सुंदरीला मूर्ख म्हटलं; 'मिस युनिव्हर्स'मध्ये राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 09:11 IST2025-11-10T09:10:26+5:302025-11-10T09:11:07+5:30
Miss Universe: अलीकडच्या काळात 'मिस युनिव्हर्स' स्पर्धा बऱ्याच वादात सापडत चालल्या आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं काही ना काही वाद सतत ऐकायला येत असतात. थायलंडमध्ये सुरू असलेली मिस युनिव्हर्स स्पर्धा आता अशीच मोठ्या वादात सापडली आहे आणि जगभरात त्याची चर्चा सुरू आहे.

सुंदरीला मूर्ख म्हटलं; 'मिस युनिव्हर्स'मध्ये राडा
अलीकडच्या काळात 'मिस युनिव्हर्स' स्पर्धा बऱ्याच वादात सापडत चालल्या आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं काही ना काही वाद सतत ऐकायला येत असतात. थायलंडमध्ये सुरू असलेली मिस युनिव्हर्स स्पर्धा आता अशीच मोठ्या वादात सापडली आहे आणि जगभरात त्याची चर्चा सुरू आहे.
स्पर्धेचे थायलंडमधील संचालक नवात इट्साराग्रिसिल यांनी मंचावरच सर्वांसमोर मिस मेक्सिको फातिमा बोशचे वाभाडे काढले. तिच्यावर आरडाओरड केली आणि तिला 'मूर्ख' म्हटलं. का? तर तिनं थायलंडमध्ये होणाऱ्या प्रमोशनल शूट किंवा सोशल मीडिया पोस्टमध्ये सहभाग घेतला नाही. त्यामुळे नवात यांनी सर्व स्पर्धकांसमोरच तिला झापलं. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. जेव्हा फातिमानं त्यांच्या विधानावर आक्षेप घेतला आणि नाराजी व्यक्त केली, तेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलवून तिला हॉलमधून बाहेर काढायची धमकी त्यांनी दिली. त्याही पुढे जाऊन त्यांनी फर्मावलं, जो कोणी फातिमाचं समर्थन करेल, त्यांनाही या स्पर्धेतून बाहेर काढलं जाईल.
अर्थातच, हा अपमान सहन न झाल्यानं फातिमा तिथून लगेच बाहेर पडली. पण, महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवात यांनी धमकी देऊनही स्पर्धेतील इतर अनेक सौंदर्यवतींनी फातिमाला पाठिंबा देत नवात यांचा निषेध करत हॉलमधून बाहेर जाणं पसंत केलं. हॉलमधून बाहेर पडणाऱ्यांमध्ये सध्याची मिस युनिव्हर्स, डेन्मार्कची व्हिक्टोरिया किएर थेलविग हिचाही समावेश होता. फातिमाचं समर्थन करताना तिनं म्हटलं, 'हा महिलांच्या अधिकारांचा प्रश्न आहे. कोणत्याही तरुणीचा अपमान सहन केला जाऊ शकत नाही. संयोजकांच्या निषेधार्थ मी हा मंच सोडते आहे.'
फातिमा बोशनंही ठणकावून सांगितलं, 'मी इथे फक्त सजायला, नटायला किंवा कपडे बदलायला आलेले नाही. मी आवाज उठवायला घाबरत नाही. मी त्या महिलांचा आणि मुलींचा आवाज बनायला आले आहे, ज्या आपल्या हक्कांसाठी लढत आहेत. मी माझ्या देशाला सांगू इच्छिते की, मी पूर्ण ताकदीनं उभी आहे आणि माझं मत मी ठामपणे मांडेन.' या घटनेनंतर सोशल मीडियावर प्रचंड वादळ उठलं. संपूर्ण जगभरातून मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या थायलंड संयोजकांवर लोकांनी ताशेरे ओढले. खुद्द थायलंडवासीयांनीही यावर तीव्र नापसंती व्यक्त केली.
आपल्याविरुद्धचा असंतोष तीव्र होतोय हे लक्षात आल्यावर नवात यांनी एक व्हिडीओ जारी करत आपल्या वर्तणुकीची माफी मागितली. त्यांचं म्हणणं होतं, माझ्या बोलण्यामुळे कोणाला वाईट वाटलं असेल तर मी माफी मागतो. त्यांच्या या माफीनाम्यावरूनही मोठा गदारोळ झाला.
या साऱ्या प्रकरणाची मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशननंही (MUO) तातडीनं दखल घेतली. नवात यांच्या वर्तनाला 'दुर्भावनापूर्ण आणि अपमानास्पद' ठरवत त्यांनी तीव्र निषेध केला. नवात यांच्यावर आता कारवाईही करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष राउल रोचा यांनी एका व्हिडीओ संदेशात सांगितलं, नवात यांनी यजमान म्हणून आपल्या जबाबदारीचं पालन केलं नाही. स्पर्धकांचा आदर तर केला नाहीच, शिवाय स्पर्धकांना धमकावत त्यांच्या आत्मसन्मानालाही ठेच पोहोचवली. नवात यांच्या भूमिकेवर आता मर्यादा घालण्यात येणार आहे आणि त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईदेखील केली जाणार आहे.