पुणे शहराच्या प्रगतीला मेट्रोचा बूस्टर डोस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 05:37 AM2019-02-09T05:37:30+5:302019-02-09T05:38:07+5:30

पुण्यनगरीच्या वैभवात भर घालणाऱ्या पुणे मेट्रोची घोडदौड वेगाच्या भाषेत बोलायचे तर सुसाटपणे चालू आहे. आमच्या अपेक्षेप्रमाणे हे काम गतीने पूर्णत्वास जात असून आज अखेर तब्बल २८ टक्के काम मार्गी लागले आहे.

Metro booster dose to the Pune city's progress | पुणे शहराच्या प्रगतीला मेट्रोचा बूस्टर डोस

पुणे शहराच्या प्रगतीला मेट्रोचा बूस्टर डोस

Next

- गिरीश बापट
(पालकमंत्री, पुणे)

पुण्यनगरीच्या वैभवात भर घालणाऱ्या पुणेमेट्रोची घोडदौड वेगाच्या भाषेत बोलायचे तर सुसाटपणे चालू आहे. आमच्या अपेक्षेप्रमाणे हे काम गतीने पूर्णत्वास जात असून आज अखेर तब्बल २८ टक्के काम मार्गी लागले आहे. वाहतूककोंडीवर मात करणाºया या प्रकल्पाला आम्ही आजमितीला १९ टक्के एवढा अर्थपुरवठा केला. भारतीय जनता पार्टीच्या राजकीय अजेंड्यावर या विषयाला सर्वोच्च प्राधान्य देऊन एक पाऊल पुढे टाकले आहे. संपूर्ण पुणे आता मेट्रोमय झाले आहे. दिलेल्या शब्दाला जागून या वर्षाअखेरीला पिंपरी चिंचवड ते रेंजहिल्स या मार्गावर मेट्रो धावू लागल्याची अनुभूती पुणेकरांना येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिनाभरापूर्वीच हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गाचे भूमिपूजन केले. त्याचा आराखडा येत्या महिन्याभरात तयार होईल. लवकरच सिंहगड रोड, वाघोली, हडपसर आणि कात्रज या चार मार्गांवरील मेट्रोचे काम मार्गी लागल्याचे पुणेकरांना दिसेल अशी तयारी आम्ही केली आहे. चांदणी चौकातील शिवसृष्टीपर्यंत मेट्रो जावी. स्वारगेटहून कात्रजपर्यंत तिचा विस्तार व्हावा. नदीकाठच्या रस्त्यांवर स्कायवॉकची सुविधा द्यावी. मेट्रोचे सर्वच मार्ग व्हर्टिकल गार्डनद्वारे सुशोभित व्हावेत. एकात्मिक वाहतुकीद्वारे रेल्वेची सर्व स्टेशन्स मेट्रोशी जोडली जावीत या दिशेने आता आम्ही झेप घेतली आहे.

पिंपरी चिंचवड ते शिवाजीनगर या मार्गावरील मेट्रोचे ४५६ पैकी २०१ खांब उभे राहिले आहेत. वनाझ ते शिवाजीनगर या मार्गावरील ३०८ पैकी १५२ खांब आजपर्यंत उभारण्यात आले आहेत. रामवाडी ते शिवाजीनगर या सर्वांत लांब पल्ल्याच्या मार्गावर १,५९२ खांब उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी १३८ खांब बांधून तयार आहेत. या खांबांवरील प्रत्यक्ष मेट्रोचा रस्ता तयार करणारे साचे बांधून तयार आहेत. हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गासाठी ६,२१४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यालाही केंद्राने मंजुरी दिली आहे. सुमारे २४ किलोमीटरचा मेट्रोचा हा मार्ग प्रत्यक्षात एप्रिल २०२१ मध्ये कार्यान्वित होईल. पब्लिक व प्रायव्हेट भागीदारीतून साकारला जाणारा हा पुण्यातील सर्वांत मोठा प्रकल्प ठरणार आहे.

पर्यावरणाचे संतुलन राखून मेट्रोचे काम पुढे नेण्यासाठी वृक्ष लागवड व पुनर्रोपण हे काम हे मिशन म्हणून स्वीकारले आहे. त्यानुसार औंध, तळजाई, रेंजहिल्स या परिसरात पाच हजार दोनशे झाडे लावली आहेत. आकुर्डी व पिंपरी चिंचवड परिसरात पाच हजार पाचशे झाडे बहरू लागली आहेत. पुणे मेट्रोने आतापर्यंत तब्बल आठ हजार सातशे झाडे लावली असून ती जगविण्याचे काम निर्धाराने चालू आहे. मेट्रोच्या मार्गात येणारी सहाशे अठ्ठावन्न झाडे पुनर्रोपणाद्वारे ठीकठिकाणी जोमाने वाढताना दिसत आहेत. पुण्याचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा मेट्रोच्या रचनेत प्रतिबिंबित होणार आहे. डेक्कन जिमखाना व संभाजी पार्क ही दोन स्टेशन्स पुणेरी पगडीच्या आकारात साकारली जाणार आहेत. शिवाजीनगर येथे मध्यवर्ती अशा तीस मजली भव्य स्टेशनची उभारणी केली जाणार आहे. फ्रान्स आणि स्पेनमधील वास्तुविशारद यांनी त्याचा आराखडा बनविला आहे. स्वारगेट येथील मल्टीमॉडेल हब देशातील एकात्मिक वाहतुकीचा सर्वोत्तम प्रकल्प ठरेल.

अडथळ्यांची शर्यत पार पाडत डिसेंबर २०१६ मध्ये केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पुणे मेट्रो प्रकल्पाला मान्यता दिली. त्यापाठोपाठ राज्य सरकार व पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेने कायद्याच्या सर्व बाबींची पूर्तता केली. २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान मोदी यांनी पुण्यातच या प्रकल्पाचे भूमिपूजन केले.

हा प्रकल्प पहिल्या टप्प्यात ३१.२५ किलोमीटर लांबीचा आहे. त्यामध्ये दोन मार्ग आणि एका डेपोचा समावेश आहे. त्यातील पहिला मार्ग हा पिंपरी चिंचवड ते स्वारगेट असा असून तो १६.५९ टक्के लांबीचा आहे. त्यातील ५ किलोमीटर मार्ग भूमिगत असून त्याचे काम आता सुरू झाले आहे. दुसरा मार्ग वनाज ते रामवाडी असा १४.६६ किलोमीटरचा आहे. त्यावर १६ स्टेशन्स असतील. पहिल्या टप्प्यातील या प्रकल्पावर ११ हजार ४२० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च केंद्र व राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था करणार आहेत.

पिंपरी चिंचवड ते रेंजहिल्स या मार्गावरील मेट्रो स्टेशनसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. तेथील एन्ट्री व एक्झिट याचे कामही वेगाने सुरू आहे. रेंजहिल्स व वनाज डेपोसाठी लागणाºया जागेचा ताबा महापालिकेने मेट्रोकडे सुपुर्द केला आहे. महत्त्वाचे म्हणजे स्वारगेट स्थानकासाठी तेथील जागेचा ताबाही मेट्रोला मिळाला आहे. आम्ही दिलेल्या वचननाम्यानुसार या वर्षाअखेरीला पुणेकर मेट्रोतून प्रवास करू लागतील. त्यानंतरच्या वर्षात वनाज आणि रामवाडी येथील प्रवासी मेट्रोचा लाभ घेऊ शकतील. त्यामुळे पुणेकरांचे जीवन अधिक सुसह्य होईल व पुण्याच्या गौरवशाली परंपरेत मानाचा तुरा खोवला जाईल, याची मला खात्री वाटते.

Web Title: Metro booster dose to the Pune city's progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.