‘कविता’च्या आठवणींना...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 12:29 AM2018-09-29T00:29:52+5:302018-09-29T00:30:15+5:30

समाज, गाव आणि कुटुंब काय म्हणते याची जराही तमा न बाळगता सत्य, मग ते कितीही कुरूप, ओंगळ वा लाजिरवाणे का असेना, ते आपल्या लिखाणातून अतिशय उघड्या भाषेत व तशाच सुरात लिहिणारी ही कविता बोलायचीही तशीच.

 Memories of 'Kavita Mahajan' ... | ‘कविता’च्या आठवणींना...

‘कविता’च्या आठवणींना...

Next

कविता महाजन या कवयित्रीचे व लेखिकेचे वयाच्या अवघ्या ५१ व्या वर्षी निधन व्हावे ही गोष्ट साहित्य, समाज आणि सत्य या साऱ्यांविषयीची आस्था असणा-यांना खोलवर दुखविणारी आहे. सत्य पूजनीय असले तरी ते सर्वांना आवडतेच असे नाही. आपल्यातली खूपशी माणसे आणि स्त्रियादेखील असत्याच्या आधाराने जगत असतात. आपण सुखी असल्याचा खोटा आव चर्येवर बाळगणारी आणि मनातून कमालीची दु:खी असणारी अनेक माणसे आपण पाहिलीही असतात. त्यांच्याविषयीचे सत्य सांगणे वा त्याची चर्चा करणे हेच मग आपण असभ्य व असामाजिक मानत असतो. स्पष्टच सांगायचे तर ज्यावर बोलणे आवश्यक त्यावर बोलणे टाळणे यावरच आपल्या सभ्यतेचे इमले उभे असतात. परिणामी आपल्यातील संवादही काही सांगण्याऐवजी काहीतरी दडविण्यासाठीच चालू असतात. या ढोंगीपणावर आसूड ओढून सत्याविषयी सांगण्याची जिद्द बाळगणारी व ती बाळगताना समाजाने चोरून जपलेली असत्ये ओरबाडून काढणारी कविता महाजन ही त्याचमुळे अनेकांच्या प्रेमाचा तर अनेकांच्या रोषाचा विषय होती. ‘ब्र’ या आपल्या कादंबरीत समाजातील गरीब स्त्रियांचे होणारे श्रीमंती शोषण, ते करणाºया संभावितांच्या मान्यवर संस्था आणि समाज व सरकार यांची त्या साºयांकडे संथपणे पाहण्याची वृत्ती याविषयी ज्या पोटतिडकीने तिने लिहिले तो प्रकार सगळ्या सहृदय वाचकांच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे. ज्यांना आपण साधू, संत, महात्मे, सेवाधर्मी आणि बाबा वा बापू म्हणतो त्यांचे पाय केवढ्या चिखलाने आणि घाणीने बरबटले आहेत हे ती ज्या धिटाईने सांगते ते वाचले की एवढ्या काळात तिचा दाभोलकर वा गौरी लंकेश का झाले नाही, असाच प्रश्न आपल्याला पडतो. तिने ‘भिन्न’ लिहिली तेव्हाही भल्याभल्यांची झोप उडाली. आपल्या अवतीभवतीच नव्हे तर शेजारी चालणारे, जराशा अंधाराच्या आडोशात कसले जीवन उभे आहे, माणसांच्या आणि स्त्रियांच्याही वासना केवढ्या बलशाली आहेत आणि त्या वासनांना स्त्री-वेश्याच नव्हे तर पुरुष-वेश्याही कशा गरजेच्या वाटत आहेत याची तिने केलेली चर्चा डोळे विस्फारणारी व आपल्यालाच आपले अज्ञान सांगणारी आहे. आपण बरे आणि आपले घर बरे असे समजणारे व बाहेरचे जग शक्यतोवर अपरिचित राखणारे मग बर्ट्रांड रसेल ‘वेश्या हीच समाजातील सभ्य स्त्रियांच्या अब्रूचे रक्षण करणारी खरी राखणदार असते’ असे का म्हणतो ते वाचून हादरतात. मात्र वास्तव तेच आहे आणि कविताचा भर समाजातील या कुरूपपणाचे दर्शन समाजाला घडवून देण्यावर आहे. तिने कविता लिहिल्या, कादंबºया व ललित असे सारेच लिहिले. ती आणखी जगली असती तर तिने तस्लिमालाही मागे टाकले असते. मात्र या बंडखोर लेखिकेचे मन गरिबीच्या व वेदनांच्या सहवासात तळमळणाºया लोकांशी अधिक जुळले होते. प्रस्तुत लेखकासोबत तिने आदिवासी क्षेत्राचा प्रवास केला होता. पनवेल आणि वसईभोवतीच्या सगळ्या बºयावाईट प्रकारांएवढीच ती मुंबईतील विजेच्या खांबाखाली उभ्या असलेल्या पुरुष-वेश्यांशीही परिचित होती. त्यांचे व्यवहार तिने प्रत्यक्ष पाहिले व लिहिले. ते सारेच शहारून टाकणारे आहे. कुठल्याशा कवीच्या प्रेमाचे मनभर वेड घेऊन जगलेल्या आणि उपाशीपोटी गाडीखाली जीव देणाºया एका तरुणीची त्या कवीने केलेली उपेक्षा कविताने जेव्हा जगाला सांगितली तेव्हा सा-याच सभ्य व सुसंस्कृत जगाचे समाधान उद्ध्वस्त होऊन गेले. ज्या नांदेड शहरात तिचा जन्म झाला त्या महापालिकेने तिच्या लिखाणासाठी तिला मानपत्र देऊन सन्मानित केले. त्या वेळचे तिचे भाषण, एका विमान प्रवासातला कविता करकरे आणि तिच्याशी झालेला संवाद आणि काही काळ विश्रांतीसाठी प्रस्तुत लेखकाकडे तिने केलेला मुक्काम या साºया गोष्टी तिचे सरळसाधे मराठवाडेपण लक्षात आणून देणाºया होत्या. तिच्या बोलण्यात तिच्या अडचणी व तिच्यावर गुदरलेले प्रसंग असत. पण त्यात व्यथा वा पश्चात्ताप नसे. हे आणि तिचे निर्भय मन आणि त्याचे हुंकारच तेवढे त्यात असत... कविताच्या असंख्य आठवणींना...

Web Title:  Memories of 'Kavita Mahajan' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.