शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
2
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
3
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
4
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
5
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
6
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
7
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
8
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
9
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
11
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
12
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
13
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
14
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
15
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
16
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
17
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
18
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
19
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
20
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!

लेख: किती बडगुजरांच्या हाती ‘कमळ’ देणार आहात?

By यदू जोशी | Updated: June 20, 2025 06:33 IST

Maharashtra Politics: राजकारणात बेरीज महत्त्वाची यासाठी भाजपचा हा ‘बडगुजर पॅटर्न’ असेल, तर मते मिळवण्याच्या नादात भाजपचा राष्ट्रवादच रद्दीत जाईल, हे नक्की!

यदु जोशीसहयोगी संपादक,लोकमत

‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ आणि ‘दहशतवादाविरुद्धचा राष्ट्रवाद’ हे जनसंघ आणि भाजपचे ब्रीद राहिले आहे. पक्षांतरे तर अनेक होत असतात; पण नाशिकचे सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशामुळे मात्र या राष्ट्रवादाला धक्का पोहोचला आहे. बडगुजरांमुळे आठ-दहा नगरसेवक जास्तीचे निवडून येतीलही, पण ते मिळवण्याच्या नादात राष्ट्रवाद रद्दीत जाईल, हे समजून का घेतले गेले नाही हा प्रश्न आहे. मंत्री गिरीश महाजन यांना संकटमोचक म्हणतात. नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता येण्यासाठी बडगुजरांना पक्षात आणणारे गिरीश महाजन या निमित्ताने पुन्हा एकदा संकटमोचक ठरतीलही कदाचित; पण भाजपचा राष्ट्रवाद अशा घटनाक्रमामुळे संकटात येतो, हे त्यांना कोण सांगणार? 

तीन पिढ्या संघ-भाजपची विचारधारा घरात असलेल्या स्थानिक आमदार सीमा हिरे यांनी बडगुजरांचा प्रवेश रोखण्यासाठी प्रचंड आटापिटा केला; पण त्यांचे कोणी ऐकले नाही. जनसंघ-भाजपसाठी आयुष्य वेचलेले पोपटराव हिरे यांच्या सीमाताई सूनबाई. त्यांच्या वेदनांना सीमा राहिली असेल का? ‘राजकारणात शत्रू कमी करायचे असतील तर सर्वात चांगला उपाय म्हणजे त्यांनाच मित्र करणे’ असे सीमाताईंना समजून सांगितले गेले; पण त्यांच्यासारख्या साध्या, निष्ठावंतांना हे असले डावपेच कसे कळतील? शत्रूंना आपलेसे करणे हेही समजले जाऊ शकते, पण शत्रूचापण काही ‘दर्जा’ असला पाहिजे की नाही? एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासोबतचे अनेक वादग्रस्त चेहरे भाजपसोबत सन्मानाने बसलेले आहेत. निदान ते भाजपच्या मित्रपक्षात तरी आहेत; पण अशी वादग्रस्त माणसे मित्रपक्षात असणे आणि थेट भाजपमध्येच त्यांनी शिरकाव करणे यात फरक आहे. ‘मित्रपक्षांत कोण असावे हा आमचा चॉइस नाही, अशी वादग्रस्त माणसे आमच्या पक्षात नाहीत’, असा युक्तिवाद  बडगुजरांना पक्षात घेतल्यावर भाजप नेत्यांना करता येणार नाही.

दाऊद इब्राहिमचा खास असलेला सलीम कुत्ता याच्याबरोबर बडगुजर पार्टीत नाचले, असे देेवेंद्र फडणवीस स्वत:च विधानसभेत म्हणाले होते. त्याच बडगुजरांना पवित्र कसे काय करून घेतले, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. माध्यमे चार-आठ दिवस ठणाणा बोंबलतील; पण बडगुजरांमुळे नाशिक महापालिकेत सत्ता येईल, ते अधिक महत्त्वाचे आहे असा विचार केला गेला असावा. शेवटी राजकारणात बेरीज महत्त्वाची असते. ती करताना तत्त्वांचा गुणाकार चुकला तरी चालतो. बहुमतासाठी डोकी मोजली जात असतात आणि या डोक्यांची संख्या वाढविणे हाच खरा राजधर्म मानला जातो. जिल्ह्याजिल्ह्यात असे बडगुजर आहेत, उद्या त्यांच्याही हाती कमळ दिले जाऊ शकते. बडगुजरांबरोबर ‘एकावर एक फ्री’ तसे बबनराव घोलप या अत्यंत वादग्रस्त इतिहास असलेल्या नेत्याचेही शुद्धीकरण करून घेण्यात आले. नाशिकच्या रामकुंडात पाप धुतले जाते म्हणतात, आता तिथे नवे भाजपकुंडच तयार झाले आहे. 

भाजपचे काही नेते म्हणतात की, ‘सगळेजण आमच्याच पक्षाला तात्त्विकतेचे धडे देतात. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेत गेलेल्यांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट तपासत नाहीत.’ - पण इतकी वर्षे तात्त्विकतेबाबत भाजपनेच स्वत:बद्दलच्या अपेक्षा वाढवून ठेवलेल्या आहेत. मग इतरांनी भाजपकडून शुचितेच्या अपेक्षा बाळगल्या तर काय चूक? भाजपच्या कथनी आणि करनीमध्ये फरक नाही असे मानणारा एक मोठा वर्ग आजही आहे. बडगुजर पॅटर्नमुळे त्याची निराशा होईलच होईल. हाच वर्ग भाजपचा मतदारदेखील आहे.

अजित पवार काय म्हणाले? परवा अजित पवार यांची एक व्हिडिओ क्लिप बघितली. त्यात ते म्हणतात, ‘आम्ही कोण्या चुकीच्या माणसाला पक्षात घेतले असे म्हटले जात आहे, ते खरे  असेल तर आम्ही त्याला काढून टाकू’.  आता अजित पवारांसारखा नेता असे म्हणत असेल तर भाजपने बडगुजरांबाबत तशीच भूमिका घ्यायला काय हरकत आहे? बहुमतात तर तुम्ही आहातच, पण बहुमतातून राक्षसी बहुमताकडे जायचे ठरले असेल तर मग त्या प्रवासात अशा राक्षसांनाच सोबत घ्यावे लागेल. तुम्हीच बाटलीबंद केलेले हे राक्षस तुम्हीच मोठे कराल तर एक दिवस ते तुम्हालादेखील त्रास देऊ लागतील आणि मग त्यांना पुन्हा बाटलीबंद करणे तुमच्या हाती नसेल.  रा.स्व. संघ हा भाजपचा रिमोट कंट्रोल आहे असे म्हणतात. या रिमोट कंट्रोलची ‘एनओसी’ बडगुजरांबाबत घेतली होती का हा प्रश्नदेखील आहेच. उत्तर महाराष्ट्रातील संघाच्या धुरिणांचे या ना त्या कारणाने गिरीश महाजन यांच्यावर प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी ही ‘एनओसी’ दिली गेली असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाMahayutiमहायुती