अशाने महाराष्ट्र काँग्रेसमुक्त होईल?
By Admin | Updated: March 22, 2015 23:19 IST2015-03-22T23:19:11+5:302015-03-22T23:19:11+5:30
विधान परिषद सभापतींच्या निवडणुकीच्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात राजकीय शिमगा पाहायला मिळाला. राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर सभापती झाले.

अशाने महाराष्ट्र काँग्रेसमुक्त होईल?
सोज्वळ म्हणून परिचित असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात हे राजकारण का घडावे, हा प्रश्न अनुत्तरित राहतो आहे.
विधान परिषद सभापतींच्या निवडणुकीच्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात राजकीय शिमगा पाहायला मिळाला. राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर सभापती झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांना सभापतिपदावरून हटविण्याचे समर्थन करताना, ‘आम्हाला महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करायचा आहे आणि देशमुखांना हटविणे ही त्याची सुरुवात आहे’, असे विधान भाजपाचे ज्येष्ठ नेते महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केले.
काँग्रेसला असे पाण्यात पाहिले जाण्याचा अनुभव यापूर्वी अनेकदा आलेला आहे. १९७७ च्या निवडणुकीनंतर जनता पक्ष सत्तेत आला तेव्हा असाच विद्वेष करण्यात आला. अशा राजकारणाने सुरुवातीला बदला घेण्याचा आनंद मिळतो पण कालांतराने ते अंगलट येते, हे १९८० मध्ये इंदिरा गांधी दमदारपणे सत्तेत परतल्या तेव्हा सिद्ध झाले होते. महाराष्ट्रात तीच चूक भाजपा करायला निघाली आहे. आज ना उद्या ती चूक अंगाशी येऊ शकते. एकदोन माणसे संपवून काँग्रेस वा काँग्रेसचा विचार संपेल हा मुळातच अविचार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय पार्श्वभूमी बदला घेण्याची नाही, पण तेही त्याच मार्गावर निघालेले दिसतात. दुसऱ्याची रेष पुसण्याऐवजी स्वत:ची रेष मोठी करा, असे त्यांच्याच नागपुरातील दिग्गज नेते नितीन गडकरी नेहमी म्हणत असतात. गडकरींचे हे विधान फडणवीस यांनी सल्ला म्हणून स्वीकारले तर, ‘तुम्ही पंधरा वर्षांत काय पापं केली ते आधी बोला’, अशी काँग्रेसला हिणवणारी वाक्ये म्हणण्यात त्यांचा वेळ जाणार नाही.
महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करण्याऐवजी काँग्रेस आणि विशेषत: राष्ट्रवादीच्या खात्यांमध्ये बोकाळलेल्या भ्रष्टाचारापासून लोकांना मुक्ती हवी होती म्हणून त्यांनी तुम्हाला सत्तेत आणले. सध्या तसे काही दिसत नाही. आधीच्या राजवटीत मंत्रालय, विधानभवनात फिरणारे दलाल, कंत्राटदार आताही दिसतात. सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास विभागात तर ते कधीच सक्रिय झाले आहेत. नवीन सरकारमधील नव्या मंत्र्यांना ते चक्क ‘मार्गदर्शन’ करताना दिसत आहेत. खडसेसाहेब! या डल्लाभरूंपासून मुक्ती दिली तर बरे होईल. आघाडी सरकारच्या काळात झालेल्या वीज घोटाळ्यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने करून भाजपाला आयती संधी दिली होती, पण ही मागणी पद्धतशीरपणे टाळून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ते आमदार असताना अजित पवार, सुनील तटकरे यांच्याकडून कामे करवून घेतल्याची बूज राखल्याचे दिसते.
भाजपाने सभापतिपदासाठी राष्ट्रवादीला साथ देऊन कोणते तत्त्वनिष्ठ राजकारण साधले? शिवसेनेने उद्या पाठ दाखविली तर प्लॅन बी तयार असावा म्हणून राष्ट्रवादीचा पर्याय भाजपाने तयार ठेवला आहे असे जे म्हटले जाते त्याला बळ देणारे राजकारण सभापती निवडीच्या निमित्ताने झाले. सोज्वळ नेतृत्व म्हणून परिचित असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात हे राजकारण का व्हावे असा प्रश्न भाजपाप्रेमींना पडला आहे. पण त्याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही.
असंतोषाची दखल
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतील प्रशिक्षण वर्गात भाजपाच्या अनेक आमदारांनी, काही मंत्री बोलत नाहीत वा आमच्याकडे पाहतही नाहीत, अशा तक्रारी केल्या होत्या. आता ‘ते’ मंत्री माणुसकीने बोलू लागले असल्याचा अनुभव आमदार सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांनीही आता प्रत्येक महसूल विभागातील भाजपा आमदारांच्या स्वतंत्र बैठका सुरू केल्या आहेत.
जाता जाता : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना ‘अत्युच्च’ या ऐवजी, ‘अचुत्य’ असा चुकीचा शब्द वापरला म्हणून त्यांची खिल्ली उडविणारा अग्रलेख लिहिला गेला. मुनगंटीवार भाषाप्रभू आहेत म्हणून पाच वेळा आमदार वा मंत्री झालेले नाहीत. पण एका शाब्दिक चुकीसाठी त्यांना इतके झोडपायचे? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकनेते दादासाहेब कन्नमवार हयातभर साधे जीवन जगले. नागपुरातील त्यांच्या शोकसभेनंतर त्यांच्या पत्नी एसटीने चंद्रपूरला गेल्या, यातच सारे आले. पण दादासाहेबांचा उल्लेख नेहमी ‘कंडम’वार म्हणून करणारे थोर पत्रकार तेव्हाही होते. कन्नमवार ते मुनगंटीवार विदर्भद्वेष तसाच कायम आहे; एवढेच.
- यदु जोशी