आता स्मार्टफोनशी माणसाचा मेंदूच बोलेल; आणि माणूस कटाप!

By Shrimant Mane | Published: January 31, 2024 11:00 AM2024-01-31T11:00:37+5:302024-01-31T11:02:25+5:30

Neuralink Brain Chip: ‘टेलिपथी’ नावाची चिप थेट मानवी मेंदूला जोडून संगणक किंवा स्मार्टफोनला ‘संदेश’ पाठवण्याची व्यवस्था इलॉन मस्क यांनी केली आहे. पुढे काय होईल?

Neuralink Brain Chip: Now the human brain will talk to the smartphone; And the man cut! | आता स्मार्टफोनशी माणसाचा मेंदूच बोलेल; आणि माणूस कटाप!

आता स्मार्टफोनशी माणसाचा मेंदूच बोलेल; आणि माणूस कटाप!

- श्रीमंत माने
( संपादक, लोकमत, नागपूर)
अखेर समस्त मानवी समूहाला प्रतीक्षा होती तो ऐतिहासिक क्षण साकारला म्हणायचा. जगाला दररोज कसला ना कसला धक्का देणारे इलॉन मस्क यांनी मंगळवारी जाहीर केले, की त्यांच्या न्यूरालिंक कंपनीने वायरलेस ब्रेन चिप मानवी मेंदूत बसविण्यात यश मिळवले असून, त्यानंतर मेंदूच्या संदेशवहनाचा सगळा कारभार पाहणाऱ्या न्यूराॅनची सक्रियता वाढल्याचे आढळून आले. 

ही चिप म्हणजे अतिसूक्ष्म अशा अल्ट्रा-थीन धाग्यांपासून बनविलेले अत्यंत छोटे उपकरण आहे. त्या माध्यमातून माणसांचा मेंदू आणि संगणक यातील पहिला प्रत्यक्ष व्यवहार सुरू झाला आहे. ही चिप बसविण्यासाठी कोणत्याही शस्त्रक्रियेची गरज नसेल. थेट मेंदूवर कोणताही प्रयोग होणार नाही. तरीदेखील स्मार्टफोन किंवा संगणकाशी मेंदूचा हा पहिला थेट संपर्क आहे. मेंदू जसा माणसाच्या शरीरातील विविध अवयवांना थेट संदेश देतो किंवा ऐच्छिक, अनैच्छिक अशा सगळ्या क्रिया नियंत्रित करतो, तसेच तो आता इलेक्ट्रॉनिक उपकरणांनाही संदेश देईल. त्या आदेशाबरहुकूम ही उपकरणे काम करतील. 

या ब्रेन चिपला ‘टेलिपथी’ असे साजेसे नाव देण्यात आले आहे. एखादा विचार नुसता मनात आला की तो मोबाइल किंवा संगणकावर उमटणे हे स्वप्नवत आहेच. पण, तूर्त ही चिप धडधाकट माणसाच्या मेंदूशी जोडली जाणार नाही. कॉड्रिप्लेजिक आजार म्हणजे चतुरांगघात अर्थात दोन्ही हात व दोन्ही पायांच्या हालचाली बंद होतात असा पक्षाघात आणि पाठीच्या कण्याची गंभीर दुखापत किंवा ALS सारखे स्नायूच्या हालचाली व श्वासोच्छ्‌वास बंद होतो असे मज्जासंस्थेचे गंभीर आजार असलेल्या रुग्णांवर उपचार म्हणून या चिपचा वापर केला जाईल.  न्यूराॅन सक्रिय झाल्याने त्यांची व्याधी दूर होईल. वरवर ही ब्रेन चिप वरदान असल्याचे दाखविले जात आहे, प्रत्यक्षात तसे असेलच असे नाही. 

इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या आहारी गेलेल्या, त्यानुसार दैनंदिन व्यवहार करणाऱ्या माणसांचा थेट मेंदूच अशा रीतीने संगणकाला जोडण्याचा प्रकार घातक होईल हे माहिती असतानाही अमेरिकन सरकारने वर्षभरापूर्वी या चाचण्यांना परवानगी दिली. या प्रयोगाचे नाव आहे PRIME म्हणजे Precise Robotically Implanted Brain-Computer Interface. न्यूरालिंक कंपनी इलॉन मस्क यांची असल्याने तिचा वादाशी संबंध आलाच. या ब्रेन चिपचा प्रयोग प्राण्यांवर केला गेला तेव्हा त्यांच्या मेंदूला सूज आल्याचा, पक्षाघात तसेच सीझर्सचा दुष्परिणाम कंपनीने लपविल्याचा आरोप झाला. त्यासाठी कंपनीला दंडही झाला. पण, मस्क यांनी त्यांच्या स्वभावानुसार प्रयोग सुरूच ठेवला. प्राण्यांवरील चाचण्यांनंतर गेल्या जुलैमध्ये तज्ज्ञांनी कृत्रिम माणूस व त्याचा कृत्रिम मेंदू तयार केला व त्यावर प्रयोग केले. 

आता काही गंभीर मुद्दे - स्मार्टफोन किंवा संगणकाचे आपल्याला कितीही आकर्षण असले आणि आता ते मेंदूला जोडले जाणार म्हणून हरखून गेलो असलो तरी मुळात ही इलेक्ट्रॉनिक उपकरणे आपल्या मेंदूच्या पासंगालाही पुरणारी नाहीत. मानवी मेंदू ही एक चमत्कारी गोष्ट आहे. विज्ञान, तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी सजीवांसाठी मेंदू हेच मोठे वरदान आहे. माणूस त्याच्या मेंदूच्या क्षमतेचा सहा किंवा दहा टक्के इतकाच वापर करतो असे म्हटले जाते. पण, ते अजिबात खरे नाही. तुम्ही जागे असा की झोपलेले, मानवी मेंदू अव्याहतपणे शंभर टक्के कार्यरत असतो. त्याची कार्ये नोंदविण्यासाठीही मोठमोठे ग्रंथ लिहावे लागले. एका मानवी मेंदूत तब्बल दहा हजार कोटी न्यूरॉन म्हणजे कोशिका किंवा चेतापेशी असतात. आकाशगंगेतील ताऱ्यांची संख्याही इतकीच आहे. सेकंदाला एक या गतीने न्यूरॉन मोजायला गेलो तर ३,१७१ वर्षे लागतील. हे न्यूरॉन एकापुढे एक ठेवले तर त्यांची लांबी एक हजार किलोमीटर होईल. संगणक मेमरीच्या भाषेत सांगायचे तर मेंदूची क्षमता २.५ पेटाबाईट आहे. एक पेटाबाईट म्हणजे एक हजार टेराबाईट. एक टेराबाईट म्हणजे हजार गिगाबाईट म्हणजे जीबी. थोडक्यात १६ जीबी मेमरीचे तब्बल १ लाख ५६ हजार स्मार्टफोन. मेंदूतील रक्तवाहिन्यांची लांबी १ लाख मैलाहून अधिक आहे. म्हणजे पृथ्वीला चार प्रदक्षिणा. तेव्हा, न्यूरालिंकची ब्रेन चिप हे अद्भुत, ऐतिहासिक संशोधन मानवजातीला नवे वळण देणारे असले तरी संगणकाला मेंदूची बरोबरी करण्यासाठी आणखी खूप वर्षे लागतील.
( shrimant.mane@lokmat.com) 

Web Title: Neuralink Brain Chip: Now the human brain will talk to the smartphone; And the man cut!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.