लेख: ट्रम्पचं लाडकं 'लेकरू' होताना पाक कंगाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 06:56 IST2025-11-21T06:55:20+5:302025-11-21T06:56:24+5:30
अमेरिकेनं आपल्या फायद्यासाठी पाकिस्तानला पंखाखाली घेतलं, चुचकारलं आणि पाकिस्तानचा वापर करून घेतला; पण, वेळ येताच पाकिस्तानला लाथाडलंही. जगभरात पाकिस्तानवर टीका होऊ लागल्यावर 'दहशतवादाचा प्रणेता' म्हणून त्याला झिडकारलंही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर पाकिस्तानला 'धोकेबाज' देश, असंही म्हटलं. पण, याच अमेरिकेच्या विशेषतः ट्रम्प यांच्या मांडीवर बसण्यासाठी पाकिस्ताननं अलीकडच्या काळात जंग जंग पछाडलं.

लेख: ट्रम्पचं लाडकं 'लेकरू' होताना पाक कंगाल!
अमेरिकेनं आपल्या फायद्यासाठी पाकिस्तानला पंखाखाली घेतलं, चुचकारलं आणि पाकिस्तानचा वापर करून घेतला; पण, वेळ येताच पाकिस्तानला लाथाडलंही. जगभरात पाकिस्तानवर टीका होऊ लागल्यावर 'दहशतवादाचा प्रणेता' म्हणून त्याला झिडकारलंही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर पाकिस्तानला 'धोकेबाज' देश, असंही म्हटलं. पण, याच अमेरिकेच्या विशेषतः ट्रम्प यांच्या मांडीवर बसण्यासाठी पाकिस्ताननं अलीकडच्या काळात जंग जंग पछाडलं. लहरी ट्रम्प यांची मर्जी सांभाळण्यासाठी पाकनं अक्षरशः जे जे म्हणून करता येईल ते ते केलं. 'भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध आपणच थांबवलं,' असं म्हणणाऱ्या ट्रम्प यांना त्याचं श्रेय देण्यास भारतानं नकार दिलेला असताना आणि ट्रम्प यांची नाराजी ओढवून घेतलेली असताना पाकिस्ताननं मात्र लगोलग ट्रम्प यांना हे श्रेय दिलं. नोबेल शांतता पुरस्कारासाठीही पाकिस्ताननं त्यांना नॉमिनेट केलं.
ट्रम्प यांचं 'लाडकं लेकरू' होण्यासाठी पाकिस्ताननं कोणतीच कसर सोडली नाही. त्यासाठी त्यांनी अक्षरशः कोट्यवधी रुपये खर्च केले. ट्रम्प आणि अमेरिकेवरचा त्यांचा हा खर्च अजूनही सुरूच आहे. ट्रम्प यांचं लांगूलचालन करण्यासाठी, त्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं यासाठी पाकिस्तानची तिजोरी खाली होते आहे, ते अक्षरशः कंगाल होत आहेत; पण, काहीही करून पाकिस्तानला ट्रम्प यांच्या मांडीवर आणि पाळण्यात बसायचंच आहे, त्यांच्याकडून जोजवूनही घ्यायचं आहे.याचाच परिणाम म्हणून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेचे पाकिस्तानशी संबंध अचानक सुधारले आहेत. कपाकिस्तानचे आर्मी चिफ आसिम मुनीर सगळ्या जगात बदनाम आहेत; पण, त्याच मुनीर यांना ट्रम्प आता आपला 'फेवरिट फिल्ड मार्शल' म्हणतात! एप्रिलमध्ये ट्रम्प यांनी पाकिस्तानवर २९ टक्के टॅरिफ लावलं होतं. चार महिन्यांनंतर ते घटवून १९ टक्के केलं, तर भारतावरचं टॅरिफ वाढवून ५० टक्क्यांपर्यंत नेलं होतं.
हा बदल घडवण्यासाठी पाकिस्ताननं आपला खजिना अक्षरशः रिता सोडला आहे. आधीच त्यांच्याकडं खडखडाट; पण, जगभरातून जे काही कर्ज त्यांनी उचललं आहे, त्यातला बराचसा पैसाही अमेरिकेच्या दारात जातोय. अमेरिकेची आपल्यावर मर्जी बसावी यासाठी पाकिस्ताननं अमेरिकेत 'पगारी लॉबिस्ट' नेमले आहेत. अमेरिकन वृत्तपत्र 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या मते, पाकिस्ताननं यंदाच एप्रिल आणि मे महिन्यात वॉशिंग्टनमधल्या अनेक लॉबिंग फर्म्सशी ५ मिलियन डॉलर्सचे (सुमारे ४२ कोटी रुपये) करार केलेत. याशिवाय ५०० मिलियन डॉलरचं मिनरल एक्स्ट्रॅक्शन डील केलं आणि अमेरिकन कृषी उत्पादनांसाठी आपला बाजारही खुला केला. ट्रम्प यांच्या जवळच्या लोकांना 'खूश' करण्यासाठीही त्यांनी आपली थैली मोकळी केली! ज्या फर्म्सशी पाकिस्ताननं करार केले, त्यातले काही लोक तर ट्रम्प यांचे अगदी 'खास' होते. उदाहरणार्थ त्यांचे माजी बिझनेस पार्टनर आणि बॉडीगार्ड कीथ शिलर ! ८ आणि २४ एप्रिलला पाकिस्ताननं 'सीडेन लॉ LLP' या लॉबिंग फर्मशी करार केला, ज्यात 'व्हाइट हाउस स्तरावर बैठकींची व्यवस्था केली जाईल,' असं वचन होतं. त्यानंतर मुनीर यांनी व्हाइट हाउसमध्ये ट्रम्प यांची खासगी भेट घेतली.