मुंबई महापालिका: महापौरपद, स्टँडिंग कमिटी भाजपला पाहिजे!

By अतुल कुलकर्णी | Updated: September 8, 2025 11:28 IST2025-09-08T11:27:51+5:302025-09-08T11:28:34+5:30

नव्या वर्षाच्या जानेवारीत किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अन्य पालिकांची निवडणूक होईल, असे चित्र आहे.

Mumbai Municipal Corporation: BJP wants the mayor's post, standing committee! | मुंबई महापालिका: महापौरपद, स्टँडिंग कमिटी भाजपला पाहिजे!

मुंबई महापालिका: महापौरपद, स्टँडिंग कमिटी भाजपला पाहिजे!

-अतुल कुलकर्णी (संपादक, मुंबई)
महापालिका निवडणूक या वर्षात होण्याची शक्यता दिसत नाही. २०२६ या नव्या वर्षाच्या जानेवारीत किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अन्य पालिकांची निवडणूक होईल, असे चित्र आहे. मुंबई महापालिकेत २२७ जागा आहेत. त्यांपैकी भाजपला १६० ते १७० जागांवर उमेदवार उभे करायचे आहेत. काही जागा मित्रपक्षांना द्यायच्या आहेत. याचा अर्थ मुंबईमध्ये शिंदेसेनेला ५० ते ६० जागादेखील मिळणार नाहीत. नवी मुंबईत गणेश नाईक यांना एकनाथ शिंदे यांच्यासोबत लढायचे नाही. ठाण्यामध्ये भाजपला स्वतंत्र लढायचे आहे. ठाणे आणि मुंबई मिळून जवळपास  नऊ महापालिका आहेत. भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये महापौरपद स्वतःकडेच हवे आहे. याशिवाय प्रमुख महापालिकांच्या स्टँडिंग कमिटीचे चेअरमनपदही भाजपलाच हवे आहे. हे ज्यांना मान्य असेल त्यांच्यासोबत भाजपची महायुती होईल असे भाजपनेते खासगीत सांगतात. बाहेर आम्ही काहीही सांगू... आम्ही महायुती म्हणून लढू... महापौर महायुतीचाच होईल... असे कितीही छातीठोकपणे सांगितले जात असले तरी ज्यावेळी जागावाटप होईल तेव्हा ही भाषा अशीच राहील का? असे विचारले असता भाजपनेते फक्त हसतात आणि गप्प बसतात.

गेल्या काही दिवसांत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी मवाळ भूमिका घेतली आहे. मराठा आंदोलन फडणवीस यांनी संयमाने हाताळले. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला त्यांनी योग्य मार्गदर्शन केले असे म्हणत, फडणवीस यांच्यावर टीका झाली तरीही त्यांनी शांतपणे परिस्थिती हाताळली असे कौतुकही खा. राऊत यांनी केले. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रकरणात कुठे होते? हे आंदोलन मिटवण्यासाठी त्यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत, अशी टीकाही राऊत यांनी केली. गेल्या काही दिवसांत उद्धवसेनेची भाजप विषयीची भाषा बदलली आहे. ठाकरे भाजपवर टीका करताना दिसत नाहीत. (आणि शिंदेसेनेचे नेते भाजपने आमची कशी कोंडी केली हे सांगण्याचे थांबत नाहीत) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त काढलेल्या विशेष अंकात ठाकरे यांनी फडणवीस यांचे कौतुक करणारा लेखही लिहिला. उद्धवसेनेत दिसणारा हा बदल लक्षणीय आहे. मध्यंतरी आदित्य ठाकरेही मुख्यमंत्र्यांना भेटून आले. वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी आपण चर्चा केली असेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावर भाजप आणि फडणवीस यांनी कुठलीही टीका केलेली नाही. 

दुसरीकडे, मराठा आंदोलनाच्या काळात पत्रकारांशी बोलताना, ‘‘तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एकनाथ शिंदे यांना विचारा” एवढे एकच उत्तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे देत होते. नवी मुंबईत जेव्हा मनोज जरांगे आले होते, तेव्हा शिंदेंनी मध्यस्थी करून त्यांना तेथूनच परत पाठवले होते. त्याचे काय झाले? हे शिंदेच सांगू शकतील, असे म्हणण्याचे धाडस भाजपमधल्या एकाही नेत्यांनी केले नव्हते. मात्र, राज यांनी ते दाखवले. (त्यासाठी भाजपच्या नेत्यांनी राज ठाकरे यांना धन्यवादाचे आणि अभिनंदनाचे फोन केल्याची चर्चा आहे.) गणपतीच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र आले. राज यांच्या घरी उद्धव आणि त्यांचा संपूर्ण परिवार गेला. त्यांची एकत्र जेवणे झाली. त्याच दिवशी संध्याकाळी फडणवीस राज यांच्या घरी गणपती दर्शनाला गेले. अशा घटना केवळ योगायोग म्हणून कशा सोडून द्यायच्या? 

निवडणुका जवळ आल्या की राजकीय पतंगबाजी सुरू होते. अशीच एक चर्चा राजकीय वर्तुळात सध्या वेग घेत आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडून एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र पक्ष केला. शिवसेनेचे चिन्हही त्यांनी नेले. त्यामुळे उद्धव यांचा शिंदे यांच्यावर राग आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचा धनुष्यबाण नेल्याचे राज यांनाही आवडले नाही. ते त्यांनी बोलून दाखवले होते. महत्त्वाचे म्हणजे अमित ठाकरे यांच्या विरोधात शिंदेसेनेने उमेदवार दिल्यामुळे अमितचा पराभव झाल्याचा रागही राज यांच्या मनात आहे. फडणवीस आणि शिंदे यांच्यातल्या स्नेहसंबंधाची माहिती मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांना आणि भाजपच्या बड्या नेत्यांना जशी आहे, तशीच ती शिंदेसेनेच्या प्रमुख मंत्र्यांनाही आहे. या पार्श्वभूमीवर, ठाकरे बंधू एकत्र येतील. त्याला भाजप पडद्याआडून सपोर्ट करेल. शिंदेसेनेला एकटे पाडले जाईल, असे पतंग सध्या उडवले जात आहेत. हे पतंग किती उडतील की मध्येच गटांगळ्या खातील हे जसजशी निवडणूक जवळ येईल, तसतसे स्पष्ट होईल.

गणेशोत्सवाच्या काळात अनेक नेते भेटीगाठीसाठी ठिकठिकाणी जात होते. काहींनी उत्तम देखावे तयार केले होते. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काशीविश्वेश्वरच्या मंदिराचा देखावा उभा केला होता. त्यांच्याशी बोलताना ते म्हणाले, रोज किमान एक हजार लोकांना भेटतो. गणपतीच्या संपूर्ण कालावधीमध्ये किमान १० ते १२ हजार लोकांच्या भेटीगाठी होतात. अनेक गणेश मंडळांना मी जातो असेही ते म्हणाले. भाजपनेते किती बारकाईने कोणत्याही इव्हेंटचे नियोजन करतात, ते लक्षात येण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे. या गणेशोत्सवाच्या दहा-बारा दिवसांत मुंबई काँग्रेस, शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते मुंबईत कुठे फारसे दिसलेच नाहीत. भाजपनेते ठिकठिकाणी जातात. लोक त्यांच्यासोबत फोटो काढतात. ते फोटो सोशल मीडियावर संबंधितांकडून पोस्ट केले जातात. पर्यायाने भाजपचा प्रचार आणि प्रसार होतो.  कदाचित ही मोफत पब्लिसिटी काँग्रेसच्या नेत्यांना नको असेल. शिंदे यांनी जेवढ्या सार्वजनिक गणेश मंडळांना आणि घरगुती गणपतींना भेटी दिल्या, त्याच्या दहा टक्के भेटी जरी दोन काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्या असत्या तरी काँग्रेसचे नाव सोशल मीडियातून दिसत राहिले असते... पण अशी मोफत प्रसिद्धी दोन्ही काँग्रेसला हवी आहे का..?

Web Title: Mumbai Municipal Corporation: BJP wants the mayor's post, standing committee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.