सामना डिजिटलच्या हस्तक्षेपाशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 04:19 AM2019-10-22T04:19:29+5:302019-10-22T06:14:37+5:30

टिष्ट्वटर या सोशल मीडियाने आपल्या प्लॅटफॉर्मवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बंदी घालावी, अशी मागणी काही डेमोक्रॅटच्या सदस्यांनी केली आहे.

Match digital interference | सामना डिजिटलच्या हस्तक्षेपाशी

सामना डिजिटलच्या हस्तक्षेपाशी

Next

- संतोष देसाई

टिष्ट्वटर या सोशल मीडियाने आपल्या प्लॅटफॉर्मवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बंदी घालावी, अशी मागणी काही डेमोक्रॅटच्या सदस्यांनी केली आहे. आपल्यावर राजद्रोहाचा खटला भरला आणि आपल्याला अध्यक्षपदावरून हटविण्यात आले तर देशात यादवी युद्ध घडून येईल, अशी ट्रम्प यांनी धमकी दिली आहे. या मागणीमागे गुणवत्ता असो वा नसो, त्यातून जग कसे बदलत चालले आहे हे दिसून येते. साधारणत: एखाद्या खासगी संस्थेवर नियंत्रण ठेवण्याची मागणी सरकारकडे करण्यात येते. पण अमेरिकेतील सामर्थ्यशाली राजकीय पक्षाकडून देशाच्या अध्यक्षांना नियंत्रणात ठेवण्यासाठी एका खासगी क्षेत्रातील कंपनीकडे मागणी करण्यात येत आहे. एकूणच सत्तेचा तोल कसा बदलतो आहे आणि तो का बदलत आहे, हे कळेनासे झाले आहे.

निसर्गत: तंत्रज्ञान हे वेगाने प्रगती करीत असते तर सामाजिक बदल हे हळूहळू होत असतात, पण तंत्रज्ञान हे आपल्या आघातांनी समाजरचनेत परिवर्तन घडवून आणत असते. त्यातून जे सामाजिक परिणाम घडून येतात ते जाणीवपूर्वक घडवून आणलेले नसतीलही, पण ते होत आहेत हे नाकारून चालणार नाही. तंत्रज्ञान आपल्या जीवनात प्रवेश करताना आपल्यास नवीन क्षमता प्रदान करीत असते, पण त्याचवेळी आपण आपले आयुष्य कसे जगावे याविषयीच्या संकल्पनासुद्धा बदलून टाकत असते. तंत्रज्ञानाची समाजाला हादरे देण्याची प्रकृती आणि समाजाची हे हादरे पचविण्याची क्षमता यातील अंतरामुळे सामाजिक अव्यवस्था निर्माण होत असते आणि या बदलाचा मुकाबला करण्यासाठी आपल्या पारंपरिक रीती आणि मानसिक रचना कमी पडत असते.

माणसाला स्वत:ची मते व्यक्त करण्याचा अधिकार प्रदान करणे हे काही मूठभर लोकांच्या जे हातात होते त्यात बदल होऊन आता प्रत्येकाला कुणाच्याही विषयी आपले मत निर्भीडपणे मांडण्याचा अधिकार आणि संधी प्राप्त झाली आहे. आज सत्ताधाऱ्यांवर सर्वांसमक्ष वाट्टेल तशी टिप्पणी करता येते. झालेला हा बदल अभूतपूर्व आहे, असेच म्हणावे लागेल आणि हा बदल एका तपाच्या आत घडून आला आहे. नेहमीच्या पद्धतीने हा बदल घडून येण्यासाठी कित्येक दशके जावी लागली असती आणि तरीही तो झाला असता की नाही याची शंकाच वाटते. त्याचे परिणाम आपल्याला सभोवताल पाहावयास मिळतात. हे परिणाम जितके चांगले, त्याहून जास्त वाईट आहेत आणि त्याविषयी चिंता उत्पन्न करणारे आहेत.

साऱ्या जगाचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण होत आहे. परस्परांविषयीचा द्वेष वाढीस लागला आहे. फेक न्यूजने वातावरण दूषित झाले आहे, विचारांच्या क्षेत्रात असहिष्णुता वाढीस लागली आहे आणि हे सर्व आपल्या तंत्रज्ञानविषयक क्षमतांच्या वाढीमुळे शक्य झाले आहे. याची सुरुवात जेथून होते तेथेच त्यावर नियंत्रण ठेवता येईल का? ती बाब खुल्या बाजारपेठेचा पुरस्कार करणाऱ्यांना तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यांना मान्य होणारी नाही. तंत्रज्ञानविषयक ज्या कंपन्या आहेत त्यांना त्यांचा व्यवसाय अन्य व्यवसायाप्रमाणे नियंत्रणाशिवाय करण्याचा हक्क आहे व त्यांना त्यावरील नियंत्रण मान्य होणारे नाही. सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू असला तरी त्याचा वेग अतिशय कमी आहे.

या सोशल मीडियांना स्वत:च्या सामर्थ्याची कल्पना नाही. त्यासाठी त्यांचे अज्ञान कारणीभूत नसून त्यांच्या वृत्तीचे सामाजिक परिणाम काय होऊ शकतील याविषयी ते कल्पना करू शकत नाहीत किंवा त्याचे हेतू चांगले असणेदेखील पुरेसे नाही. त्यांचा हेतू तो नसतानाही त्यांनी सांस्कृतिक बदल घडवून आणले आहेत आणि सामाजिक संबंध राखण्याच्या नियमात बदल घडवून आणला आहे. अशा स्थितीत तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवणे हाच एकमेव उपाय दिसून येतो. एवढे प्रचंड सामर्थ्य अपघाताने नियंत्रित करता येणार नाही. त्यावर व्यक्त होणारी शिवराळ भाषा आणि द्वेषमूलक भाषणे अमान्य करणे फारसे कठीण नाही. त्यामुळे व्यावसायिक दृष्टीने त्या प्लॅटफॉर्मवर प्रभाव पडेलही, पण नवा समाज निर्माण करीत असताना सामाजिक उत्तरदायित्वाच्या पालनाची अपेक्षा करणे चूक ठरणार नाही.

कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाने सुरुवातीस अव्यवस्थाच निर्माण केलेली आहे. ते तंत्रज्ञान आत्मसात करायला समाजाला वेळ हा लागलाच आहे. कापूस कातण्याचे यंत्र, वाफेचे इंजीन, छापखाना, आॅटोमोबाइल आणि कुटुंबनियोजनाच्या गोळ्या हीदेखील तंत्रज्ञानेच होती, ज्यांनी भूकंप घडवून आणला होता. ज्या काळात या गोष्टी आल्या त्या काळात त्यांनीदेखील हलचल माजविली होती, पण कालांतराने त्या आपल्या जीवनाचा भाग बनल्या आणि आपल्याला विकासाकडे नेणाºया ठरल्या. तेव्हा सध्या आपण जे काही बघतो आहोत ती दोन युगातील संक्रमणावस्था असू शकते. त्यातून भविष्यात काही तरी समतोल साधला जाईल. पूर्वी एक काळ असा होता जेव्हा विकासाच्या कल्पनेत सकारात्मक बाबीच असायच्या. पण आता आपण तसा दृष्टिकोन बाळगू शकत नाही. तसा दृष्टिकोन बाळगण्यासाठी आपल्याला फार मोठी किंमत चुकवावी लागू शकते. आज मात्र आपल्या हाती भविष्याकडे वेगाने जात असताना डोळे मिटून त्या वेगाची अनुभूती घेणे आणि त्याविषयी न बोलता त्याचा अनुभव घेणे याशिवाय काहीही उरलेले नाही! (लेखक फ्युचर ब्रँडचे माजी सी.ई.ओ. आहेत.)

Web Title: Match digital interference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :digitalडिजिटल