भारताशी बिनसलेले नाते सर्जिओ सावरू शकतील?

By विजय दर्डा | Updated: January 19, 2026 06:29 IST2026-01-19T06:28:09+5:302026-01-19T06:29:06+5:30

अमेरिकेचे भारतातील नवे राजदूत सर्जिओ गोर ट्रम्प यांच्या टीममधील सर्वात सामर्थ्यवान व्यक्ती आहेत. त्यांच्यासमोरचे आव्हान मोठे आणि नाजूक आहे.

New Chapter in Indo US Ties Can Sergio Gor Bridge the Growing Trust Deficit | भारताशी बिनसलेले नाते सर्जिओ सावरू शकतील?

भारताशी बिनसलेले नाते सर्जिओ सावरू शकतील?

डाॅ. विजय दर्डा 
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

‘दिल्ली दूर है’ ही म्हण भारतात खूपच प्रसिद्ध आहे. परंतु, अमेरिकेसाठीही दिल्ली दूर असेल काय? -हा प्रश्न अशासाठी की अमेरिकन राजदूताच्या नियुक्तीची घोषणा झाल्यावर त्यांना दिल्लीत पोहोचायला सात महिने लागले. आता ‘देर आये दुरुस्त आये’ असे म्हणण्याची संधी मिळेल, असे मानूया! 

यापूर्वीही अनेकदा भारतात राजदूत नेमण्यास विलंब झाल्याचे दाखले आहेत. परंतु, यावेळचे प्रकरण जास्त महत्त्वपूर्ण अशासाठी की पूर्वी नात्यात माधुर्य होते, आता त्या जागी कडवटपणा निर्माण झाला असून, अमेरिका अविश्वासाच्या संकटाशी झगडते आहे. जानेवारी २०२१ मध्ये केनेथ जस्टर यांना राजदूतपदावरून निरोप देण्यात आला तेव्हापासून एप्रिल २०२३ मध्ये एरिक गार्सेटी येईपर्यंत दोन वर्षांपेक्षा जास्त काळ भारतात अमेरिकेचे राजदूतच नव्हते. का नव्हते? 

हे प्रकरण जरा गुंतागुंतीचे आहे. जो बायडेन यांनी एरिक गार्सेटी यांचे नाव निश्चित केले. परंतु त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले. आरोपांची चौकशी करण्यात बराच वेळ गेला. नंतर गार्सेटी दिल्लीत पोहोचले; परंतु दरम्यानच्या काळात अन्य कोणाला राजदूत म्हणून दिल्लीला पाठवता येऊ शकत नव्हते का?  बायडेन भारताला कमी लेखू पाहत होते असाच अर्थ त्यावेळी काढला गेला. अखेरीस, एरिक गार्सेटी भारतात आले आणि त्यांचा कार्यकाळ २०२५ मध्ये पूर्ण झाला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या विश्वासातील  सर्जिओ गोर यांना भारतातील राजदूत म्हणून नियुक्त केले; ते सात महिन्यांनी भारतात दाखल झाले आहेत. सर्जिओ गोर यांना दक्षिण आणि मध्य आशियाई प्रदेशांतील विषयांबाबत विशेष दूत म्हणून जबाबदारी सोपवली गेली आहे. याचा अर्थ त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असेल. या जबाबदारीबरोबरच भारताशी न्यायसंगत असे नाते प्रस्थापित करण्याची बाजू ते कितपत मांडू शकतील? 

तूर्त भारतात पदग्रहण केल्यानंतर त्यांनी एक झलक दाखवली आहे. ‘भारत आणि अमेरिकेतील नातेसंबंध सुधारणे ही आपली सर्वात मोठी प्राथमिकता असेल’ असे ते म्हणाले.  त्यांच्याकडून विशेष अपेक्षा असण्याचे कारण त्यांचा थेट संबंध डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आहे. ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांपैकी सर्वात सामर्थ्यवान व्यक्ती म्हणून गोर यांच्याकडे पाहिले जाते. खुद्द ट्रम्प यांनीही समाजमाध्यमांवर गोर यांची भरपूर प्रशंसा केली आहे. ट्रम्प यांचे पुत्र ज्युनिअर ट्रम्प यांच्याशी गोर यांची मैत्री आहे. ट्रम्प यांना  भारताशी मधुर संबंध ठेवायला गोर राजी करतील, असे मानायला हरकत नाही. या प्रदेशात भारताशी संबंध न सुधारता चीनला लगाम घालणे अमेरिकेला अशक्य होईल. इतर वैश्विक कारणांसाठीही अमेरिकेकरिता भारत विश्वसनीय साथीदार होऊ शकतो. 

गेल्या १० वर्षांत अमेरिका आणि भारताला एका मार्गावर आणण्याचे प्रयत्न झाले, मात्र तूर्तास गाडी रुळावरून घसरलेली आहे. परंतु मला असा विश्वास आहे की गोर यांना यश येईल. कारण अशक्य ते शक्य करून दाखवण्याची कला त्यांना अवगत आहे. भारतीय संस्कृती ते उत्तम जाणतात. भारत हा मैत्री करणारा देश आहे आणि ट्रम्प यांच्या निवडणुकीत भारताने कशाप्रकारे मदत केली होती हेही त्यांना माहीत आहे. मवाळ स्वभावाचे सर्जिओ गोर हे जाणून आहेत की, दोन्ही देशांतील व्यवहार आणि व्यापार फळला, फुलला पाहिजे. लोकांमध्ये सद्भावना निर्माण झाली पाहिजे.

कोणत्याही देशाच्या राजदूताची पहिली जबाबदारी आपल्या देशाच्या हितांना प्राथमिकता देणे ही असते हे निश्चितच. सर्जिओ ‘अमेरिका फर्स्ट’ नीतीचे काटेकोर पालन करतील. ट्रम्प यांनी  ग्रीनलँडवर कब्जा करण्याचा विषय काढल्यानंतर ज्युनिअर ट्रम्प यांनी ग्रीनलँडचा दौरा केला होता. त्यांच्यासोबत सर्जिओ होते. हे उदाहरण यासाठी  की नवी दिल्लीत राहून सर्जिओ यांचे मन अमेरिकेसाठी धडकत राहील हे नक्की आणि त्यात चुकीचे  काही नाही.  संबंध सुधारण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. त्यात यश मिळवायचे  असेल तर त्यांना भारताच्या गरजाही लक्षात घ्याव्या लागतील.

‘अमेरिकेवर आम्ही विश्वास टाकला आणि संबंध अधिक चांगले करण्यासाठी प्रयत्न केले तेव्हा त्याला अनुकूल प्रतिसाद मिळाला काय?’ -असा प्रश्न भारतीय लोक विचारत आहेत. अमेरिका आजही पाकिस्तानची तरफदारी का करते? रशियाकडून चीनसुद्धा तेल खरेदी करतो, गॅस खरेदी करतो, खुद्द अमेरिका युरेनियम पदार्थांची खरेदी करते; मग केवळ भारतावरच आयात शुल्काचा बडगा का? आता तर ५०० टक्के आयात शुल्काची धमकी दिली जात आहे. जगातला सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश असा धमकी देऊन नियंत्रणात आणण्याचा अमेरिकेचा बेत आहे का? -सर्जिओ गोर यांना या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील आणि भारताच्या बाजूने ट्रम्प यांच्यासमोर ती ठेवावी लागतील, तेव्हाच संबंधात माधुर्य आणण्याच्या प्रयत्नांना यश येईल. भारताच्या शुभेच्छा त्यांच्या बरोबर आहेत.

vijaydarda@lokmat.com
डाॅ. विजय दर्डा यांचे समग्र लेखन  

Web Title : क्या सर्जिओ गोर भारत-अमेरिका के तनावपूर्ण संबंधों को सुधार पाएंगे?

Web Summary : सर्जिओ गोर की नियुक्ति से भारत-अमेरिका संबंधों में सुधार की उम्मीद है, जो पहले हुई देरी और अविश्वास से तनावपूर्ण थे। ट्रंप के साथ उनके करीबी संबंध व्यापार और पाकिस्तान के बारे में भारतीय चिंताओं को दूर करने में मदद कर सकते हैं।

Web Title : Can Sergio Gore salvage strained India-US relations? A Lokmat analysis.

Web Summary : Sergio Gore's appointment as US envoy raises hopes for improved India-US ties, strained by past delays and mistrust. His close ties with Trump could help bridge the gap and address Indian concerns regarding trade and Pakistan.