बीड जिल्ह्यातील मस्साजाेग गावच्या सरपंचांच्या खुनाचे प्रकरण साधे नाही. बीडसह मराठवाड्यातील राजकारणाला गेल्या तीन-चार दशकांत जे वळण लागत गेले, त्याचा हा परिपाक आहे. त्यात वाळलेले जळलेच तसे ओलेही जळून जाऊ लागले आहे. त्याची धग प्राजक्ता माळी या अभिनेत्रीला लागल्याने चर्चा उसळली. प्राजक्ता माळी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेने चर्चेचा विषय, रोख बदलला. प्रसिद्धीस आलेल्या (ती मनोरंजन क्षेत्रातील असेल, तर अधिकच) स्त्रीचा उत्कर्ष न सोसून तिचे नाव नको त्या तऱ्हेने नको तिथे जोडले जाण्याची पुरुषी समाजवृत्ती आपल्या हाडीमासी कशी भिनलेली आहे, हे यानिमित्ताने दिसले. त्यामागोमाग प्राजक्ता माळी यांच्या वाट्याला नवे ट्रोलिंग आले, तसेच त्यांच्या बाजूने खमकेपणाने भूमिका घेतलेली समंजस माणसेही समाजमाध्यमांवर व्यक्त झाली. मात्र, संतापाच्या कडेलोटाचे हे पाणी भलत्याच दिशेला वळल्याने (किंवा वळवले गेल्याने) मूळ घटनेतील क्रौर्य पुसटले नाही का? त्यासाठीच्या रंगमंचाचा बोलविता धनी कोण, असे प्रश्नही विचारले गेले.
हे सारेच राज्यातील एकूणच सामाजिक आणि नैतिक संस्कृतीचे अध:पतन किती वेगाने रसातळाला निघाले आहे, याचे निदर्शनच म्हणायला हवे. प्राजक्ताने मृत संतोष देशमुखविरुद्ध ब्र ही उच्चारला नसला तरी मूळ घटना त्यांच्या खुनाची. मंत्री धनंजय मुंडे यांचा सहकारी कार्यकर्ता वाल्मीक कराड याच्यावर सारा राेख! मस्साजाेगचे हे खून प्रकरण आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत मांडले. हल्ली सरळ-साधे कुणाला काही पचत नाही. मोबाइलवरच्या रिल्समध्ये गुंतलेल्या नजरा हव्या तिकडे सहज वळवता येत नाहीत. म्हणून मग मुंडे यांच्यावर राजकीय सूड उगविण्यासाठी या धस महाशयांनी मूळ घटनेच्या आजूबाजूने मोठे नाट्य रचले. वाल्मीक कराड याने मंत्र्यांच्या लाेकप्रियतेसाठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना आणून तरुणांची मने कशी रिझवली याची माहिती देताना काही अभिनेत्रींची नावे घेतली. त्यांचे इव्हेंट, त्यासाठीचा पैसा याबाबत संशय उपस्थित केले. प्राजक्ता माळी यांचेही नाव अशिष्ट संदर्भासह या यादीत होते.
हे असेच बॉम्ब फोडून चर्चेत राहण्याची कला साधलेल्या करुणा यांनी यापूर्वी तितकीच अशिष्ट विधाने केली होती. त्यावेळी गप्प राहिलेल्या प्राजक्ता माळी यांचा बांध यावेळी मात्र फुटला, कारण एरवी चर्चेत राहण्यासाठी या कलावंतांना वापरावे लागते ते सोशल मीडियावरच्या व्हिडीओजचे शस्त्र यावेळी दुर्दैवाने त्यांच्यावर उलटले. प्रसिद्धी पावलेल्या स्त्रीला नामोहरम करायचे तर तिचे नाव कुणा धनवान सत्ताधीशाशी जोडणे हा सोपा मार्ग; पण त्याविरोधात जाहीर भूमिका घेण्याचे धैर्य या तरुण अभिनेत्रीने दाखवले. तिने ज्या नेमक्या शब्दांत राज्यातल्या राजकारण-समाजकारणाला लागलेल्या अश्लाघ्य सवयींची चिरफाड केली आणि त्यासोबत क्लिक्स/पेज व्ह्यूजना चटावलेल्या छचोर नव-माध्यमांना आरसा दाखवला, ते निश्चितच अभिनंदनीय! तिच्या या संतापाची तातडीने दखल घेऊन खुद्द मुख्यमंत्री तिला भेटतात, ही ती ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्राचीच पुण्याई म्हणायची! एरवी अशा ट्रोलिंगमुळे आयुष्यातून उठलेल्या स्त्रिया सोडाच; पण अख्ख्या देशाला हादरा देणाऱ्या जळत्या मणिपूरमध्ये सर्वस्व गमावलेल्या अभागी स्त्रियांच्याही वाट्याला सर्वोच्च सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्षच कसे येते हे अजून तरी विस्मरणात गेलेले नाही. तेव्हा ‘निवडक न्याय’ का असेना, प्राजक्ता माळींना तो मिळाला, हे त्यांचे मोठेच नशीब म्हणायचे! तसे नशीब संतोष यांच्या वाट्याला येते का, हे कळेलच! पण कलावंतांनी काही जाहीर भूमिका घेतली की सत्तासने हलतात, हे यानिमित्ताने सिद्ध झाले आहेच; तर कलावंतांनी आपला शब्द प्रसंगोपात इतरही दुर्दैवी घटना/घटकांसाठी टाकावा अशी अपेक्षा चुकीची कशी?
आणखी एक. कलावंतांनीही बदलत्या राजकीय गणितांची माहिती ठेवलेली बरी! योग्य तो मोबदला घेऊन करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी हाेणे यात काही गैर नाही. पण जरा सावध असावे. राजकारण्यांच्या व्यासपीठावर जाताना त्यांच्या राजकारणाशी आपला संबंध नाही, असे म्हणून हात झटकण्याचा पर्याय दरवेळी वापरता येईलच असे नाही! मूळ प्रश्न सार्वजनिक जीवनातील सभ्यता उधळून लावण्याची अहमहमिका हा आहे. सगळी स्वच्छता करायला निघालेल्या मुख्यमंत्र्यांनी निदान स्व-पक्षातल्या नेत्यांच्या तोंडाला आवर घालावा. सुरेश धस यांनी (अखेर) दिलगिरी व्यक्त केल्याने प्राजक्ता माळींचा एपिसोड संपवावा आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळेल हे पाहावे. झाले हे फार झाले!