राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 08:24 IST2025-10-17T08:21:41+5:302025-10-17T08:24:04+5:30
राज यांना सोबत घेतले, तर काँग्रेसला बिहारमध्ये फटका बसेल. भाजपचा प्रश्नच नाही. पण, राज मात्र ‘आपल्याशिवाय कोणाचेच चालत नाही’ अशा भ्रमात दिसतात.

राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
-यदु जोशी, राजकीय संपादक, लोकमत
राज ठाकरेंचा एक व्हिडीओ काहीच महिन्यांपूर्वी व्हायरल झाला होता. फडणवीस एका कार्यक्रमात बसलेले आहेत, बाजूला अजित पवार, तटकरे, अशोक चव्हाण, छगन भुजबळ असे बरेच जण बसले आहेत अशा एका फोटोवरून त्या व्हिडीओत राज यांनी भाजपची खिल्ली उडवली होती. भाजपचे मतदार आणि कार्यकर्ते हा फोटो कसा बघत असतील, असा खोचक टोलाही त्यांनी हाणला होता. परवा मविआच्या नेत्यांसोबत राज ठाकरे बसलेले दिसले, तेव्हा तो व्हायरल व्हिडीओ आठवला. नियती कधीकधी सूडही उगवते. राज हे बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत बसून पत्र परिषद घेताहेत असा तो परवाचा व्हिडीओ होता. हे राजकारण आहे साहेब, कालचा शत्रू आजचा मित्र असतो आणि आजचा मित्र उद्याचा दुश्मन होऊ शकतो; त्यामुळे असे ठासून बोलणे टाळले पाहिजे. ‘चक्की पिसिंग, चक्की पिसिंग’ म्हणण्यात काही अर्थ नसतो. सोईनुसार भूमिका बदलणाऱ्यांनी टोकाचे बोलणे टाळावे हेच उत्तम.
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील नेत्यांनी राजकारण अगदीच खालच्या पातळीवर नेले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्ते, खालचे नेते हा स्तर पाताळात नेतील. बंडखोरीचा सामना मविआपेक्षा महायुतीला अधिक करावा लागेल. कारण राज्यात सत्ता असल्याने आणि वरून मोठ्या प्रमाणात ‘व्हिटॅमिन एम’ येण्याची खात्री असल्याने महायुतीत एकमेकांची पाडापाडी करण्याचे प्रकार अधिक असतील. मविआचा सामना करण्याइतकेच अंतर्गत कपडेफाडीला पायबंद घालण्याचे आव्हान हे महायुतीतील पक्षांसमोर असेल.
राज यांचे बिहार कनेक्शन
मविआसाठी राज ठाकरे डोकेदुखी ठरतील. उद्धव यांनी काँग्रेसला बाजूला सारून राज यांना सोबत घेतले तर विरोधकांच्या मतांमध्ये विभाजन होईल. जिल्हा परिषद वा नगरपालिका यापैकी एक निवडणूक साधारणत: नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल. ११ नोव्हेंबरला बिहार विधानसभेच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान होणार आहे. राज ठाकरेंना सोबत घ्यायचे की नाही याबाबत मविआचा निर्णय त्यानंतर होईल. राज यांना आताच सोबत घेण्याचा निर्णय केला तर त्याचा फटका काँग्रेस-राजद युतीला बिहारमध्ये बसेल. राज यांना आम्ही सोबत घेणार असे काँग्रेसने आताच जाहीर केले तर बिहारमध्ये त्याचे दुष्परिणाम काँग्रेसला भोगावे लागू शकतात. शक्यता हीच अधिक आहे की उद्धव यांच्याशी युती करताना त्यात राज यांनाही सोबत घ्यायला काँग्रेसचे शीर्षस्थ नेतृत्व मान्यता देणार नाही. ‘काँग्रेस की राज?’- यापैकी कोणाला निवडायचे असा यक्षप्रश्न उद्धव ठाकरेंसमोर उभा ठाकू शकतो. दोन भावांच्या एकत्र येण्यावर एकनाथ शिंदेंचे आगामी निवडणुकीत महानगरीय पट्ट्यातले भवितव्य अवलंबून असेल.
सध्याची माहिती अशी आहे की, काँग्रेसला मविआमध्ये राज ठाकरे नको आहेत. मविआचे शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला गेले तेव्हा राज सोबत नकोत असा सूर काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लावला होता, पण संजय राऊत आक्रमक झाले, पत्रापत्रीही झाली म्हणतात अन् मग राज यांचा समावेश केला गेला. मात्र, राज यांच्यासोबत आपले प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बसणार नाहीत याची काळजी काँग्रेस नेतृत्वाने घेतली. म्हणूनच बाळासाहेब थोरात यांना पाठविले गेले. राज यांना मविआत घ्यायला काँग्रेस तयार नाही. उद्धवसेनेकडून त्यासाठी दबाव आणला जात आहे. राज ना भाजपला हवे आहेत ना काँग्रेसला. राज मात्र, आपल्याशिवाय कोणाचेच चालत नाही अशा भ्रमात दिसतात.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबई महापालिका असेल. मुंबईत सत्ता आणण्यासाठी काही समीकरणे बनतील, बदलतील आणि मग ती काही ठिकाणी राज्यातही स्वीकारावी लागणे ही अपरिहार्यता असेल. राज यांच्यामुळे होणारे फायदे अधिक की काँग्रेससोबत जाण्याने फायदे अधिक याचा फैसला उद्धव यांना करावाच लागेल.
जाता जाता
मुंबईत झालेल्या एका आयकर छाप्याची राजकीय, प्रशासकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा आहे. मंत्रालयात मोठमोठी कामे निपटवणारे दोन सख्खे भाऊ आणि एका ज्येष्ठ माजी सनदी अधिकाऱ्याचा ‘स्लीपिंग पार्टनर’ या निमित्ताने रडारवर होता म्हणतात. त्यात काय घबाड मिळाले याचा तपशील समजू शकला नाही. ‘मी नाही त्यातली अन् कडी लावा आतली’ अशा पद्धतीने अनेक सनदी अधिकारी अशी दुकाने चालवतात. खूप जण आहेत असे. काही जणांचे बुरखे फाटतात, काही बिनबोभाट वावरतात. मंत्रालय आपणच चालवतो अशा आविर्भावात वागणारे अधिकारी कधीकधी मात्र अडचणीत येतात.
yadu.joshi@lokmat.com