जून २०१९ मध्ये कार्यकारी अध्यक्ष म्हणून ते नेमले गेले. जानेवारी २० मध्ये त्यांनी पूर्णवेळ कार्यभार स्वीकारला. आतापर्यंत त्यांना दोनदा मुदतवाढ मिळालेली आहे. नवा अध्यक्ष २०२९च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत आणि त्यानंतरही राहील म्हणून ही निवड अत्यंत काळजीपूर्वक केली जाईल, असे सांगितले जाते.
बिहार निवडणुकीनंतर पक्षसंघटना, राज्यपाल, राज्य आणि मंत्रिमंडळात आणखीही काही बदल होतील असे सांगितले जाते. हे बदल अद्याप झालेले नसल्यामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन घेण्यात विलंब होतो आहे असे एक कारण दिले जाते. जर काही बदल करावयाचे असतील तर ते हिवाळी अधिवेशनापूर्वीच करावे लागतील आणि १५ डिसेंबरपासून अशुभ काळ सुरू होतो, असे भाजपतील अंतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे. हे बदल दूरगामी परिणाम करणारे असतील. त्याचे कारण २०२६ आणि २७ मध्ये १२ राज्यांच्या निवडणुका होत आहेत.
पूर्वतयारीअभावी राहुल यांचा दावा फोल
मतदारयाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केला. हा आपला हायड्रोजन बॉम्ब असल्याचे त्यांचे म्हणणे होते. परंतु तो बॉम्ब आता त्यांच्यावरच उलटला आहे. राहुल यांनी नाट्यपूर्ण असे हे तीन दावे केले. एकाच पत्त्यावर ६६ मतदार नोंदवलेले होते, हा पहिला. १२ मतदारांच्या पुढे एका ब्राझिलियन मॉडेलचा फोटोग्राफ होता हा दुसरा आरोप आणि २०० मतदार ओळखपत्रावर एकाच महिलेचा फोटो होता हा तिसरा.
बहादूरगडमधील गोदारणात एका घरात ६६ मतदार होते हा त्यांचा पहिला आरोप. तपासाअंती असे आढळले की साधारणतः एक एकरावरील घरात राहणाऱ्या विशाल कुटुंबात अनेक पिढ्या एकत्र राहात आल्या. प्रत्येक मतदार खरा निघाला. कार्यकर्त्यांनी काळजीपूर्वक शोध न घेतल्याने काँग्रेस तोंडावर आपटली. सोनिपतजवळच्या राय या खेड्यात काही मतदारांच्या पुढे एका ब्राझिलियन मॉडेलचा फोटो होता. या दुसऱ्या आरोपातून असे निष्पन्न झाले की, ज्या महिलांच्या नावापुढे तो फोटो चिकटविण्यात आला होता त्या शीतल, मंजीत आणि दर्शना या जिवंत आहेत. दर्शनाने तिच्या छायाचित्रासह मतदार ओळखपत्रही दाखवले. तिसरा आरोप अंबालातील चरणजित येथे २०० मतदारांसमोर एकाच महिलेचा फोटो लावण्यात आलेला आहे. ही महिलासुद्धा सहज सापडली आणि तिने केवळ एकदाच मतदान केले, असेही लक्षात आले. तिचा फोटो अनेक महिलांच्या नावांपुढे गेली काही दशके लावला जातो आहे. त्याबद्दल निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारही केलेली आहे, असे स्थानिकांनी सांगितले. राहुल यांनी नंतर आपल्या विधानावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला; परंतु राहुल यांना अडचणीत आणण्याचा विडा त्यांच्याच सख्यासोबत्यांनी उचलला आहे, असे काँग्रेसची मंडळी सांगतात.
harish.gupta@lokmat.com