रोज तुम्ही ६० गोळ्या खाता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 12:37 IST2026-03-29T12:37:03+5:302026-03-29T12:37:03+5:30
तुमच्या औषधाचा डबा एकदा उघडून बघा! त्यात किती काय काय, जुनंपानं आणि मुदत संपून गेलेलं ठेवलंय तुम्ही ? गोळ्या, ट्यूब, मलमं, काढे, चूर्ण?

रोज तुम्ही ६० गोळ्या खाता?
रोज तुम्ही ६० गोळ्या खाता?
तुमच्या औषधाचा डबा एकदा उघडून बघा! त्यात किती काय काय, जुनंपानं आणि मुदत संपून गेलेलं ठेवलंय तुम्ही ? गोळ्या, ट्यूब, मलमं, काढे, चूर्ण?
याच वर्षांपूर्वी, माझ्या सासूबाईंना थोड्या थोड्या वेळाने तोंडात गोळ्या टाकताना बघितलं आणि मी त्यांची पोटली उघडून बघितली. खजिनाच होता तो! त्या खजिन्यात सगळ्या 'पॅथ्या' एकत्र नांदत होत्या. हे अमुक डॉक्टरने दिलंय आणि हे तमुक डॉक्टरने ! त्यातली कित्येक औषधं तर 'एक्स्पायर 'ही झालेली होती; पण तरी त्या ती खात होत्या. शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी एक-एक औषध त्यात असावं, शिवाय ताप, सर्दी-खोकल्याची, अपचनावरची कॉमन औषधं वेगळीच. बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना, बऱ्याच वेगवेगळ्या 'पॅथी'ची औषधं एकत्र घेण्याची सवय असते. हे करून बघू, ते तरी करून बघू, असं करता करता बरीच औषधं ते दिवसभरात खात असतात. एक मैत्रीण म्हणाली, "मला दिवसभरात ६० गोळ्या घ्याव्या लागतात.
'६०???' मी आश्चर्यचकित होऊन विचारलं, 'एकाच डॉक्टरनी दिलेल्या??' "नाही गं, अॅलोपथी, होमिओपॅथी, आयुर्वेद सगळं करून बघते आहे. कशाचा तरी फायदा होईल ना??" - ती उत्तरली; पण तुझ्या डॉक्टरना तू एवढी सगळी औषधं घेतेस हे माहिती आहे का? असं विचारलं तर "छे! त्यांना कशाला सांगायचं?" म्हणत तिने मलाच वेड्यात काढलं.
अशा प्रकारे औषधं घेतल्यास ती एकमेकांना पूरक असतात की मारक ठरतात हे आपल्याला माहीत आहे का? काही वेळा निद्रानाशावरची दोन औषधं असू शकतात. दोन्ही एकत्र घेतल्यास झोक जाणे, जास्त झोप येणे, डोकं दुखणे असा त्रास होऊ शकतो. प्रत्येक औषधाचा गुण अवगुण (साइड इफेक्ट) वेगवेगळा असतो. ते आपल्याला माहिती असतात का? आणि आपण ही सगळी औषधं एकत्र घेतो आहे, हे डॉक्टरनाही माहिती नसतं हे विशेष... त्यामुळे, "एवढी औषधं घेते/घेतो; पण कशानीच गुण येत नाही" ही आपली तक्रार कायमच राहते.
वयानुसार, पचनशक्ती कमी होते, हाडं ठिसूळ होतात, दृष्टी, कान कमजोर होतात, हृदय बोलायला लागतं आणि हे सगळं आपल्याला स्वीकारावं लागतं. रोज उठून शरीराची काहीतरी तक्रार करायची आणि गोळ्या, पातळ औषधं घेत बसायची हे योग्य आहे का?
एक काका, महिन्याभरासाठी निसर्गोपचार केंद्रात गेले. एकदाच सगळे त्रास कमी होतील असा त्यांचा विचार होता; पण हे त्यांनी त्यांच्या डॉक्टरांना सांगितलं नाही. "हृदयासाठी असलेली औषधं नियमित घेतलीच पाहिजे" असं डॉक्टरांनी बजावून सांगितलेलं असताना, त्यांनी महिनाभर अॅलोपॅथीला सुट्टी दिली! जबाबदार कोण?? मुख्य म्हणजे आपल्या वयाप्रमाणे आपल्याला कोणता आहार झेपतो आहे, हे आपल्याला समजतं; पण हल्ली रिल्स बघून, मुलाखती ऐकून, व्हॉट्सअॅप इंडस्ट्रीमध्ये फिरणारे मेसेजेस वाचून, आपला आहार बदलणारे ज्येष्ठ बघितले की, वाईट वाटतं. 'फायबर खा' ऐकलेले ज्येष्ठ फक्त फायबरच खात राहिले, सोबत प्रोटिन म्हणून अंडी खा, मासे खा करत राहिले तर ते त्यांना झेपणार आहे का? अपचन झालं की, डॉक्टरकडे जायला तयार! आपलं पोट का दुखतं आहे, छातीत जळजळ का होते आहे किंवा बद्धकोष्ठता का होते आहे, हे स्वतःला विचारावं. त्याप्रमाणे आहार बदलावा, आपलं शरीर आपल्याला सगळ्या सूचना देत असतं; पण त्या ऐकायला शिकलं पाहिजे. त्यात मित्रमंडळींचे सल्ले असतात. "हे करून बघ, त्याने काही त्रास होणार नाही" असं आवर्जून सांगणारे. प्रत्येकाचं शरीर निराळं, दुखणं निराळं, सहनशक्ती निराळी, हे लक्षात घ्यायला हवं. ज्येष्ठांनो, वकिलांपासून आणि डॉक्टरांपासून काहीही लपवू नये आणि स्वतःच्या मनाने कसल्याही व्याधीवर उपचार करू नयेत, एवढीच प्रार्थना! - संध्या घोलप, पुणे
तुमच्या जिवावर बेतेल, सावध असा!
औषधांचे साइड फेक्ट नसतात हा गैरसमज आहे. अशी औषधे घेण्याने यकृत आणि किडनीवर ताण येऊ शकतो. हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा आजारांची औषधं अचानक बंद करणं जीवावर बेतू शकतं, निसर्गोपचार हे मूळ उपचारांना पूरक हवेत, त्यांना पर्याय म्हणून नाही, हे लक्षात ठेवावं. एकदा झालेल्या दुखण्यावर डॉक्टरांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन जपून ठेवून पुन्हा काही काळाने तेच दुखणं उद्भवल्यास डॉक्टरांकडे न जाता परस्पर स्वतःच ती औषधं घेणंही जीवावर बेतू शकतं, हे ध्यानी ठेवावं. - डॉ. प्रज्ञावंत देवळेकर