मणिपूरची आग भडकवण्यात चीनचा हात

By विजय दर्डा | Published: June 19, 2023 08:36 AM2023-06-19T08:36:42+5:302023-06-19T08:54:40+5:30

आपल्यातल्या उणिवा नाकारण्यात अर्थ नाही; परंतु मणिपूरच्या भडक्यात शेजारी देशांच्या कटकारस्थानांचा वासही आता वेगाने येऊ लागला आहे.

Manipur Violence : China's hand in setting fire to Manipur | मणिपूरची आग भडकवण्यात चीनचा हात

मणिपूरची आग भडकवण्यात चीनचा हात

googlenewsNext

- डॉ. विजय दर्डा
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

आजच्या घडीला देशाची सर्वात मोठी चिंता मणिपूर ही आहे. महिना उलटून गेला, हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. १३० पेक्षा जास्त लोक मारले गेले, गावेच्या गावे जाळली गेली. क्रौर्याची इतकी परिसीमा की सुरक्षा दले आणि दंगलखोरांमध्ये उडालेल्या चकमकीत एका लहान मुलाला गोळी लागली; त्या मुलाला ज्या रुग्णवाहिकेतून इस्पितळात नेले जात होते, तिला दंगेखोरांनी आग लावून दिली. रुग्णवाहिकेमधले सर्व जण आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ५० हजारपेक्षा अधिक लोक लष्कराच्या छावण्या किंवा इतर ठिकाणी आश्रयाला गेले आहेत. हिंसाचाराची सुरुवात ३ मे रोजी झाली आणि ८ मे या दिवशी मी याच सदरात लिहिले होते की सप्त भगिनी दारुगोळ्याच्या ढिगाऱ्यावर का आहेत?.

ईशान्येच्या समस्यांमध्ये शेजारचे देश तेल ओतण्याचे काम करत आहेत हे नि:संशय. त्यांच्याकडून दहशतवाद मोठ्या प्रमाणावर पोसला जात आहे. इथे सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी सेना आणि आयएसआयकडून शस्त्रास्त्रे मिळतात. अर्थात, केवळ दुसऱ्यावर याचे खापर फोडून आपण आपल्या चुकांकडे दुर्लक्ष करू शकणार नाही. आपले घर कमजोर असते तेव्हाच शेजारी हस्तक्षेप करू शकतात. सीमेवर शस्त्रात्रे आणि दहशतवाद्यांची ये-जा होऊ शकेल अशी अनुकूल परिस्थिती असते. चीन आणि पाकिस्तानच्या तुकड्यांवर जगणारे दहशतवादी गटआजही तेथे उपद्रव देत आहेत. गेल्या नऊ वर्षात ८००० पेक्षा जास्त दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले; यावरून प्रत्यक्षात तिथे किती दहशतवादी गट कार्यरत असतील याची कल्पना आपण करू शकता.

मणिपूरमध्ये नव्याने हिंसाचार पसरल्यानंतर फक्त ४८ तासात सेना आणि केंद्रीय अर्धसैनिक दलांच्या तुकड्या तेथे पोहोचल्या होत्या. हत्या होत राहिल्या, गावेच्या गावे आगीच्या भक्ष्यस्थानी पडत राहिली. मंत्र्याचे घर जाळले गेले. स्थानिक पोलिसांबद्दल कायमच गंभीर स्वरूपाच्या शंका घेतल्या गेल्या आहेत. मणीपूरचे पोलिस कमांडोजवर दहशतवाद्यांना मदत करण्याचा आरोप होतोच आहे. पोलिस ठाण्यातून उघडपणे हत्यारांची लूट झाली, तिथे हे पोलिस तैनात होते. १२०० पेक्षा जास्त शस्त्रे लुटली गेली, पण एकही चकमक उडाली नाही.

गुन्हेगार कोण आहे हे सांगणे कठीण, कारण कुकी आणि मैतेई हे दोन्ही गट एकमेकांवर शस्त्रे लुटल्याचा आरोप करत आहेत. दंगलखोरांनी लुटलेल्या याच शस्त्रांचा उपयोग सेना आणि अर्धसैनिक दलांच्या विरुद्ध केला गेला. शिवाय हे दंगलखोर शस्त्रे अशी चालवतात, की जणू त्यांना आधीच प्रशिक्षण मिळालेले असावे. पाकिस्तान आयएसआय आणि म्यानमारमधील दहशतवादी गटांच्या मदतीने मणिपूरमधील आगीत चीन तेल ओतत आहे, याबाबत अधिकृत वाच्यता झालेली नसली, तरी भारतीय गुप्तचरांमध्येही या गोष्टीची चर्चा आता होऊ लागली आहे. त्या शंकेला पुरेसे कारणही आहे.

म्यानमारच्या एका भागातील दहशतवाद्यांचे गट उघडपणे भारताविरुद्ध चीनच्या बाजूने काम करत असतात भारतात सैन्यावर हल्ला करून ते म्यानमारमध्ये पळून जातात. अशाच एका हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने एक मोठी कारवाई केली होती. त्या कारवाईवर एक छोटी फिल्मही तयार झाली आहे. चीनच्या या कुरापतींचा अंदाज सरकारलाही पूर्णपणे आहे. कारण पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ईशान्येकडील राज्यांना ५० पेक्षा जास्त वेळा भेट दिली आहे. देशविरोधी नसलेल्या गटांशी वाटाघाटींची भूमिका अमित शाह यांनी घेतली होती. गुप्तपणे काही समझोत्याच्या बातम्याही येत असतात अनेक दहशतवादी गटांनी शस्त्रे खाली ठेवली असून, ते मुख्य प्रवाहात सामीलही झाले आहेत. परंतु चिनी तुकड्यांवर जगणारे दहशतवादी भारताला उद्ध्वस्त करण्याचे मनसुबे ठेवून असतात.

खरंतर, मणिपूर शांत होऊ लागले होते. गेल्या वर्षी तेथे विधानसभा निवडणुका निर्विघ्न पार पडल्या. परिस्थिती सुधारल्यामुळे अनेक भागातून सैन्यदलाला विशेष अधिकार देणारा कायदा रद्द केला गेला. मग अचानक मणिपूर पुन्हा कसे काय पेटले? वर वर पाहता आदिवासींच्या संबंधात न्यायिक आदेश त्याचे कारण ठरल्याचे दिसते. हे प्राथमिक कारण आहे हे खरेच, परंतु पडद्याच्या मागे रचला गेलेला मोठा कट नजरेआड करता येणार नाही. या ताज्या उपद्रवानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. लष्करप्रमुख मनोज पांडे हेही तेथे गेले होते.

तुर्तास हा प्रश्न कठोरपणेच हाताळावा लागेल. जे कायदा हातात घेत असतील त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल परंतु त्यापेक्षाही जास्त गरज आहे ती त्या संपूर्ण प्रदेशात रोजगाराची साधने व्यापक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची! त्यासोबतच प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा संदेश पोचला पाहिजे की चीन भारताला तोडू पाहतो आहे. ईशान्येकडील राज्यात यासाठीच चीन कुरापत काढत आहे. गुप्तचर संस्थांनी ज्या प्रकारे अरुणाचल प्रदेशमध्ये लक्ष घातले, त्याप्रकारे उर्वरित ईशान्येकडील राज्यातही घालणे सर्वात मोठी गरज आहे. जेणेकरून षडयंत्राची चाहूल आपल्याला आधीच लागेल आणि मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होणार नाही.

असे प्रश्न हाताळताना कठोरपणाही दाखवला पाहिजे . आणि प्रेमही. मी प्रेमाचा उल्लेख अशासाठी करतो आहे की, आधुनिकतेच्या आक्रमणापासून ईशान्येकडील संस्कृती वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. भारत नावाच्या या बागेवर प्रेमाचे सिंचन झाले तरच सर्व ऋतूंत प्रेमाची फुले फुलतील.
 

Web Title: Manipur Violence : China's hand in setting fire to Manipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.