मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त पक्षाच्या मेळाव्यात बोलताना कोणी त्यांना जबाबदारी दिलेली नसतानाही एक नवीन भूमिका शोधली आहे, ती म्हणजे सरकारला सकारात्मक सहकार्य करण्याची. महापालिका निवडणुकीत त्यांनी बंधू उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी युती केली होती; पण सत्ता मिळविता आली नाही. त्यातही मनसेचे सहाच नगरसेवक निवडून गेले. महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला. पराजयाने खचलेल्या मनसैनिकांना राज कोणते मार्गदर्शन करतात याची उत्सुकता होती. पराजयानंतरची पुढची राजकीय दिशा काय असेल, उद्धव ठाकरेंबरोबरची युती कशा पद्धतीने पुढे जाईल यावर त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे पराजय विसरत जोमाने पुढे जाण्यासाठीचा मंत्र मनसैनिकांच्या कानावर पडलाच नाही. यावेळी राज एका नवीन भूमिकेत शिरले.
राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी २७ विषयांवर लोकांच्या सूचना मागवायच्या हेतूने त्यांनी वेबसाइट काढली असून, त्यावर आलेल्या सूचना ते सरकारकडे पाठविणार आहेत. राज्यात वा महापालिकेत स्वत:चे सरकार येणे दुरापास्त असल्याने आहे त्याच सरकारला काही सुचवून बघावे आणि त्यासाठी लोककल्पनांचा वापर करावा असे नवीन दालन त्यांनी खुले केले आहे. भाजपने महापालिका निवडणुकीत जोरदार दणका देऊन काहीच दिवस लोटले असताना राज त्यांच्या खास शैलीने भाजपवर जोरदार प्रहार करत मनसैनिकांमध्ये नवी जान फुंकतील ही आशा फोल ठरली.
सरकार, भाजप आणि एकूणच महायुतीविरुद्ध एल्गार पुकारणारी नवीन भूमिका ते जाहीर करतील, अशी अपेक्षा असताना सरकारला नवनवीन कल्पना सुचविण्याचे अनाकलनीय आवाहन त्यांनी केले. त्याने काय साधणार हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. बरे ! सरकारने त्यांना अशी कोणतीही जबाबदारी दिलेली नाही, त्यांची त्यांनीच ती अंगावर घेतली आहे आणि लोकांच्या गळी उतरविली आहे. ज्या लोकांना सूचनाच करायच्या आहेत ते थेट सरकारलाच त्या करतील ना ! राज यांच्या सूचना जशाच्या तशा स्वीकारल्या जातील, असा कोणताही परस्पर सामंजस्य करार त्यांच्यात आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये झालेला नाही. राज हे दरवेळी वेगळा विचार करतात तसा त्यांनी तो याहीवेळी केला आहे.
राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने नागरिक आणि सरकार यामधील दुवा म्हणून काम करण्याची स्वत:च घोषणा त्यांनी करून टाकली आहे. यामागे त्यांचा हेतू चांगला असेलही, पण सध्याचे थांबल्यासारखे झालेले त्यांचे राजकारण पुढे न्यायचे तर सरकारचा टपाल्या अशी भूमिका घेणे उचित ठरणार नाही. लोकांकडून सूचना मागवायच्या त्यातून आंदोलनाचे मुद्दे निश्चित करायचे आणि त्यावर सरकारला उत्तरदायी करण्यासाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करायचे अशी लढाऊवृत्ती राज यांच्याकडून अपेक्षित असताना त्यांनी मध्यस्थ म्हणून काम करण्याचा निवडलेला मार्ग योग्य कसा म्हणायचा? राजकारणात मध्यस्थ होणे सुरक्षित असते; पण इतिहास नेहमीच सत्ताधारी किंवा सरकारचा प्रखर विरोधक या दोघांचीच नोंद घेत आला आहे हे राज यांनी लक्षात घ्यायला हवे.
सरकारला सूचना पोहोचविण्याचे काम करणे म्हणजे मैदानात उतरून दणकेबाज बॅटिंग करण्याची अपेक्षा असलेल्या क्रिकेटपटूने ते करायचे सोडून इतरांना कसे खेळावे हे सांगण्यासारखे झाले. वादळ होण्याची ताकद राज यांच्यामध्ये असताना त्यांनी केवळ हवेबरोबर वाहत जाण्याचे ठरविले तर उरलीसुरली ऊर्जाही संपण्याचा धोका अधिक. त्यांच्यासारख्या लढाऊ नेत्याने सूचनांच्या कागदोपत्री कल्पनांवर समाधान मानले तर वेबसाइट गजबजेलही, पण त्याने सरकारला जाब विचारण्यासाठी जनता रस्त्यावर उतरविता येणार नाही. तेव्हा लोककल्पनांचे बाड सरकारच्या हाती ठेवण्याऐवजी जनसामान्यांना भेडसावणाऱ्या मुद्द्यांवर आंदोलनाची भूमिका घेणे हेच ठाकरे आडनाव असलेल्या राज यांच्याकडून हवे आहे. सत्तेला सल्ला देणे सोपे; पण सत्तेला घाम फोडणे अधिक कठीण, आणि राजकारणात किंमत दुसऱ्या भूमिकेचीच असते.
सरकार आणि एकूणच व्यवस्थेविरुद्ध आश्वस्त आवाज म्हणून आजही लोक राज यांच्याकडे पाहतात. त्यांनी एखादा मुद्दा हाती घेतला की खळ्ळं.. खट्याक झालेच आणि सरकार नमलेच म्हणून समजा अशी धारणा लोकांमध्ये आजही आहे. ती धारणा पुढे नेण्याचे धोरण हाती घेत त्यांनी वाटचाल करावी हेच सरकारविरोधी आवाज लुप्त होत असल्याच्या काळात आवश्यक आहे. लोकांकडून आलेल्या सूचनांचे इंधन टाकून मनसेचे इंजिन सरकारच्या दारात उभे करण्याने फारसे काही हशील होणार नाहीच. राज म्हणजे अंगार, राज म्हणजे दे दणका ही ओळख पुसट करणे ना त्यांच्या हिताचे ना राज्याच्या.
Web Summary : Raj Thackeray offers government cooperation, seeking public suggestions for state progress. Critics question this shift from opposition, urging him to champion public issues actively rather than act as a mere conduit.
Web Summary : राज ठाकरे ने सरकार को सहयोग की पेशकश की, राज्य की प्रगति के लिए सार्वजनिक सुझाव मांगे। आलोचकों ने विपक्ष से इस बदलाव पर सवाल उठाया, उनसे केवल एक नाली के रूप में कार्य करने के बजाय सक्रिय रूप से सार्वजनिक मुद्दों का समर्थन करने का आग्रह किया।